Chandrayaan 3 Mission : विद्यार्थ्याच्या उत्स्फुर्त प्रतिक्रिया
Guhagar News Special Report : Chandrayan 3 Mission
आज पहिल्यांदाच यान आकाशात कसे उडते ते आम्ही बघीतले. आकाशातून निळी आणि हिरवी पृथ्वी पहायला मिळाली. अशा प्रतिक्रिया आज गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांबरोबर व्यक्त केल्या.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (Indian Space Research Organisation) आज दुपारी 2.35 वा आंध्रप्रदेशामधील सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा (Satish Dhawan Space Centre) येथून लॉन्च व्हेईकल मार्क 3 (LMV 3) या रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात केले.
चंदयानाचे प्रक्षेपण करणाऱ्या रॉकेट (प्रक्षेपणयान)चे नाव एल व्ही एम (LVM ) 3 आहे. या यानाची उंची 43.50 मीटर असून वजन 640 टन आहे. भारतातील हे सर्वाधिक वजनाचे प्रक्षेपण यान आहे. या यानावर चंद्राच्या कक्षेत लॅण्डर, रोव्हर व अन्य उपकरणे घेवून जाण्यासाठी पी.एम. हे उपकरण बसविण्यात आले आहे. याचे वजन 2148 किलो आहे. याशिवाय लॅण्डर 1752 किलो आणि रोव्हरचे वजन 26 किलो आहे. म्हणजे 640 टन प्रक्षेपक यान आपल्यासोबत आणखी 3926 किलो वजनाची उपकरणे घेऊन जाणार आहे. या मोहिमेला 600 ते 615 कोटी रुपये इतका खर्च आला आहे. Chandrayaan 3 Mission


विद्यार्थ्यांनी अनुभवले Chandrayaan 3 Mission
चंद्रयानाचे थेट प्रक्षेपण आज गुहागर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमधुन तसेच माध्यमिक शाळांमधुन विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. हा अभिनव उपक्रम शिक्षक आणि विद्यार्थ्यांना खुप आवडला. हे थेट प्रक्षेपण अत्यंत कुतुहलाने विद्यार्थी पहात होते. आता शाळेतील स्क्रीन विद्यार्थ्यांना इतका परिचित झाला आहे की, अनेक वेळा विद्यार्थी स्क्रीनवर व्हिडिओ पहाताना चुळबुळ करतात. मात्र आज डिजिटल वर्ग खोलीत शांतपणे बसुन विद्यार्थी समोर काय घडत आहे ते पहात होते. अशी प्रतिक्रिया अंजनवेल हायस्कुलचे मुख्याध्यापक गोरीवले सर यांनी दिली. पेवे पारदळेवाडीतील जि.प. शाळेतील शिक्षक दिनेश जानवळकर गुरुजी म्हणाले की, प्रक्षेपणाचे वेळी आम्ही विद्यार्थ्यांना समोर काय घडतयं ते मराठीत सांगत होतो. त्यातील ॲनिमेशनचा भाग विद्यार्थ्यांना खूप आवडला. हेदवी नं. 3 शाळेतील शिक्षक विवेकानंद जोशी म्हणाले की, त्या यानाचा वेग किती आहे ते समजावून सांगितल्यावर विद्यार्थ्यांचा विश्र्वासच बसत नव्हता. गुहागर शाळेतील शिक्षक चंद्रकांत झगडे गुरुजी म्हणाले की, विज्ञानाची प्रगती, चंद्रावर माणुस पोचला आदी गोष्टी विद्यार्थी केवळ ऐकतात. आज प्रत्यक्षात त्यांना चंद्रावरही जात येते हे पहात आले. हा क्षण त्यांच्यासाठी अवर्णनिय होता.
याबाबत विद्यार्थ्यांकडूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. हेदवी नं. 3 शाळेतील वेद मोरे आणि रुद्र जाक्कर म्हणाले की आम्हाला आकाशातून पृथ्वी कशी दिसते ते आज पहायला मिळाले. समुद्रमुळे पृथ्वी आकाशातून निळी दिसते. सध्या पाऊस पडत असल्याने सगळीकडे हिरवेगार झाले आहे त्यामुळे पृथ्वीवरील जमीन आकाशातून हिरवी दिसत होती. पेवे पारदळेवाडी शाळेतील पार्थ पारदळे म्हणाला की विमान आकाशात उडताना पाहीले होते. आज प्रत्यक्षात यान जमिनीवरुन आकाशात कसे जाते. यानाचे काही भाग कसे आपोआप निखळून पडतात ते पहाता आले. Chandrayaan 3 Mission


Chandrayaan 3 Mission
चंद्रयान मोहिम 2 मधील अनुभवावरुन चंद्रयान 3 या मोहिमेत लँडर अधिक मजुबत होण्यासाठी त्याच्या रचनेत सुधारणा करण्यात आली आहे. ऑर्बिटर आणि लँडरमधील संपर्क प्रणाली, चंद्रावरील माहिती इस्त्रोच्या कार्यालयात पाठविणारी प्रणाली कायम सुरु रहावी याची काळजी घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या लँडरमध्ये चंद्रावरील अचुक तापमान, उष्णतेचे वहन किती वेगाने होते, चंद्रावर भुकंपांचे प्रमाण कसे आहे, चंद्रावरील खडक आणि मातीचे विश्लेषण करणे या गोष्टींचा अचूक अभ्यास करणारी व्यवस्था अंतर्भुत करण्यात आली आहे.
या मोहिमेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हे चंद्र यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे . आजपर्यंत कोणतेही यान दक्षिण ध्रुवावर उतरलेले नाही. त्यामुळे Chandrayaan 3 Mission ही मोहिम भारतासह जगभरातील शास्त्रज्ञांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
आज प्रक्षेपित करण्यात चंद्रयान ऑगस्ट अखेरीस चंद्राच्या कक्षेत शिरेल. त्यानंतर चंद्रयानातील लँडर आणि रोव्हर चंद्रावर दिवस सुरु होताना (पहाटेच्या वेळेस) उतरवले जातील. चंद्रावरील एक दिवसात (पृथ्वीवरील 14 दिवस) आवश्यक माहिती गोळा करण्याचे काम केले जाईल.
आजपर्यंत चीन, अमेरिका आणि रशिया या देशांची याने चंद्रावर उतरली आहे. भारताच्या Chandrayaan 3 Missionतील लँण्डर व रोव्हर यशस्वीरीत्या चंद्रावर उतरल्यास भारत चंद्रावर यान उतरविणारा चौथा देश ठरेल.


चंद्रयान मोहिमे नेतृत्त्व महिलेकडे
मंगळयान मोहिम आणि चंद्रयान मोहिम 2 मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रितू करिधाल या चंद्रयान मोहिम 3 चे नेतृत्त्व करीत आहे. लखनौ विद्यापीठातून भौतिकशास्त्रात एमएस्सी केल्यांतर रितू करिधाल यांनी बंगळुरुमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये एरोस्पेस इंजिनियरींग या विषयात उच्च शिक्षण केले. त्यानंतर त्या इस्रोमध्ये काम करु लागल्या. 2007 मध्ये डॉ. एपीजे अब्दुल कलाम यंग सायंटिस्ट हा पुरस्कार त्यांनी मिळवला. मार्स ऑर्बिटर मिशनसाठी इस्रो टीम अवॉडे, एएसआय टीम अवॉर्ड, सोसायटी ऑफ इंडियन एरोस्पेस टेक्नॉलॅजी ॲण्ड इंडस्ट्रीजचा एरोस्पेस वुमन अचिव्हमेंट अवॉर्ड असे अनेक पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत. मंगळयान मोहिमेत त्या डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर होत्या. इस्रोच्या अनेक अंतराळ अभियानात त्यांनी महत्त्वाची भुमिका पार पाडली आहे. म्हणुनच त्यांना रॉकेट वुमन म्हणून ओळखले जाते.


History of Chandrayan Mission
Chandrayaan 1 Mission
भारत सरकारने नोव्हेंबर 2003 मध्ये पहिल्या चंद्र यान मोहिमेसाठी इस्रोच्या प्रस्तावाला मान्यता दिली. पाच वर्षांनंतर 22 ऑक्टोबर 2008 रोजी सतीश धवन अंतराळ केंद्र श्री हरिकोटा येथून चंद्रयान 1 चे प्रक्षेपण PSLV-C 11 रॉकेटद्वारे करण्यात आले. 27 ऑक्टोबर 2008 ला चंद्रयानाने चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला. त्यानंतर चंद्रयानाने चंद्राभोवती प्रदक्षिणा घातली. 12 नोव्हेंबर 2008 ला चंद्रापासून 100 किमी दूर अंतरावरुन चंद्रयान फिरु लागले. या चंद्रयानात भारतासह अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, स्वीडन आणि बल्गेरिया या देशांची वैज्ञानिक उपकरणे बसविण्यात आली होती. भारताने पहिली चंद्रयान मोहिम यशस्वी करुन इतिहास रचला.
पहिल्या चंद्र मोहिमेची सफलता
चंद्राच्या पृष्ठभागाची 70 हजारपेक्षा अधिक छायाचित्रे भारताच्या चंद्रयानाने काढली. यामध्ये पृष्ठभागावरील खड्डे, डोंगर, गुहा आदींचा समावेश होता. या छायाचित्रांमुळे चंद्रावर पाणी असल्याचा ठोस पुरावा भारताने जगातील वैज्ञानिकांना दिला.


Chandrayaan 2 Mission
चंद्रयान -२ ही मोहिम 2007 मध्ये आखण्यात आली होती. या मोहिमेसाठी रशियातील अवकाश संशोधन संस्था भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्त्रो) मदत करणार होती. मात्र तांत्रिक कारणांमुळे रशियाकडुन आवश्यक उपकरणे आपल्याला मिळु शकली नाही. त्यामुळे ही मोहिम 2015 पर्यंत स्थगित करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्त्रोला स्वदेशी बनावटीचे रोव्हर, लँडर बनविण्यासाठी संपूर्ण आर्थिक साह्य करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय शास्त्रज्ञांनी उपग्रह प्रक्षेपण यान मार्क ३ (GSLV MK III -M1), कक्षाभ्रमर (Orbiter), विक्रम लॅंडर ( Lander) व रोव्हर (Rover) आदी सर्व उपकरणे विकसीत केली. त्यानंतर 22 जुलै 2019 ला सतीश धवन अंतराळ केंद्र श्री हरिकोटा येथून चंद्रयान 2 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या चंद्रयानाने देखील चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला. मात्र चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ 2.1 कि.मी. उंचीवर असताना विक्रम या लँडरशी असलेला संपर्क तुटला. Chandrayaan 3 Mission

