ट्रक अर्ध्या पूलावर लटकला; 3 जणांचा मृत्यू
अहमदाबाद, ता. 09 : गुजरातमध्ये मुसळधार पावसात पूल कोसळल्याची एक मोठी घटना समोर आली आहे. बुधवारी सकाळी आणंद आणि वडोदरा यांना जोडणारा 43 वर्ष जुना पूल कोसळला. त्यामुळे अनेक वाहने नदीत पडली. या दुर्घटनेत आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अमित चावडा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले आहे की, आणंद आणि वडोदरा जिल्ह्यांना जोडणारा मुख्य पूल कोसळल्याची माहिती दिली. Bridge collapses in Gujarat


अनेक वाहने नदीत पडल्याने मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करावे आणि वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करावी. हा पूल 43 वर्षे जुना होता. वडोदरा-आनंदला जोडणारा हा गंभीरा पूल प्रचंड वाहतूक असताना कोसळला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अर्ध्या तुटलेल्या पुलावर एक ट्रक लटकलेला दिसत आहे. सध्या बचाव कार्य सुरू आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना सकाळी ८.३० च्या सुमारास घडली. पूल कोसळल्याने दोन ट्रक आणि एका पिकअप व्हॅनसह चार वाहने नदीत पडल्याची माहिती दिली. Bridge collapses in Gujarat


गुजरातमधील आणंद जिल्ह्यातील हा गंभीरा पूल अचानक मधूनच तुटला. हा पूल महिसागर नदीवर होता. आणि तो कोसळल्याने दोन जड ट्रक नदीत पडले. अपघातानंतर स्थानिक प्रशासन आणि आपत्ती निवारण पथके लगेचच घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरू आहे. पाणबुड्यांच्या मदतीने नदीत पडलेल्या चालकांचा आणि इतर संभाव्य जखमींचा शोध घेतला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये पाऊस सुरू आहे. गंभीरा पूल हा मध्य गुजरातमधील महत्त्वाच्या पुलांपैकी एक आहे. तो मध्य गुजरातला सौराष्ट्रशी जोडतो. Bridge collapses in Gujarat