चिपळूण नगर परिषद कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या सूचना
गुहागर, ता. 01 : चिपळूण आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात नियुक्त असताना सतर्क रहा, सर्व नोंदी व्यवस्थित घ्या, अशा सूचना प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, कार्यालय अधिक्षक अनंत मोरे यांनी शुक्रवारी नगर परिषद कर्मचाऱ्यांना दिल्या. तसेच हलगर्जीपणा झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते याची कल्पनाही दिली. Disaster control room alert

शुक्रवारी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी ठसाळे, कार्यालय अधिक्षक श्री. मोरे यांनी १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी सुरु राहणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात रात्रपाळीसाठी नियुक्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पावसासह नद्यांच्या पाणीपातळीच्या सातत्याने नोंदणी कशा ठेवाव्यात, पाणी भरत असल्यास नागरिक, व्यापारी यांना सतर्क कसे करावे, किती पाणी पातळी झाल्यावर किती भोंगे वाजवावेत, नियुक्त पथक प्रमुखांना माहिती कशी द्यावी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उद्यान विभागाचे प्रमुख बापू साडविलकर, राजेंद्र खातू, आरोग्य विभागाचे प्रमुख वैभव निवाते, संतोष शिंदे आदी उपस्थित होते. Disaster control room alert

गतवर्षी आलेल्या महापुरात शहराचे अतोनात हाल झाले. करोडो रुपयांची हानी झाली. याचा फटका नगर परिषदेलाही बसला. तळमजल्यावरील विभागांची कागदपत्रे भिजली. संगणकीय यंत्रणाही पाण्यात बुडाली. अनेक इमारतींचेही मोठे नुकसान झाले. या हानीचे सर्व खापर एकंदरीत प्रशासनासह नगर परिषदेच्या माथी मारण्यात आले. त्यामुळे यावर्षी पूर आल्यास अशी परिस्थिती उद्भवू नये, म्हणून प्रशासनाने कंबर कसली आहे. दिवसाआड आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका घेऊन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. Disaster control room alert
