क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे, खात्यातील कामांचा घेतला आढावा
गुहागर : फुटबॉल किंवा हॉलीबॉल सारखी मैदाने तयार होतात. परंतु त्याला फारसा प्रतिसाद नसतो. त्यामुळे जिल्ह्यात कबड्डी, खो-खो, मल्लखांब आदि स्थानिक खेळांसाठीची मैदाने विकसित करा. अशी सूचना क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांना केली. एक दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या राज्यमंत्री आदितीताईंनी आज रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात आपल्या खात्याच्या कामांचा आढावा घेतला.
क्रीडा व उद्योग आणि पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे रत्नागिरी जिल्ह्यात एक दिवसाच्या दौऱ्यावर आल्या होत्या. या दौऱ्यात क्रीडा आणि पर्यटन विभागाच्या कामांची माहिती त्यांनी जाणून घेतली. रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदूराणी जाखड, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकाम महामंडळाचे प्रशांत पडळकर आदी अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी क्रीडा संकुले, मैदाने यांची कामे ठेकेदारांनी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे तालुकास्तरावर निर्माण करावयाच्या क्रीडा संकुलांची कामे अपूर्ण आहेत. अशी माहिती क्रीडा अधिकारी बोरवडेकर यांनी दिली. त्यावर या सर्वांचा प्रस्ताव मंत्रालयात सादर करा. प्रलंबित असणाऱ्या सर्व क्रीडासंकुल व इतर क्रीडा सुविधांची कामे लवकर पूर्ण करा. त्यासाठी नव्याने प्रक्रिया राबवा. असे निर्देश राज्याच्या क्रीडा व उद्योग आणि पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी बैठकीत दिले.
त्याचवेळी फुटबॉल किंवा हॉलीबॉल सारखी मैदाने तयार करु नका. ही मैदाने तयार होतात परंतु या खेळांना फारसा प्रतिसाद नाही. त्याऐवजी त्याच मैदाना कबड्डी, खो-खो, मल्लखांब आदि स्थानिक खेळांसाठीची मैदाने विकसित करा. जेणेकरुन शालेय विद्यार्थ्यांपासून ते युवकांपर्यंत सर्वांना खेळांचा सराव करणे सोपे होईल. असेही क्रीडा राज्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.
पर्यटन स्थळे विकसित करताना राज्य पुरातत्त्व खात्याच्या नियंत्रणात असणाऱ्या गडकिल्ल्यांना निधी देऊन पर्यटन क्षेत्र विकसित करण्याचा आराखडा सादर करा. असे निर्देश त्यांनी यावेळी पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. क वर्गातील पर्यटन स्थळे दर्जा बदलून ब वर्ग पर्यटन स्थळे करण्याबाबतचा प्रस्ताव देखील जिल्हा परिषदेने सादर करावा. अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या.
कबड्डीच्या मैदानांसाठी हवा पाठपुरावा
क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरेंनी स्थानिक मैदानांबाबत केलेल्या सूचनेचे खेळांडूंकडून स्वागत होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कबड्डी हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. गावागावातून कबड्डी स्पर्धाही भरविल्या जातात. मात्र या खेळाचा सराव करण्यासाठी खेळाडूंना स्वमेहनतीने मैदान तयार करावे लागते. क्रीडा विभागाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण भागाच्या केंद्रस्थानी असलेल्या शाळेत जर अशी मैदाने तयार झाली तर ग्रामीण भागातील खेळाडूंना त्याचा सर्वाधिक फायदा होईल. त्यामुळे राज्यमंत्री आदिती तटकरेंच्या सूचनेची अंमलबजावणी होण्यासाठी कबड्डी संघटनांनी आग्रहाने पाठपुरावा करणे आवश्यक आहे.