एक्साईजची कारवाई, पावणेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त
गुहागर ता. 2 : कौंढर काळसुर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टीवर धाड टाकून 5 लाख 76 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यातील ही राज्य उत्पादन शुल्क (Excise Department) विभागाची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. या कारवाईमुळे गुहागर तालुक्यातील गावठी दारुधंदे विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
राज्य उत्पादन विभागाला कौंढर काळसुर येथे गावठी हातभट्टीचा कारखाना ( liquor) असल्याची टीप मिळाली होती. त्यानुसार उपअधिक्षक व्हि. व्हि. वैद्य यांच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यासाठी चिपळूण, खेड, लांजा, रत्नागिरी येथील निवडक अधिकारी कर्मचारी यांचे भरारी पथक करण्यात आले. अत्यंत गुप्तपणे हे पथक कौंढर काळसुर येथे पोचले. टीप देणाऱ्याने सांगितलेल्या खुणांवरुन थेट हे पथक हातभट्टीवर पोचले. तेथे 500 लिटरच्या काळ्या टाक्यांमधुन गावठी दारुसाठी वापरण्यात येणाऱ्या 23 हजार लिटर रसायनाची साठवणूक करण्यात आली होती. एवढा मोठा साठा पाहून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी देखील अचंबित झाले. या रसायनासह 5 लाख 76 हजार 950 रु. किंमतीचा मुद्देमाल भरारी पथकाने जप्त केला आहे. भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी या टाक्यामधील सर्व रसायन ओतून टाकले तेव्हा परिसर रसायनाच्या वासाने व्यापून गेला होता. भरारी पथकातील अधिकारी आणि कर्मचारीही त्या वासाने हैराण झाले होते. 23 हजार लिटर रसायन ओतून टाकल्याने दारुचा महापुर आल्याचे चित्र या हातभट्टीवर होते.
धाडीबाबत गुप्तता पाळूनही गावठी दारु कारखान्याच्या मालकाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीची माहिती आधीच मिळाली होती. गावठी दारु कारखान्याचा मालक आणि कामगार आधीच गायब झाले होते. त्यामुळे या मोठ्या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाला अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करावा लागला आहे. येथील तलाठ्यांना सदर जागा मालकाचा आणि पोलीस पाटील यांना अज्ञात इसमाचा शोध घेण्याची सूचना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधिक्षक व्हि. व्हि. वैद्य यांनी केली आहे.