जैन समाज आक्रमक; कबुतरखान्याच्या शेडची केली तोडफोड
मुंबई, ता. 06 : दादरच्या कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवण्यासाठी आज बुधवारी सकाळी जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. कबुतरखान्यावरील ताडपत्री जैन बांधवांकडून काढण्यात आली. अनेक महिलांनी कबुतरखान्यात घुसून बांधलेली ताडपत्री काढली. तसेच कबुतरखान्यावर बांधण्यात आलेले बांबू देखील महिलांकडून हटवण्यात आले. जैन समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. Controversy over pigeon coop in Dadar

मुंबई महानगरपालिकेने दादर कबुतरखाना ताडपत्रीने झाकून बंद केल्यानंतर जैन समाज नाराज झाला होता. याविरोधात जैन समाजाने मोर्चाही काढला होता. तर राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही दादर कबुतरखाना बंद होऊ नये, यासाठी कंबर कसली होती. आज, सकाळी दादरमधील जैन मंदिरात झालेल्या प्रार्थना, सभेनंतर अचानक एक मोठा जमाव रस्त्यावर आला. पुरुष-महिलांचा समावेश असलेल्या या जमावाने थेट कबुतरखान्याच्या दिशेने कूच केली. यावेळी पोलिसांनी जमावाला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना धक्काबु्क्की करत या जमावाने थेट कबुतरखान्याच्या दिशेने धाव घेतली. मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने बंद करण्यात आलेला कबुतरखाना खुला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी शेडची तोडफोड करण्यात आली. ताडपात्री हटवण्याचा प्रयत्न केला. Controversy over pigeon coop in Dadar
समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये कबुतरखान्यांवरुन मोठा वाद सुरु आहे. हायकोर्टाच्या निर्णयानंतर दादरमधील कबुतरखान्यावर महापालिकेने कारवाई केली होती. पालिकेने याठिकाणी ताडपत्री झाकत हा कबुतरखाना बंद केला होता तसेच त्यांना खाद्य घालण्यासही बंदी करण्यात आली होती. या कारवाईनंतर जैन समाज नाराज झाला होता. आज सकाळी जैन बांधवांनी याठिकाणी गर्दी केली. यावेळी आक्रमक झालेल्या जमावाने कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवली तसेच तोडफोडही केली. महिला, तरुणांचा यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. अचानक झालेल्या या राड्याने पोलिसांचीही धावपळ झाली. पोलिसांनी आक्रमक झालेल्या आंदोलकांची धरपकड सुरु केली आहे. Controversy over pigeon coop in Dadar