शिक्षण विभागाने काढले आदेश
रत्नागिरी, ता. 07 : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्यात उद्या आणि परवा शाळांना सुट्टी नसेल. यापूर्वी 8 आणि 9 जुलै 2025 रोजी राज्यातील सर्व शाळा बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचे आंदोलन पुकारले होते. या आंदोलनामुळे शाळा दोन दिवस बंद ठेवण्यात येणार होत्या, परंतु आता शिक्षण विभागाने शाळा बंद राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. विद्यार्थी आणि पालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. Education Department Orders


यामुळे आता उद्या आणि परवा (8 आणि 9 जुलै रोजी) राज्यातील कोणत्याही शाळा बंद राहणार नाहीत. शिक्षण विभागाने याबाबत स्पष्ट आदेश काढले आहेत. शिक्षक समन्वय संघाने जरी शाळा बंदची हाक दिली असली तरी, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता शाळा बंद राहणार नाहीत, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी हे आदेश जारी केले आहेत. Education Department Orders


राज्यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गेल्या वर्षी 75 दिवसांचे आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर 10 ऑक्टोबर 2024 रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुदानित शाळांना पुढील वाढीव टप्पा देण्याचे आश्वासन दिले होते. यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, 14 ऑक्टोबर 2024 रोजी निघालेल्या सरकारी आदेशात (GR) अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांसाठी निधीची कोणतीही तरतूद करण्यात आली नव्हती. यामुळे निराश झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून पुन्हा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. Education Department Orders