एस.टी.च्या मालवहातूकीमुळे चिरे व्यावसायिकांना नवी संधी
गुहागर, 03 : गुहागर आगाराने परजिल्हात 670 टन (23हजार 450) जांभा चिरा पोचवून नवा विक्रम केला आहे. 16 जानेवारीपासून दररोज गुहागरमधुन परजिल्ह्यात चिरा वहातुकीचा व्यवसाय एस.टी. करत आहे. फेब्रुवारी अखेर या वहातुकीतून गुहागर आगाराने 6 लाख 88 हजार 398 उत्पन्न मिळविले आहे. गुहागरमधील चिरेखाण मालकांना स्वस्त दरात जिल्ह्याबाहेर चिरा विक्रीची नवी संधी मिळाली आहे.
मे अखेर लॉकडाऊन संपल्यावर तोटा भरुन काढण्यासाठी एस.टी.ने मालवहातुक सुरु केली. गुहागरसारख्या औद्योगिक क्षेत्र नसलेल्या तालुक्यातून माल कसा मिळवायचा हा प्रश्र्न होता. वहातुक नियंत्रक रवींद्र पवार आणि यांत्रिक विभागातील विवेक गानू यांनी मेहनत घेतली. प्रत्यक्ष संवाद आणि सामाजिक माध्यमांमधून एस.टी.च्या माल वहातुकीबद्दल विश्र्वास निर्माण केला. माल वहातुकीची चौकशी करायला येणाऱ्याला नाराज करायचे नाही. हे धोरण ठेवले. याच वेळी पाभरेमधील समीर डिंगणकर यांनी साताऱ्यात चिरा पोचवणार का अशी विचारणा केली. आगार व्यवस्थापक वैभव पवार व अन्य वरिष्ठांशी बोलून डिंगणकर यांना भाडे सांगण्यात आले. ते भाडे ऐकून डिंगणकर आश्चर्यचकीत झाले. इतक्या कमी दरात आपला चिरा जाणार यावर त्याचा विश्र्वासच बसत नव्हता. गुहागर आगाराने पाभऱ्यातील डिंगणकर यांच्या चिरा खाणीतून चिरा उचलून साताऱ्यातील ग्राहकाच्या दारात उतरवला. कमी भाड्यात आणि कमी वेळात चिरा पोच झाल्याने समीर डिंगणकर यांनी एस.टी.ला धन्यवाद दिले. शिवाय अन्य चिरा व्यावसायिकांपर्यंत ही गोष्ट पोचवली.
या भाड्यामुळे आपल्या चिरा वहातुकीत व्यवसायाची संधी असल्याचे पवार व गानूंच्या लक्षात आले. चिरा वहातुकीसाठी व्यावसायिकांजवळ बोलणे सुरु झाले. आगारातील चालक वाहकांनी देखील चिरा वहातुकीचे जिल्ह्याबाहेरील हॉटेल व्यावसायिकांमध्ये मार्केंटींग केले. पावसाळा संपल्यावर या व्यवसायाला गानू आणि पवार यांनी अधिक गती दिली. परिणामी चिरेखाणी सुरु झाल्यानंतर अलिबाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, उरण, बत्तीस शिराळा, विटा, म्हसवड आदी ठिकाणी एस.टी.च्या ट्रकने चिरा वहातूक सुरु झाली. 16 जानेवारीपासून आजपर्यत (45 दिवस) गुहागर आगाराच्या चिरा वहातूकीत खंड पडलेला नाही.
राज्यातील अनेक ठिकाणांहून गुहागरातील चिऱ्याला मागणी आहे. मात्र खासगी माल वहातुकदारांना 15 टनाचा लोड लागतो. एका ठिकाणी इतक्या चिऱ्यांची मागणी नसते. कमी चिऱ्यांना भाडे परवडत नाही. याउलट एस.टी. राज्यातील कोणत्याही गावात 10 टन चिरा कमी दरात पोचवते. त्यामुळे चिरे व्यावसायिकांना परजिल्ह्यात चिरा पोचविणे सोपे झाले आहे. चिरा व्यावसायिकांनी या संधीचे सोने केले पाहिजे.
आनंद कोलगे, चिरेखाण मालक, वरवेली