अहमद केळकर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार
गुहागर, ता. 05 : तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक हे मनमानी कारभार करत असून कोणत्याही शासकीय बाबींची कायदेशीर पूर्तता न करता साहित्य खरेदी करणे, कोणतीही जाहिरात न देता आपल्या मर्जीतील कामगार भरती करणे, तसेच कामाची निविदा प्रक्रिया करताना निमय बाह्य पद्धतीने मर्जीतील ठेकेदारांना कामे देणे यासारखे अनेक प्रकार वारंवार होत आहेत. ग्रामपंचायतीच्या या निमय बाहय कामकाजाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ अहमद उमर केळकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. Extraordinary working of Gram Panchayat
मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गुहागर तालुक्यामधील अग्रणी अशा पाटपन्हाळे ग्रामपंचायतीमध्ये नियमबाह्य पद्धतीने कामे होत आहेत. ग्रामपंचायत मार्फत थम मशीन खरेदी करण्यात आली. ही थम मशीन खरेदी करण्याचा कोणत्याही प्रकारचा ठराव ग्रामसभेमध्ये अथवा मासिक सभेमध्ये केलेला नाही. या मशीन खरेदीमध्ये तीन कोटेशन आवश्यक असताना एका कॉम्प्युटर मालकाने दिलेले ओरिजनल कोटेशन न लावता ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सरपंच आणि उपसरपंचांच्या संगनमताने खोटे कोटेशन जोडल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे. त्याचबरोबर कोटेशन खोटे असल्याचे संबंधित कॉम्प्युटर मालकाने ही मान्य केले आहे. Extraordinary working of Gram Panchayat

याचबरोबर ग्रामपंचायतीमध्ये कर्मचारी भरती करत असताना या भरतीबाबतची कोणतीही जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही. याबाबतच्या लेखी सूचना ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्रमुख रहदारीच्या ठिकाणी न लावता आपल्या मर्जीतीलच काही विशिष्ट लोकांना आपला स्वार्थी हेतू साध्य करण्यासाठी कर्मचारी म्हणून भरती केले आहे. याबाबत ग्रामसभेमध्ये विचारणा केली असता, सरपंच हुकूमशाही पद्धतीने ग्रामस्थांना दम देऊन ग्रामसभेमध्ये बोलण्यास मज्जाव करत असतात, असा आरोप श्री. केळकर यांनी केला आहे. Extraordinary working of Gram Panchayat
या ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी या महिला असून त्याही महिला असल्याचा गैरफायदा घेत ग्रामस्थांनी काही माहिती विचारली तर त्या संबंधितांवर विनयभंगासारख्या खोट्या केस दाखल करतात. पाटपन्हाळे ग्रामपंचायत ही तालुक्यातील अग्रणी ग्रामपंचायत असुन तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. शृंगारतळी हे शैक्षणिक आणि खरेदीसाठी मध्यवर्ती केंद्र आहे. मात्र अशा ग्रामपंचायतीचे सरपंच कधी हजरच राहत नाही. सरपंच हे एका खाजगी कंपनीमध्ये कामाला असून त्यांना जनतेच्या विकासाचा विसर पडलेला आहे. आठवड्यातील एकही दिवस सरपंच पूर्णपणे ग्रामपंचायतीसाठी वेळ देत नसल्यामुळे ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. ग्रामस्थांना आपल्या कामांसाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. Extraordinary working of Gram Panchayat
या सर्व बाबी गंभीर असून या गंभीर बाबीं बाबत आणि होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि सदस्यांच्या मनमानी कारभाराची चौकशी व्हावी आणि चौकशीत दोषी असणाऱ्या सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी अहमद उमर केळकर यांनी केली आहे. Extraordinary working of Gram Panchayat
