चिपळूण सायकलिंग क्लबची स्पर्धा ; आर्या कवळे घाटाची राणी
गुहागर, ता. 06 : चिपळूण सायकलिंग क्लबने रविवार १ मे २०२२ रोजी बहादुरशेख नाका ते कुंभार्ली घाटमाथा या २९ किमीच्या मार्गावर भव्य राज्यस्तरीय सायकल स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये संपूर्ण राज्यातून अनेक नावाजलेले सायकलपटू सहभागी झाले होते. यामध्ये जिल्हास्तरीय गटात दापोली सायकलिंग क्लबच्या प्रशांत पालवणकरने प्रथम क्रमांक मिळवत कुंभार्ली घाटाचा राजा किताब जिंकला तर खेड सायकलिंग क्लबची आर्या कवळे ही कुंभार्ली घाटाची राणी बनली. Competition of Chiplun Cycling Club


घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे प्रशांत पालवणकर यांच्याकडे चांगली गिअर सायकल नाही. पण तरीही न डगमगता, त्यावर मात करुन आपल्या साध्या सिंगल गिअर फिक्सी सायकलने इतर गिअरवाल्या सायकलस्वारांना मागे टाकत आणि या कुंभार्ली घाटातील खतरनाक चढणे चढवत २२ किमीचे अंतर ५६ मिनिटात पार करत प्रथम क्रमांक मिळवला हे वाखाणण्याजोगे आहे. त्यांचा छोटा भाऊ केतन पालवणकर यांनीही मोठ्या भावाचा आदर्श घेत सिंगल गिअर फिक्सी सायकलने तृतीय क्रमांक मिळवला. नोकरीधंदा सांभाळून सायकलिंगची आवड जपणाऱ्या या मेहनती पालवणकर बंधूंचे सर्वत्र कौतुक होत आहे. Competition of Chiplun Cycling Club


जिल्हास्तरीय गटात द्वितीय क्रमांक चिपळूणच्या रोशन भुरण यांनी पटकावला. जिल्हास्तरीय महिला गटात खेड सायकलिंग क्लबच्या आर्या कवळे यांनी २२ किमीचे अंतर १ तास १५ मिनिटात पार करत प्रथम क्रमांक मिळवत कुंभार्ली घाटाची राणी हा किताब पटकावला.


द्वितीय क्रमांक दापोलीच्या मृणाल मिलिंद खानविलकर यांनी आणि तृतीय क्रमांक चिपळूणच्या धनश्री गोखले यांनी पटकावला. सर्वात लहान सायकलपटू १० वर्षीय दापोलीचे सौरभ अजय मोरे, साईप्रसाद उत्पल वराडकर आणि चिपळूणचे चिन्मय सुर्वे यांनाही उत्तेजनार्थ बक्षिस देऊन गौरवण्यात आले. Competition of Chiplun Cycling Club


राज्यस्तरीय गटात हनुमंत चोपडे यांनी २९ किमीचे अंतर १ तास ९ मिनिटात पार करत प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक सिद्धेश पाटील, तृतीय क्रमांक ओंकार खेडेकर, चौथा क्रमांक आर्यन मारळ, पाचवा क्रमांक विठ्ठल भोसले, सहावा क्रमांक सोहेल मुकादम यांनी पटकावला. या सर्वांचे कौतुक होत आहे.


सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहे. सायकल संस्कृती वाढावी म्हणून चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे अनेक उपक्रम राबवले जातात. सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. Competition of Chiplun Cycling Club

