ब्ल्यु फ्लॅग मानांकनाकडे गुहागर, लाडघरची वाटचाल
मयुरेश पाटणकर यांचा सकाळमध्ये प्रसिध्द झालेला लेख
Guhagar News : महाराष्ट्र सरकारने कोकणातील सात समुद्रकिनाऱ्यांचे प्रस्ताव ब्ल्यु फ्लॅग (Blue Flag Beach Accreditation) दर्जा मिळण्यासाठी डेन्मार्कच्या संस्थेकडे पाठविले. त्यातील गुहागर, लाडघरसह 5 किनाऱ्यांना ब्ल्यु फ्लॅग पायलट स्टेजचा दर्जा देण्यात आला. त्याची माहिती प्रसिध्द झाल्यावर सामाजिक माध्यमांद्वारे नकारात्मक बाबीच प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. अजुन जीवरक्षक तैनात केले नाहीत. रस्ताच नाही, कचरा भरपूर आहे. मग कसला हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा समुद्रकिनारा असे प्रश्र्न विचारले जाऊ लागले. काहींनी प्रशासनावर तोंडसुख घेणारे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर पसरवले. काहीजणांकडून आम्हाला असा विकासच नको, असा निराशावादी विमर्श पसरविला गेला. परंतू कोकणातील 5 समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे ब्ल्यु फ्लॅग मानांकन आहे तरी काय, त्याचे निकष काय असतात, त्याचा स्थानिकांना फायदा कसा होणार याबाबत अजुनही अनभिज्ञता आहे. ती दूर करण्याचा हा प्रयत्न आहे.

ब्ल्यु फ्लॅग समुद्रकिनारा म्हणजे काय ?
ज्या समुद्रकिनाऱ्यांवरील कचऱ्याचे व्यवस्थापन केले जाते, प्लास्टीक कचरा समुद्रावर पडणारच नाही याची काळजी घेतली जाते, कायम 24 x 7 जो किनारा स्वच्छ असतो, तेथील समुद्राचे पाणी देखील प्रदुषणमुक्त असते. तसेच ज्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षक तैनात आहेत, आंतरराष्ट्रीय किनारा सुरक्षेचे सर्व नियमांचे काटेकोरपणे केले जाते. अशा पर्यावरणपूरक व पर्यटकांसाठी सुरक्षित समुद्रकिनाऱ्याचे वेळोवेळी परिक्षण केल्यानंतर डेन्मार्कमधील फाऊंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन (FEE) या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून ब्ल्यु फ्लॅग (Blue Flag Beach) हे प्रमाणपत्र समुद्रकिनाऱ्याला देण्यात येते. हे प्रमाणपत्र दरवर्षी किनाऱ्याची तपासणी झाल्यावर Renew होते. Blue Flag Beach Accreditation

ब्ल्यु फ्लॅग समुद्रकिनाऱ्याचा स्थानिकांना फायदा काय ?
एका अर्थाने या किनाऱ्याला मिळालेला हा आंतराराष्ट्रीय दर्जाचा सन्मान आहे. समुद्रकिनारा सुरक्षित झाल्याने पर्यटनामध्ये (Tourism) मोठी वाढ होते. देशी परदेशी पर्यटक या समुद्रावर येत असल्याने पर्यटकांसाठी आवश्यक भौतिक सुविधा देणाऱ्या व्यवसायांमध्ये (केवळ हॉटेल आणि लॉजिंग नव्हेतर प्रवासी वहातूक, बाजारपेठ आदी) वाढ होते. स्वाभाविकपणे रोजगाराची निर्मिती होते. गावातील पायाभूत सुविधांचा विकास होतो. नागरिकांचे जीवनमान उंचावते.

पर्यावरणपूरक समुद्रकिनारा म्हणजे कचरा विरहीत स्वच्छ समुद्रकिनारा एवढेच अपेक्षित नाही. येथील समुद्रजल प्रदुषणमुक्त रहाण्यासाठी त्याची सातत्याने तपासणी होते. प्रदुषणमुक्त जलामुळे समुद्रातील संपत्ती म्हणजे मासे ज्यावर मच्छीमार समाजाचा उदरनिर्वाह होतो त्यांची संख्या वाढेल. तसेच विविध प्रजातीचे माशांचे या समुद्रात मिळू लागतील. समुद्रकिनाऱ्यावरील नष्ट होणाऱ्या वेलवर्गीय वनस्पतींचे संरक्षण केले जाईल. त्याचा फायदा समुद्रकिनाऱ्याची धूप थांबण्यास होईल. त्यामुळे किनाऱ्याचे संरक्षण होईल. ऑलिव्ह रिडले कासव संवर्धनाला गती मिळेल. तसेच किनाऱ्यावरील जैवविविधतेचे (छोटे खेकडे, शंख शिंपल्यातील प्राणी, निळ्या प्रकाशाने उजळणाऱ्या लाटांचे कारण बनणारे सुक्ष्म शेवाळ आदी ) संरक्षण व संवर्धन होईल.

ब्ल्यु फ्लॅग समुद्रकिनारा नामांकन मिळविण्यासाठी कोणते निकष पूर्ण करावे लागतात
ब्ल्यु फ्लॅग समुद्रकिनारा हे आंतरराष्ट्रीय इको लेबल असल्याने अंतिम प्रमाणपत्रासाठी 4 मुख्य गटात विभागलेले 33 कठोर निकष पूर्ण करावे लागतात. यामध्ये समुद्रजलाची गुणवत्ता, किनाऱ्यावरील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन, यासाठी जनजागृती, स्वच्छता, कचरा संकलन, समुद्रकिनाऱ्याचा नकाशा, सुरक्षित क्षेत्र निश्चित करणे, किनारा ध्वजांकित करणे, माहिती फलक लावणे, समुद्रातील प्रदुषण थांबवणे, प्रशिक्षित जीवरक्षक समुद्रकिनाऱ्यावर ठेवणे, बचाव उपकरणे (Rescue Equipment), प्रथमोचार व रुग्णवाहीका सुविधा, दिव्यांगांसाठी विशेष सुविधा, स्वच्छ शौचालय, पिण्याचे पाणी, स्नानगृह, कपणे बदलण्याची व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, वाहनतळ अशा निकषांचा समावेश आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे ब्ल्यु फ्लॅग समुद्रकिनारा ही मान्यता कायमस्वरुपी नसते. दरवर्षी या 33 निकषांवर आधारीत मुल्यांकन केले जाते. त्याची तपासणी प्रथम केंद्रातील अधिकाऱ्यांकडून केली जाते. त्याचा अहवाल डेन्मार्कच्या एफइइ संस्थेकडे पाठवला जातो. त्यानंतर संस्थेद्वारे नियुक्त केलेले अन्य देशातील अधिकारी समुद्रकिनाऱ्याचे परिक्षण करतात. त्यांचा अहवाल मिळाल्यानंतर एफइइ (Foundation for Environmental Education) संस्था हे प्रमाणपत्र देते. अशी प्रक्रिया दरवर्षी घडते.
महाराष्ट्र सरकारने मानांकनासाठी प्रस्तावित केलेले समुद्रकिनारे
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि लाडघर (ता. दापोली), रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, नागांव (ता. अलिबाग) आणि पालघर जिल्ह्यातील पर्णका (डहाणू) येथील समुद्रकिनारे राज्य सरकारने प्रस्तावित केले आहेत. या किनाऱ्यांवर पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रत्येक समुद्रकिनाऱ्याला 4 कोटी याप्रमाणे २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीचा उपयोग समुद्रकिनाऱ्यांवर मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केला जाणार आहे. यात सार्वजनिक शौचालये, पिण्याचे स्वच्छ पाणी, पार्किंग सुविधा, कपडे बदलण्याच्या खोल्या, तात्पुरती दुकाने, कचराकुंडी, जीवरक्षक टॉवर, सौरदिवे, दिशादर्शक मंडळे, पथदिवे, प्रवेश रस्ते, सुरक्षा रक्षक तसेच कचरा व्यवस्थापन यांचा समावेश आहे.

पायलट स्टेज दर्जा : नामांकन मंजूर, मानांकनाकडे वाटचाल
मे 2025 मध्ये कोकणातील सात समुद्रकिनाऱ्यांची निवड ब्ल्यु फ्लॅग नामांकनासाठी करण्यात आली होती. लगेचच या कामाला सुरवात झाली. पहिला टप्पा होता तो या सातही समुद्रकिनाऱ्यांवर कार्यक्रम, उपक्रम, पायाभूत सुविधांच्या विकासाला सुरवात करण्याचा. त्यानंतर नामांकनसाठी या समुदकिनाऱ्याची निवड होणार की नाही हे डेन्मार्कची संस्था ठरवणार होती. Blue Flag Beach Accreditation
कोकणातील सात समुद्रकिनाऱ्यांवर जनजागृती, कचरा व्यवस्थापन, पाण्याची गुणवत्ता तपासणी, पर्यावरण, सुरक्षा अशा वेगवेगळ्या स्तरावरील कामांना सुरवात झाली. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि जल वायु मंत्रालयातर्फे या कामांचे, माहितीचे प्रत्यक्ष समुद्रकिनाऱ्यांवर जावून परिक्षण झाले. त्याचे अहवाल डेन्मार्कमधील फाऊंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन (FEE) या संस्थेकडे पोचले. त्यातून कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नागाव आणि श्रीवर्धन, रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि लाडघर तसेच पालघर जिल्ह्यातील पर्णका या पाच किनाऱ्यांचा समावेश पायलट स्टेज मध्ये करण्यात आला आहे.

ब्ल्यु फ्लॅग च्या दिशेने वाटचाल
आंतरराष्ट्रीय मानांकन मिळाल्यानंतर त्या समुद्रकिनाऱ्याच्या परिसरातील पर्यटन व्यवसायात सुमारे 20 ते 25 % ने वाढ होते. तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेचा स्वनिधी इतका वाढतो की, सुरवातीला सरकारच्या मदतीने सुरू झालेल्या सेवांचा खर्च ती संस्था स्वत:च्या उत्पन्नातून करु शकते. ही गोष्ट भारतातील ब्ल्यु फ्लॅग दर्जा मिळालेल्या समुद्रकिनाऱ्यांवर घडत आहे. हे सत्य अधिकाऱ्यांना समजावे म्हणून अभ्यास दौरा करण्यात आला. या दौऱ्यानंतर या प्रकल्पाकडे पहाण्याची अधिकाऱ्यांची दृष्टीच बदलली. Blue Flag Beach Accreditation

समुद्रकिनाऱ्यांवर वाळु शिल्पासारख्या स्पर्धा घेण्यात आल्या. किनाऱ्याची स्वच्छता राखण्यासाठी जनजागृती, पर्यटन व्यावसायिकांच्या सभा घेणे असे उपक्रम राबवले जाऊ लागले. शासनाकडून ब्ल्यु फ्लॅगसाठी आवश्यक पायाभुत सुविधांच्या निर्मितीसाठी निधी दिला गेला आहे. आत्पकालिन स्थितीत उपयोगी पडतील अशा साधनांची खरेदी, जीवरक्षकांना प्रशिक्षण, समुद्रकिनाऱ्यावर माहिती फलक अशी कामे झाली आहेत. वाहनतळ, किनाऱ्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण किंवा नव्याने निर्मिती अशी कामे पटलावर आहेत. मानांकनामधील सर्व 33 मुद्द्यांचा परिपुर्णतेकडे वाटचाल सुरू गतीने सुरू झाली आहे. या कामांचे पुन्हा एकदा केंद्र सरकारकडून परिक्षण होईल. त्यानंतर एफइइ कडून पहाणी झाल्यावर प्रत्यक्ष ब्ल्यु फ्लॅग समुद्रकिनारा हा दर्जा या समुद्रकिनाऱ्यांना मिळेल.

सकारात्मक परिणाम समोर
ब्ल्यु फ्लॅग पायलट स्टेजनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील दोन्ही समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता विषयाला गती मिळाली. वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून किनारा स्वच्छता मोहिमा राबविण्यात येत आहेत. परिणामी समुद्रावरील प्लास्टीक कचरा संकलनाचे प्रमाण सातत्याने होणाऱ्या स्वच्छतेमुळे कमी होऊ लागला आहे. लाडघरमध्ये प्लास्टीक बाटल्याना समुद्रावर नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांना सूचना देण्याचे काम समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आलेत. त्यामुळे समुद्रावरील अपघातांची संख्या घटली आहे. प्रत्यक्ष किनाऱ्यांवर वाहने नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून समुद्रकिनाऱ्यावरील जैवविविधतेचे संवर्धन होत आहे.

लाडघर एक पाऊल पुढे
ब्ल्यु फ्लॅगच्या पायलट स्टेजला मंजूरी मिळाल्यानंतर लाडघरमध्ये पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. समुद्रकिनाऱ्यांवरील स्वच्छतेसाठी जनजागृती करणे, किनारा स्वच्छ ठेवणे हे येथील आव्हान होते. येथील ग्रामपंचायतीने पहिली पायरी म्हणून समुद्रकिनाऱ्यावर प्लास्टीक बाटल्या, खाद्य पदार्थांच्या पिशव्यांना बंदी घातली. मनुष्याकडून किनाऱ्यावर होणारी कचरा निर्मिती रोखण्यासाठी, किनाऱ्यावर मद्यप्राशनाला विरोध म्हणून पर्यटन व हॉटेल व्यावसायिकांनी रात्री 10 नंतर फूड पार्सल सेवा बंद केली. समुद्रकिनाऱ्यावर मद्यप्राशनाला बंदी असते त्याची काटकोर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न सुरु केलाय. या निर्णयांमुळे किनाऱ्यावर कचराच होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याचा परिणाम म्हणून फॅमिली घेवून पर्यटनाला येणाऱ्यांची संख्या वाढली. गेल्या दोन महिन्यात 3 विदेशी पर्यटक लाडघरमध्ये प्रथमच राहून गेले. सध्या लाडघरच्या समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षित क्षेत्र निर्माण करणे, किनाऱ्यापर्यंत पोचणारे रस्ते, किनाऱ्याचा विकास आराखडा बनविणे, पर्यटनवाढीसाठी किनाऱ्यावर पायाभूत सुविधांची निर्मिती अशी कामे सुरू आहेत.

गुहागरमध्ये येतात दिड लाखाहून अधिक पर्यटक
गुहागर शहरात दरवर्षी 1 लाख 65 हजार हून अधिक पर्यटक (Tourist). तालुक्याचा विचार केला तर ही संख्या 2 लाखाहून अधिक आहे. तालुक्यात कुठेही व्यवस्था झाली नाही म्हणून परत जाणाऱ्या पर्यटकांची संख्या 1 लाख 12 हजार आहे. या पर्यटकांची निवास व्यवस्था गुहागर शहरातील 180, तर तालुक्यातील 800 पर्यटन व्यावसायिक करतात. पर्यटन व्यवसायातून एकट्या गुहागर शहरात होणारी आर्थिक उलाढाल 14 कोटीहून अधिक आहे. Blue Flag Beach Accreditation मिळाल्यानंतर ही संख्या किनाम 5 पटीने वाढेल असा शासकीय सर्व्हे सांगतो. म्हणजेच आजच्या पर्यटनाचे दिवसांत 70 लाखाने टर्न ओव्हर वाढेल. लाडघरमधील परिस्थिती काही वेगळी नाही. खुद्द लाडघरमध्ये पर्यटकांची निवासाची व्यवस्था कमी आहे. बुरोंडी, दापोली येथे राहून पर्यटक लाडघरच्या समुद्रकिनाऱ्यावर येतात.

गुहागरमध्ये शासनांतर्गत समन्वय नाही
गुहागरमधील Blue Flag Beach Accreditation साठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पर्यटन महामंडळाची नेमणूक केली आहे. पर्यटन महामंडळाद्वारे समुद्रकिनारा (Guhagar Beach) आणि सुरू बनातील जमीनीची मोजणी करण्याची हालचाल सुरु आहे. मात्र या जमीनीची मालकी असलेले बंदर. पतन आणि वन विभागाचे अधिकारी मोजणीसाठी पुढेच येत नाहीत. भूमि अभिलेख कडून जमीन मोजणीबाबत अनास्था आहे. सुरूबनामधील जुन्या झाडांचे व कांदळवनाचे सर्वेक्षण करण्याचे काम वन विभागाने केलेले नाही. महसुल स्वत:च्या ताब्यात असलेल्या पोलीस परेड मैदानावरील हक्क सोडण्यास तयार नाही. समुद्रकिनाऱ्यालगत वाहनतळ, समुद्रकिनाऱ्यावर पोचण्यासाठीचे रस्ते बनविणे यासाठी भुसंपादन करायला लागणार आहे. त्यासाठी पुरेसा निधी पर्यटन महामंडळाकडे नाही. शासनाच्याच विभागांमध्ये समन्वय नसल्याने येथील कामे गतीने पूर्णत्वाकडे जाताना दिसत नाहीत.
गुहागरचा समुद्रकिनारा खरोखरच ब्ल्यु फ्लॅग मानांकित बनवायचा असेल तर गुहागर नगरपंचायत, एमसीझेडएमए, पर्यटन महामंडळ, महसुल, वन विभाग, पतन विभाग, भूमि अभिलेख आणि बंदर खात्यांमधील अधिकाऱ्यांची एकत्रीत बैठक झाली पाहीजे. तातडीच्या निर्णयांसाठी स्वतंत्र प्रणाली तयार झाली पाहीजे. त्यावर जिल्हाधिकारी समकक्ष अधिकाऱ्याकडून मॉनिटरींग झाले पाहीजे. तरच ही सर्व कामे पूर्ण होतील.

गुहागरातील स्वच्छ पेयजल केवळ चर्चेत
गुहागर नगरपंचायत क्षेत्रातील पाणी योजनेला फिल्ट्रेशन प्रकल्प नसल्याने अशुध्द, गढुळ स्वरुपाच्या पाण्याचा पुरवठा अनेकवेळा होत असतो. पावसाळ्यातील चार महिने तर नगरपंचायतीकडून आलेले पाणी घरात फिल्टर केले तरी गढुळ दिसते. ही गुहागर शहरातील सर्वात मोठी समस्या आहे. गुहागरमधील पर्यटन व्यावसायिकांना पावसाळ्यातील पर्यटन हंगामात चक्क पाणी विकत घ्यावे लागते. गुहागर नगरपंचायतीने नवीन पाणी योजना, फिल्ट्रेशन प्लांटचा प्रस्ताव शासनाकडे 10 वर्षांपूर्वी पाठवला आहे. या योजनेसाठी काही कोटी रुपये मंजूर झाल्याची चर्चा आहे. मात्र आवश्यक कागदपत्रे जमविण्यात 10 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.
पर्यावरण संवर्धन हे आव्हानच
गुहागर आणि लाडघर या दोन्ही समुद्रकिनाऱ्यांच्या मध्ये दाभोळ खाडी समुद्राला मिळते. लोटे औद्योगिक क्षेत्रात प्रदुषित पाण्यामुळे दाभोळ खाडीमधील जल प्रदुषण रोखणे ब्ल्यु फ्लॅगसाठी आव्हानात्मक आहे. गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरील सॉलीड जेटी पतन विभागाने तोडली असली तरी आजही या जेटीचे अवशेष (मोठे दगड व तुटलेले बांधकाम) समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्यात बाधा निर्माण करत आहेत. स्थानिकांकडून होणारे अवैध वाळु उत्खनन हे किनाऱ्याच्या संवर्धनासाठी धोकादायक आहे. त्यामुळे Environmental Protection पर्यावरण संवर्धन, संरक्षण या गोष्टी शासनासाठी आव्हानच आहेत.
ब्ल्यु फ्लॅगविषयी नागरिक काय म्हणतात
गेल्या तीन महिन्यात लाडघरमधील पर्यटकांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. येथील तरुण वर्ग उच्च शिक्षणानंतर पुन्हा पर्यटन व्यवसायासाठी गावात येत आहे. स्थलांतरण थांबले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा समुद्रकिनारा बनविण्यासाठी शासन, ग्रामपंचायत, पर्यटन व्यावसायिक, ग्रामस्थ एकत्र येऊन काम करत आहेत. – दिपक विचारे, लाडघर हॉटेल व्यावसायिक
ब्ल्यु फ्लॅग मानांकनामुळे गुहागरमधील पर्यटकांची संख्या वाढेल हे निश्चित. या पर्यटकांची निवास व्यवस्था गुहागर शहरात होण्यासाठी लॉजिंगची संख्या वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या इमारती नियमात बांधायच्या असतील तर सीआझेड संदर्भातील परवानग्यांसाठी 10 लाखाहून अधिक होतो. हे पैसे कर्ज रुपाने मिळत नसल्याने स्थानिक ग्रामस्थांना परवानगी मिळविण्यासाठी एवढा खर्च करणे सहजशक्य नाही. त्यामुळे बांधकाम परवानगीची रक्कम व प्रक्रिया सहज सोपी करणे आवश्यक आहे. – अद्वैत जोशी, पर्यटन व्यावसायिक गुहागर
उद्योग नसल्याने आपल्याकडील तरुणाचे शहरांकडे स्थलांतर होत आहे. ब्ल्यु फ्लॅग मुळे गुहागरातील पर्यटन वाढेल. परिणामी सेवा उद्योगांमध्ये वाढ होईल. रोजगारात सुमारे 40 टक्के वाढ होईल. गुहागरमधील पायाभूत सुविधांमध्ये वाढ होईल. येथील लोककला, खाद्य संस्कृती जगभरात पोचेल. शहराचा सर्वागिण विकास म्हणून आम्ही या मानांकडे पहात आहोत. – उमेश भोसले, गटनेता भाजप, गुहागर नपं.
समुद्र पर्यटनासाठी येणारा पर्यटक इथे राहण्यासाठी आपल्याला पूर्वेकडील डोंगरात सनसेट पॉईंट, अष्टवणे गणपती मंदिर, परटवणे यासारखे नवे स्पॉट विकसीत करावे लागतील. तिथपर्यंत जाण्यासाठी उत्तम, रुंद रस्ते करावे लागतील. आंतरराष्ट्रीय पर्यटन दर्जामुळे शहरात गुणवत्तापूर्ण नागरी सुविधांमध्ये वाढ होईल. त्याचा फायदा शहरवासीयांना होईल. – संतोष सांगळे, पर्यटन व्यावसायिक
