• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 October 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जनजातीयांची दिवाळी

by Guhagar News
October 23, 2025
in Old News
40 1
1
जनजातीयांची दिवाळी
79
SHARES
227
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

निसर्ग, श्रम आणि श्रद्धेचा उत्सव

गुहागर, ता. 23 : दिवाळी हा भारतातील सर्वात महत्वाचा उत्सव आहे.  दिव्यांचा, आनंदाचा आणि समृद्धीचा हा सण संपूर्ण देशभर उत्साहाने साजरा केला जातो. सर्वत्र प्रकाश, उत्साह पाहायला मिळतो. या आनंदोत्सवापासून जनजातीय समुदायदेखील अलिप्त नाहीत. भारतातील विविध जनजातीय समूह दिवाळीला त्यांच्या पारंपरिक श्रद्धा, रूढी आणि जीवनपद्धतींशी जोडून दिवाळी अत्यंत उत्साहाने, साजरी करतात. प्रत्येक समुदाय दिवाळीचे आपापले खास अर्थ, श्रद्धा आणि परंपरा जपत हा सण साजरा करतो. Diwali is a festival of nature, labor and faith

काही ठिकाणी हा सण शेतीशी निगडित आहे.  काही ठिकाणी तो पूर्वजांच्या स्मृतींशी,  तर काही ठिकाणी निसर्गदेवतांच्या पूजनाशी जोडलेला असतो. जनजातीय समूहांच्या दिवाळी साजरी करण्याच्या विविध पद्धतींचा अभ्यास करताना भारतीय संस्कृतीतील लोकभावना, निसर्गाशी असलेले नाते आणि अध्यात्मिक एकात्मतेचा गाभा अधिक चांगल्या प्रकारे जाणवतो. दिवाळीचा उत्सव साजरा करण्याच्या अनोख्या आणि विविधरंगी जनजातीय परंपरांची ओळख करून घेणे हा या इन्फोपॅकचा उद्देश आहे. महाराष्ट्रात वारली, कोरकू आणि गोंड हे जनजातीय समूह दिवाळी साजरी करतात.  Diwali is a festival of nature, labor and faith

वारली दिवाळी 

वारली समुदायाच्या दिवाळीचा निसर्गपूजा, शेतीच्या आभार आणि पारंपरिक सणांच्या समृद्ध परंपरेशी अतूट संबंध आहे. शहरे वाढत गेली तसतसे जनजातीयांचे पाडे त्यांनी सामावून घेतले. परंतु आजही महानगरी मुंबईच्या उपनगरांतील वारली पाड्यांमध्ये दिवाळी समुदायाच्या पुरातन पद्धतीनुसार आणि प्रथा पाळून साजरी केली जात असल्याने तेथील दिवाळी इतर समाजांपेक्षा अनोखी वाटते. वारली पाड्यांमध्ये दिवाळीच्या सणांमध्ये निसर्गाशी असलेले सखोल नाते जपणारे पारंपरिक विधी आवर्जून पार पाडले जातात आणि प्राचीन परंपरा अद्यापही पाळल्या जातात. 

वारली समूहाच्या दिवाळी उत्सवात वाघबारसी, बारकी तिवली, मोठी तिवली आणि बलिप्रतिपदा हे चार महत्त्वाचे दिवस असतात.

वारली लोक वाघाला देव मानतात. वाघबारसीच्या दिवशी त्याची पूजा केली जाते. बहुतेक वारली पाडे जंगलांमध्ये वसलेले आहेत. पूर्वी त्यांचे जीवन पूर्णपणे जंगलावर  अवलंबून होते. ते आपल्या जनावरांना चरायला जंगलात नेत असत. आजही समुदायातील बरेच लोक पशुपालन करतात आणि जनावरांना चरायला जवळपासच्या रानामध्ये नेतात. अशा निर्मनुष्य जंगलामध्ये चरताना आपण पाळलेल्या जनावरांवर वन्य प्राण्यांनी हल्ला करू नये म्हणून त्यांची उपासना करून त्यांच्याकडे सुरक्षेची विनवणी करण्याची भावना या पूजा पद्धतीमागे आहे. गावदेवीच्या देवळात लाकडावर कोरलेला वाघ  मध्यभागी ठेवला जातो. गावकरी तेथे नारळ फोडतात. उदबत्ती लावतात आणि दिवा लावून वाघ्या देवाची पूजा करतात. पाड्याजवळील जंगलात शेंदूर फासलेली शिळा म्हणजेच वाघ्या देव. 

बारकी तिवलीच्या दिवशी घरोघरी पारंपरिक पद्धतीने विविध पदार्थ तयार केले जातात. महिला जंगलातून चिरोती गोळा करून आणतात. या चिरोतीचे दोन तुकडे करून आतला गर काढला जातो.  त्याच्या कवचाचा पणतीसारखा वापर करून दिवा लावला जातो. गायीचं शेण आणि माती मिसळून बनवलेला मोठा गोल दिवा म्हणजेच बोवाला. तो उंचावर लावला जातो.  झेंडूच्या फुलांनी सजवला जातो. संध्याकाळी या दिव्याचा उजेड पाडा उजळून टाकतो. दिव्यांची आरास करून गोठे, घरे आणि विहिरी सजवल्या जातात.

मोठी तिवली आणि बारकी तिवलीच्या दिवशी देखील पाड्यावरची घरे दिव्यांनी सजतात. या दिव्यांचा प्रकाश संपूर्ण पाड्याला उजळवतो. बलिप्रतिपदेच्या दिवशी पहाटेच उत्सव सुरू होतो. या दिवशी सर्व लोक लवकर उठतात, शेणसडा करून अंगण लख्ख करतात. गोठे स्वच्छ करतात आणि गुरांना सजवतात. भाताच्या पेजेत कालवलेल्या गेरूने गुरांवर चित्रे काढून त्यांना सजवले जाते.  त्यांची शिंगे रंगवली जातात. त्यांना माळा घातल्या जातात आणि त्यांची पूजा-ओवाळणी करून समृद्धीची प्रार्थना केली जाते.वारली घरांमध्ये या दिवशी जेवणात पानमोडी, चवळी आणि करांदे यासारखे खास पारंपरिक पदार्थ रांधले जातात.  Diwali is a festival of nature, labor and faith

पानमोडी हा पदार्थ करताना नवीन भाताच्या पिठीत किसलेली काकडी आणि गुळाचे सारण भरलेले गोळे चाईच्या पानावर वाफवले जातात. करांदे ही एक फळभाजी आहे. पावसाळ्यात परसबागेत सरी तयार करून त्यात करांद्याचे वेळ लावतात. दिवाळीच्या सुमारास वेलांवर काही काळे आणि काही पांढरे गोल आकाराची फळे पिकतात. त्यांचे काप उकडल्यावर त्यांची चव बटाट्यासारखी असते. वारली भाषेत चवळीला ‘चवला’ म्हणतात. वारली पाड्यांवरचे लोक स्वतः पिकवलेली चवळी उकडून त्यात मीठ घालून आवडीने खातात. या पदार्थांमध्ये निसर्गाचे आणि शेतीचे प्रतीकात्मक महत्त्व आहे.

आपल्या जनावरांना उत्तम आरोग्य मिळावे, कुणी केलेल्या करणीची त्यांना बाधा होऊ नये म्हणून वारली लोक सणाच्या दिवशी ‘अग्नी पूजा’ हा विधी करतात. या विधीत भाताचं तणीस पेटवून गायी, बैल, म्हशी आणि बकरी या सगळ्या जनावरांना त्याच्यावरून चालवत नेतात. दिवाळीत वारली लोक वाघ्या, हिरवा, हिमाई, कन्सारी, नरानदेव आणि चेडोबा या देवतांची उपासना करतात. झेंडूची फुले, चवळी, करांदे आणि पानमोडीचा प्रसाद देवांना अर्पण केला जातो. निसर्गाच्या कृपेने सुगीच्या दिवसात पिकांच्या काढणीमुळे  सुबत्ता आल्याबद्दल देवाप्रति कृतज्ञता आणि आनंद व्यक्त करण्यासाठी वारली हा उत्सव साजरा करतात.

कोरकू आणि गोंड (मेळघाटातील दिवाळी)

महाराष्ट्राच्या मेळघाट परिसरात कोरकू आणि गोंड (टाटिया) जनजाती मोठ्या संख्येने वास्तव्य करतात. या भागातील जनजातीय समुदाय पिढ्यानपिढ्या शेतीधंदा व पशुपालन करत आहेत.  त्यामुळे दिवाळी आणि सणाच्या पूर्वसंध्येला गायी-बैलांची पूजा हा त्यांच्या उत्सवातील अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. कोरकू बायका दिवाळीच्या दिवशी पहाटे लवकर उठून घर स्वच्छ करतात. पांढऱ्या मातीने घराच्या भिंती पोतल्या जातात आणि गायीच्या शेणाने जमीन सारवली जाते. त्यानंतर तांदळाचा भात, गव्हाची पोळी, साखरेची लापशी, तुरीची कढी यासारखे पारंपरिक पदार्थ रांधले जातात. 

जेवल्यावर समुदायातील सर्वजण नदीकिनारी जातात. बायका नदीत कपडे धुतात, तर पुरुष गायी-बैलांना धुऊन आणतात. संध्याकाळी आई-वडील किंवा आजी-आजोबा यासारख्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती गायींची पूजा करतात. गायींना कुंकू लावून त्यांच्याजवळ दिवा लावला जातो. हा दिवा लक्ष्मीपूजनापर्यंत तेवत ठेवतात. त्यानंतर बैलांची पूजा केली जाते. सर्व घरातील लोक उभे राहून गायींवर तांदळाच्या अक्षता टाकत गोमातेची स्तुती करणाऱ्या आरत्या आणि गीते म्हणतात. आरती म्हणताना पुरुष खिचडीने भरलेल्या सुपड्या हातात धरतात, तर इतर सर्वजण गायीच्या पावलांशी जुळून नमस्कार करतात. पूजेतील खिचडी गायी-बैलांना नैवेद्य म्हणून दिली जाते. नंतर गावात सर्वजण जनावरांच्या भोवती फटाके फोडून आनंद व्यक्त करतात.  याने उत्सवाचा रंगतदार समारोप होतो. Diwali is a festival of nature, labor and faith

मेळघाटातील गोंड (टाटिया) जनजातीचे लोकदेखील दिवाळी उत्सव साजरा करतो. दिवाळीच्या संध्याकाळी टाटिया पुरुष ढोलकी व बासरी वाजवत गायींना खिचडी देण्यासाठी गावोगावी फिरतात. सकाळी मानगट कव्हर, तोर, तांदूळ-झोळ व भाजी देऊन जनावरांच्या मालकांचा सत्कार केला जातो.  या देवप्रसादानंतर गोंड समाज संपूर्ण झाडाखाली बसून गावाच्या नियोजनासाठी चर्चा करतो. यामध्ये पुढील वर्षीच्या गायींच्या चराईची पद्धत ठरवली जाते आणि मोबदला निश्चित केला जातो. अशा रीतीने मेळघाटातील कोरकू आणि गोंड समूहांच्या दिवाळी उत्सवामध्ये पशुधनपूजा, सामुदायिक एकात्मता आणि भविष्याची योजना यांचा सुसंगत समावेश दिसतो. महाराष्ट्र राज्याच्या बाहेरदेखील छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, ओडिशा , गुजरात अशा विविध राज्यातील जनजाती समूह दिवाळी हा सण उत्साहात साजरा करतात. 

गोंडांची दिवाळी (देवरी)

छत्तीसगडच्या बस्तर प्रदेशातील गोंड जनजाती दिवाळी हा सण ‘देवरी’ या नावाने साजरा करते.  हा सण गोंडांच्या कृषी-संस्कृतीशी घट्ट जोडलेला आहे. या दिवशी ते गायी-बैल, शेतमाल आणि श्रमिकांचे पूजन करतात. गोंड जनजातीय पृथ्वीदेवतापूजक असल्याने ते मातीला, पिकांना आणि जनावरांना दिव्याच्या प्रकाशात देवस्वरूप मानतात. त्यांच्या मते मातीदेवी म्हणजेच शितलामाता त्यांच्या पिकांची काळजी घेते आणि भरघोस उत्पादनाचे वरदान देते. म्हणूनच देवरी सण हा निसर्ग, श्रम आणि श्रद्धेचा संगम ठरतो.

या दिवशी धोरई (गायी-पालक) आपल्या कामगारांचे आणि जनावरांचे आभार मानतात. देवरीच्या पूर्वसंध्येला संध्याकाळी गावातील ‘ताटांगण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वृद्ध महिला घराघरांत जाऊन विशेष गाणी म्हणतात. त्या गाण्यांद्वारे तरुण मुलींना घराबाहेर येऊन उत्सवात सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं जातं. या लोकगीतांमध्ये गोंड समाजाच्या पुराणकथांचा उल्लेख दिसतो.  विशेषतः इशर आणि गौरा या आद्य गोंड दांपत्याच्या विवाह कथेची गोष्ट सांगितली जाते. देवरीच्या रात्री साड्या नेसलेल्या गोंड तरुणी, हातात दिवे घेऊन गावभर नाचत-गात इशर आणि गौरा यांच्या पहिल्या गोंड विवाहाच्या वरातीत सहभागी होतात. दिव्यांच्या प्रकाशात संपूर्ण गाव सुख-समृद्धीच्या आरतीने उजळून निघतो. 

देवरीनंतरच्या दिवशी गायी-बैलांना स्वादिष्ट पदार्थांचा नैवैद्य अर्पण केला जातो. गावातील सर्व महिला एकत्र येऊन पाच प्रकारच्या जंगली भाज्या, काकडी, गव्हाचे लाडू, पिठले आणि ज्वारीची खिचडी तयार करतात. हे पदार्थ गायी-बैलांना अर्पण करून त्या निसर्गमातेला आणि श्रमशक्तीला कृतज्ञतेने वंदना करतात. त्यानंतर जनावरांना कुंकू-तांदळाने सजवून त्यांच्या चरणी दिवे लावले जातात. शेवटी संपूर्ण गावात ढोल-ताश्यांच्या गजरात नृत्य-गानाचा आनंदोत्सव सुरू होतो. Diwali is a festival of nature, labor and faith

तेलंगणातील राज गोंडांचा घुसडी उत्सव

तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील राज गोंड जनजातीय दिवाळीपूर्वी “घुसडी” किंवा “दांडारी” म्हणून ओळखला जाणारा एक भव्य लोकउत्सव साजरा करतात. हा सण दिवाळीच्या जवळपास एक आठवडा आधी सुरू होतो आणि अमावास्येपर्यंत चालतो. आदिलाबाद जिल्ह्यातील गोंड जनजाती बहुल गावांमध्ये या काळात निसर्ग, लोककला आणि श्रद्धेचं अनोखं दर्शन घडतं. घुसडी उत्सव हा केवळ नृत्य-संगीताचा सण नसून गोंड समुदायाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचं प्रतीक आहे.

उत्सवाच्या प्रारंभी दांडारीकर्मी नावाचे लोक पाद्मलपुरी खोल्याकडे (देवस्थानाकडे) जाऊन गोदावरी नदीला नैवेद्य अर्पण करतात. गोदावरी ही महत्वाची पवित्र नदी आहे अशी गोंडांची श्रद्धा असते.  ती त्यांच्या शेतीला, जीवनाला आणि निसर्गाला पोषण देते. त्यामुळे त्यांच्या मते ती देवता आहे.  यानंतर हवनयज्ञ आणि विविध पूजाविधींनी उत्सवाची सुरुवात केली जाते.

उत्सवाच्या काळात संपूर्ण गाव नृत्य आणि संगीताच्या सुरांनी भारून जातं. घुसडी नर्तक पारंपरिक वाद्ये बाजा, मृदंग आणि ढोल यांच्या साथीने रात्रभर नाचतात. ते मोरपिसांनी आणि फुलांनी सजवलेल्या रंगीबेरंगी टोपी घालतात ज्यातून त्यांच्या निसर्गाशी असलेले निकट संबंध दिसून येतात . रात्रीच्या वेळी गावागावांमधील मंडळी एकत्र येऊन हे नृत्य करतात. संपूर्ण प्रदेश उत्सवाच्या रंगात न्हाऊन निघतो. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दिवाळीच्या पूर्वसंध्येला ‘देवाडी’ नावाचा विशेष धार्मिक विधी पार पाडला जातो. या विधीत देवतांना विविध वस्तू अर्पण करून, नृत्य आणि सामूहिक प्रार्थनेद्वारे वर्षभरासाठी सुख-समृद्धीची प्रार्थना केली जाते.

या काळात गोंड समूहात सामाजिक ऐक्य आणि आपुलकीचा भाव विशेषतः जाणवतो. लोक एकमेकांच्या घरी भेट देतात, देवपूजा करतात. नवविवाहित महिलांचे स्वागत करतात. सर्वजण पारंपरिक नृत्यात सामील होतात. या सणात वय, जाती किंवा सामाजिक स्तर यांचे भेद न ठेवता सर्व गावकरी सहभागी होतात. आजही आधुनिकतेच्या वाऱ्यात गोंड समुदायाने घुसडी उत्सवाच्या परंपरा आणि मूल्ये जपली आहेत. गोंड नेते आणि कलाकार हे उत्सवाचे लोकनृत्य, वेशभूषा आणि लोकसंगीत संवर्धित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.  Diwali is a festival of nature, labor and faith

भिल्लांची दिवाळी – गाय-गोहरी

मध्य भारतातील भिल्ल समुदायाची “गाय-गोहरी” दिवाळी ही केवळ पशुपूजेचा सण नाही. ती त्यांच्या संपूर्ण जीवनतत्त्वज्ञानाशी आणि पुराणपरंपरेशी जोडलेली एक गूढ धार्मिक परंपरा आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी सुरू होणारा आणि दुसऱ्या दिवशी चरमसीमेवर पोहोचणारा हा सण भिल्ल समाजाच्या निसर्गनिष्ठ श्रद्धा, प्राणीप्रेम आणि सामूहिक भक्तीभावाचे प्रतीक आहे.

कार्तिक कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी भिल्ल पुरुष गरम लोखंडी सळईवर चिखल थापून त्याने गायी-बैलांना हलकासा चटका देतात. त्यांच्या श्रद्धेनुसार या क्रियेमुळे जनावरांना आजार होत नाहीत आणि “वाईट नजरेचा प्रभाव” नाहीसा होतो.  यानंतर जनावरांना जवळच्या नदी, तलाव किंवा ओढ्याकाठी नेऊन स्नान घातले जाते. दिवाळीच्या सकाळी सूर्य उगवल्यानंतर गायी, बैल, म्हशी यांच्या शिंगांवर कुंकू, तेल आणि रंगाचे रोगण लावून त्यांची सजावट केली जाते. त्यांच्या अंगावर फुलांची चित्रे आणि वर्तुळाकार नक्षी रंगवली जाते. गायींच्या डोक्यावर मोरपिसे, कृत्रिम फुले बांधली जातात. त्याला जादुई रक्षणाचे प्रतीक मानले जाते. जनावरांना मका आणि डाळी एकत्र शिजवून खाऊ घालतात. हे त्यांच्या प्रेम आणि कृतज्ञतेचे प्रतीक असते.

दिवाळीनंतरच्या दिवशी पुरुष गायी-बैलांची विधिपूर्वक पूजा करतात. पाणी आणि तांदूळ उधळून कपाळावर कुंकू-तांदळाचा टिळा लावतात. त्यानंतर जनावरांची गावभर मिरवणूक निघते. ढोल, थाळ्या आणि गाण्यांच्या तालावर गावात उत्साहाचे वातावरण तयार होते. गावप्रमुख (तडवी) ज्या मार्गाने गायी-बैल जाणार असतात त्या मार्गावर  कोंबड्याची बळी  देऊन रक्त त्या मार्गावर पसरवतो. या विधीमुळे पशुधनाला आजार होत नाहीत आणि उपासक सुरक्षित राहतात अशी त्यांची श्रद्धा आहे.

सर्व जनावरं एकत्र आल्यावर त्यांना तोरणाखालुन (मोरपिस आणि आंब्याच्या पानांनी सजवलेल्या द्वाराखाली) नेलं जातं. तोरणावर गूढ मंत्र लिहिलेल्या कापडं आणि कांस्यपत्राच्या माळा लटकवलेल्या  असतात. या तोरणाखालून गेल्यावर सर्व रोग नष्ट होतात अशी श्रद्धा आहे. त्या ठिकाणी दिवा, अगरबत्ती आणि धूप पेटवला जातो. प्रथम गायीचे वासरू तोरणाखाली नेले जाते आणि त्यानंतर इतर जनावरांना तिथून नेलं जाते.

या प्रसंगी काही तरुण गावकरी डोळे झाकून जमिनीवर आडवे पडतात आणि धावत येणारी जनावरे त्यांच्या अंगावरून पाय ठेवून जातात. हा त्यांचा दैवी भक्तिभावाचा विधी मानला जातो. नंतर धूपाचा धूर हुंगून ते स्वतःला शांत करतात. त्यावेळी त्यांचे नातेवाईक ढोल-ताश्यांच्या नादात नृत्य आणि गाण्यांद्वारे आनंदोत्सव साजरा करतात. घरी परतल्यावर घराच्या दाराशी अंडी आणि दूध ठेवून ती वासिंग नागदेवतेसाठी अर्पण करतात.  नंतर या वस्तू वाळवीच्या वारुळाजवळ ठेवतात. शेवटी बोकड आणि कोंबड्यांची बळी दिला जातो. त्याचा स्वयंपाक केला जातो. स्त्रिया भाकरी आणि भात बनवतात.   Diwali is a festival of nature, labor and faith

भिल समाजाची दंतकथा – “धर्मी राजा आणि गाय रूपन”

धर्मी राजा आणि गाय रूपन यांची प्रसिद्ध कथा या सणाशी निगडित आहे. धर्मी राजा हा बाबा देव आणि कालका राणीचा पुत्र होता. त्याचं लग्न ढोलका राणीशी होतं. लग्नानंतर सासरकडून त्याला रूपन नावाची गाय भेट मिळते. पण ती लंगडी असल्याचं कळल्यावर धर्मी राजा संतापतो. पत्नीला सांगतो की तिला ती गाय हवी असेल तर तिने त्या गायीसोबतच राहावे. ढोलका राणी असहाय होऊन जवळच्या वारुळात वास करणाऱ्या वासिंग नागदेवतेला प्रार्थना करते. नागदेवतेच्या सांगण्यावरून ती आपले बोट कापून काही थेंब रक्त दगडावर टाकते.  त्या ठिकाणी एक मोठी खड्डा निर्माण होतो. त्या खड्ड्यात ती लंगडी गाय ढकलते आणि नवऱ्याच्या मागे निघते. धर्मी राजाला स्वप्नात आवाज येतो “तू  दगडावर रक्त सांडले आहेस  तुला बाराशे गायी मिळतील.” तो तिथे परत जातो. तिथे त्याला एकामागोमाग गायी खड्ड्यातून बाहेर येणाऱ्या गायी दिसतात. पण त्याने मागे वळून पाहताच त्या गायी बाहेर येणं थांबते  आणि फक्त एक बैल उरतो. त्यामुळे आजही गायींची संख्या बैलांपेक्षा जास्त आहे, अशी भिलांची श्रद्धा आहे.“गाय-गोहरी” सण भिल समाजात धर्मी राजाची स्मृती, गोमातेचा सन्मान आणि निसर्गाशी एकरूपतेचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो.

संथाळ समुदायांची दिवाळी – सोहराय पोराब

झारखंड आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशांमध्ये राहणाऱ्या संथाळ हा जनजातीय समुदाय  दिवाळीनंतर ‘सोहराय पोराब’ हा अत्यंत महत्वाचा सण साजरा करतो. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात केंद्रस्थानी गायी-बैल आणि शेती हे घटक असतात. सोहराय सणाची सुरुवात घराची स्वच्छता आणि सजावट करून होते. प्रत्येक घरातील स्त्रिया माती, कोळसा, फुलांचा रंग आणि नैसर्गिक रंगद्रव्ये वापरून भिंतींवर सुंदर चित्रे रेखाटतात. या सजावटीतून भूमातेचे आभार मानले जातात. शेतीच्या भरभराटीची प्रार्थना केली जाते. या दिवशी वृद्ध स्त्रिया घराच्या अंगणात दिवे लावतात आणि निसर्गाच्या शक्तीला वंदन करतात.

दुसऱ्या दिवशी गावातील सर्व गायी-बैलांना एका ठिकाणी आणून त्यांची पूजा केली जाते. त्यांच्या मानेवर तांदळाचे हार, शिंगांवर कुंकू आणि तेलखुंबी लावली जाते. जनावरांच्या चरणी तेलाचे दिवे लावून लोक समृद्धी व समर्पणाची गाणी गातात. पुरुष आणि स्त्रिया एकत्र येऊन भजनं व नृत्याद्वारे गोमातेचे स्तवन करतात. हा दिवस पशुधनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो. तिसऱ्या दिवशी विवाहित मुली आपल्या आई-वडिलांच्या घरी परत येतात आणि पालकांसोबत हा सण साजरा करतात. या दिवशी गायी-बैलांना मोकळं सोडून त्यांना विश्रांती दिली जाते.  संथाळांच्या मते “जशी माणसाला विश्रांती आवश्यक आहे, तशीच ती जनावरांनाही मिळाली पाहिजे.” Diwali is a festival of nature, labor and faith

चौथ्या दिवशी गावात नृत्याचे कार्यक्रम होतात. तरुण मुलं-मुली गायींना रंगीबेरंगी कपडे आणि फुलांनी सजवतात.  ढोल, मांदर आणि बासरीच्या तालावर नृत्य करतात. गाय-नृत्य हे केवळ मनोरंजन नसून मानव आणि निसर्गातील सजीव नात्याचे प्रतीक आहे. शेवटच्या दिवशी संपूर्ण गाव एकत्र येऊन पशुधनाशी संबंधित व्यवहारांचा आढावा घेतो. कोणी जनावरांशी गैरवर्तन केलं असल्यास त्या व्यक्तीकडून क्षमा मागवली जाते. त्यानंतर गावात अन्नदान आणि समूहभोजन होते.  ज्यातून सामाजिक समरसतेचा संदेश दिला जातो.

उत्तराखंडमधील थारू समुदायाची शरदैया अमावस्या

उत्तराखंडच्या पिथौरागड परिसरातील थारू समुदायाने दिवाळी साजरी करण्याची पद्धत काळानुसार बदलली आहे. पूर्वी थारू लोक दिवाळीला “शरदैया अमावस्या” म्हणून पाळत.  या दिवशी ते मृतकांचे स्मरण  करून त्यांना रोटी अर्पण करत.  अंतिम संस्काराचे विधी पार पाडत असत. गेल्या काही दशकांत या परंपरेत बदल झाला असून आता थारू समाज दिवाळी आनंदात आणि उत्साहात साजरी करतो. लोक गोड पदार्थांचा आस्वाद घेतात, फटाके फोडतात आणि प्रकाशाचा उत्सव साजरा करतात. हा बदल थारू समाजातील सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाचे प्रतिबिंब आहे. 

दक्षिण ओडिशातील दियाली 

दक्षिण ओडिशातील परजा, साओरा आणि गडबा या जनजाती जमातींमध्ये “दियाली” हा सण अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. हा तीन दिवसांचा सण असून गायींची पूजा त्याच्या केंद्रस्थानी आहे. पहिल्या दिवशी लोक आपापल्या गायींना स्वच्छ धुऊन ज्यूटच्या रंगीत दोऱ्यांनी सजवतात आणि त्यांना तांदळाचा नैवेद्य अर्पण करतात. दुसऱ्या दिवशी गोठा स्वच्छ केला जातो, लाल माती आणि तांदळाच्या पिठाने सुंदर अल्पना (रांगोळ्या) काढल्या जातात. त्यानंतर गायींना बांबूच्या भांड्यात खिचडी खाऊ घातली जाते, आणि उरलेले अन्न प्रसाद म्हणून कुटुंबीय खातात. तिसऱ्या दिवशी गवळी (गाई राखणारा) हा उत्सवाचा केंद्रबिंदू बनतो. तो प्रत्येक घरात जाऊन गायींच्या सजावटीचे दोरे गोळा करतो, तसेच गाणी गातो आणि नाचतो. गावकरी त्याला तांदूळ आणि इतर धान्य अर्पण करतात, ज्यातून समाजातील परस्पर ऐक्य व आदर व्यक्त होतो.

डोंगराळ भागात प्रत्येक घरात देवदार आणि पाईनच्या लाकडाचे तुकडे दगडाच्या फळीवर जाळतात, आणि शांती, समृद्धीसाठी प्रार्थना करतात. या प्रकारे, दियाली सणात निसर्ग, जनावरं आणि श्रमशील जीवनाशी जोडलेली अध्यात्मिक भावना दिसून येते — ही दक्षिण ओडिशातील जनजाती संस्कृतीची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे.

गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील जनजातीयांची १५ दिवसांची दिवाळी 

गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील जनजातीय समुदाय दिवाळी हा १५ दिवसांचा सण असतो. त्यात निसर्ग आणि आरोग्याचे विशेष महत्त्व असते. या सणात फटाके फोडण्याऐवजी विभिन्न प्रकारच्या झाडांच्या लाकडांचा धूर तयार केला जातो. त्यामुळे वातावरण शुद्ध होते आणि लोकांचे आरोग्य सुदृढ राहते असे मानले जाते. प्रत्येक दिवशी गावकरी एकमेकांचे आदरपूर्वक स्वागत करतात आणि पारंपरिक नृत्य आणि संगीताद्वारे सणात रंग भरतात.

भरूच जिल्ह्याच्या नेत्रांग आणि सगबारा भागातील जनजातीय या सणात आपल्या देवतांना धान्य व दारू अर्पण करतात.  शेतीसाठी अत्यंत आवश्यक असल्याने गायी-बैल यांची पूजा केली जाते. त्याचबरोबर ते झाडे, नद्या आणि जलस्रोत यांचाही सन्मान करतात.  पृथ्वी आणि आकाश या नैसर्गिक घटकांना  ते आपला मुख्य देव मानतात. सणाचा समारोप मिरवणूक काढून होतो.  त्यात गावातील दुष्ट शक्तींना दूर करण्यासाठी विधी केले जातात. या प्रकारे, भरूचच्या जनजाती समाजाची दिवाळी सामाजिक एकात्मता, निसर्गपूजा आणि आरोग्याच्या किमतीवर आधारित असते, ज्यातून सांस्कृतिक समृद्धी आणि पर्यावरणीय संवेदनशीलता दिसून येते. Diwali is a festival of nature, labor and faith

Tags: Diwali is a festival of natureGuhagarGuhagar Newslabor and faithLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share32SendTweet20
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.