ऑनलाइन सभेत महाराष्ट्रातील साहित्यिकांची आदरांजली
गुहागर : डॉ. कोत्तापल्ले हे मराठी साहित्यात वस्तुनिष्ठ भूमिका घेत सत्यशोधकी परंपरा जपत राहिले. असंख्य विद्यार्थी त्यांनी घडवले. शून्यातून अनेकांना उभे केले. ग्रामीण साहित्य चळवळीतील त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांची फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा कायम होती. त्यांनी कधीही संधीसाधूपणा केला नाही. देशीवादी भूमिकेची कठोर चिकित्सा त्यांनी मुक्तशब्दांमधुन केली. आपल्या विचारांवर ठाम राहिले. जे पटत नाही त्यास वैचारिक विरोध केला. असे विचार मांडून अभ्यासक, समिक्षक, विचारवंतानी साहित्यविश्र्वातील आधारवड डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना आदरांजली वाहिली. Dr. Nagnath Kottapalle
सक्षम समीक्षा, पसायदान प्रतिष्ठान गुहागर आणि कोकण मराठी साहित्य परिषद गुहागर यांच्यावतीने आदरणीय, गुरूवर्य, ज्येष्ठ साहित्यिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना आदरांजली वहाण्यासाठी ऑनलाइन सभेचे आयोजन केले होते. या सभेमध्ये मराठी साहित्यसृष्टीतील अनेक विचारवंत उपस्थित होते. या आदरांजली सभेचे अध्यक्ष महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, मराठी नाट्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष, प्रा. डॉ. दत्ता भगत होते. Dr. Nagnath Kottapalle
अहमदनगरचे ज्येष्ठ समीक्षक, संशोधक, डॉ. सुधाकर शेलार म्हणाले की, सरांकडून आम्ही खूप काही शिकलो. मराठी पददलित, ग्रामीण, आदिवासी, ग्रामीण, अशा साऱ्या प्रवाहांना ते आपले वाटले. त्यांनी भेदाभेद कधीच केला नाही. त्यांचे साहित्य आणि जीवन या दोन बाबी नव्हत्या. ते मानवतावादी विचार पेरत गेले. तो उगवत गेला. डॉ.नागनाथ कोत्तापल्ले हे सर्वांना सोबत घेऊन चालणारे साहित्यिक होते. साहित्यिकांचे, अभ्यासकांचे मार्गदर्शक होते. ग्रामीण साहित्य चळवळीतील त्यांचे योगदान मोलाचे ठरले. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने वाटचाल करताना अनेकवेळा त्यांनी ठाम भूमिका घेतल्या होत्या. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ते एक आधारवड होते. अनेकांचे जीवन त्यांनी मार्गी लावले. कोत्तापल्ले यांच्या साहित्य – समीक्षेने मराठी साहित्यविश्व समृद्ध केले आहे. Dr. Nagnath Kottapalle
अलिबागचे समीक्षक, विचारवंत, उपप्राचार्य डॉ. निलकंठ शेरे म्हणाले की, मार्क्सवाद व आंबेडकरवाद यांचा समन्वय सरांनी जीवनात घडविला. शेवटपर्यंत त्यांची फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा कायम होती. त्यांनी कधीही संधीसाधूपणा केला नाही. देशीवादी भूमिकेची कठोर चिकित्सा त्यांनी मुक्तशब्दांमधुन केली. आपल्या विचारांवर ठाम राहिले. जे पटत नाही त्यास वैचारिक विरोध केला. त्यांच्या जाण्याने या चळवळीची भरून न येणारी, मोठी हानी झाली आहे. माजी शिक्षण सचिव व कवी शशिकांत हिंगोणेकर(जळगाव) म्हणाले की, डॉ. कोत्तापल्ले यांनी दर्जेदार साहित्याची निवड अभ्यासक्रमासाठी केली. त्यांनी पुरोगामी विचार मनोमन जपला. मराठी साहित्य/ संस्कृती यांच्या विकासात त्यांचा मोठा वाटा आहे. Dr. Nagnath Kottapalle

माजी शिक्षण संचालक रोहीदास पोटे (पनवेल) यांनी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना कवितेमधुन आदरांजली वाहिली.
जी वाऱ्यातही तेवते तीच खरी ज्योत असते
जी अडचणीत टिकते तीच खरी पत असते
जीला अन्यायाची चीड असते तीच खरी रीत असते
जे हृदयाला भिडते तेच खरे गीत असते.
अध्यक्षीय भाषणात डॉ. भगत म्हणाले की, माझ्या जीवनात डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे स्थान मित्र म्हणून महत्वाचे आहे. आपण गेल्यानंतर आपल्यापाठी लोक काय बोलतात हे महत्वाचे आहे. आज संपुर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त होत आहे. अनेकांचा आधारवड हरपला आहे. माझ्या मित्राने इतरांसाठी केलेल्या कामाचा मला अभिमान आहे. कोणत्याही कंपुत न अडकता त्याने व्यापक पातळीवर काम केले. त्याची पोचपावती त्याला मिळाली आहे. वय झालं की पिकलं पान गळणारचं. दु:ख वाटणं स्वाभाविक आहे. आपण त्यांचा वारसा पुढं चालवला पाहिजे. Dr. Nagnath Kottapalle
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सक्षम समीक्षाचे संपादक, समीक्षक, लेखक, डॉ. शैलेश त्रिभुवन यांनी केले. आदरांजली सभेच्या ऑनलाइन आयोजनाकरीता सक्षम समीक्षाचे डॉ. शैलेश त्रिभुवन, पसायदान प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब लबडे, कोमसाप गुहागर शाखेचे अध्यक्ष शाहीर शाहीद खेरटकर यांनी मेहनत घेतली. केले. या सभेला कोल्हापूरचे ज्येष्ठ साहित्यिक, आंतरराष्ट्रीय तुलनाकार, संशोधक डॉ. आनंद पाटील, येवल्याचे डॉ. गमे, पुण्यातील प्रा. डॉ. नाना झगडे, देगलूरचे प्रा. सर्जेराव रणखांब, गुहागरचे लेखक ईश्वर हलगरे, साहित्य चळवळीतील खंदे कार्यकर्ते, अनुवादक अहमदनगरचे शब्बीरभाई शेख, ज्येष्ठ समीक्षक डॉ. सतिश बडवे, विद्रोही साहित्य चळवळीचे जनक किशोर धमाले, डॉ. श्रीकांत पाटील, प्राध्यापक वर्ग, साहित्यिक, बहुसंख्य श्रोते उपस्थित होते. Dr. Nagnath Kottapalle

