भारतातील पहिली घटना, डॉ. जोशींच्या निरिक्षणातून आली समोर
मयूरेश पाटणकर
गुहागर ता. 06 : चिपळूण परिसरातील एका पाणथळ जागेत पक्षी निरिक्षक डॉ. श्रीधर जोशी यांना 2 काळे बगळे दिसून आले. भारतात हे पक्षी दिसण्याची ही पहीलीच वेळ असल्याने पक्षी अभ्यासकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. आफ्रिकेमधुन भरकटत हा पक्षी भारतात पोचला असावा अशी शक्यता वर्तविली जात आहे. या घटनेचा अधिक अभ्यास व्हावा म्हणून या पक्षाचे फोटो आणि माहिती डॉ. जोशी यांनी इंडियन बर्ड जरनलला पाठवली आहे. Black Heron seen for the first time in Chiplun

चिपळूणमधील डॉ. श्रीधर जोशी यांना पक्षी निरिक्षणाची आवड आहे. दररोज सकाळी फिरायला जाताना त्यांच्यासोबत कॅमेरा असतो. रविवारी (ता. 3) सकाळी फिरायला गेलेले असताना एका पाणथळ जागी दोन काळे बगळे अनोख्या कॅनोपी फिडींग किंवा अम्ब्रेला फिडींग पध्दतीने मासे पकडताना दिसले. डॉ. जोशी यांनी आपल्या कॅमेरामध्ये छायाचित्रे टीपली. घरी येवून तातडीने इंटरनेवरुन माहिती घेतली. त्यावेळी जगात या पध्दतीने फक्त ब्लॅक हेरॉन Black Heron – Egretta ardesiaca मासे मारतात. हे डॉ. जोशींच्या लक्षात आले. मग त्यांनी याबाबतची माहिती अन्य पक्षी निरिक्षकांना दिली. सुरवातीला सर्वांना वाटले की हा रातबगळा, रातढोकरी (ब्लॅक क्राऊन्ड नाईट हेरॉन) आहे. जो भारतात अनेक पाणथळ ठिकाणी दिसतो. परंतू लांब पाय, पूर्ण शरिर काळ्या रंगाचे आणि कॅनोपी फिडींग या वैशिष्ट्यांवरुन हा ब्लॅक हेरॉन असल्याचे सर्वांच्या चर्चेतून नक्की झाले. चिपळूण परिसरात हा दुर्मिळ पक्षी आढळणे ही दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण गोष्ट असल्याचे समोर आले. Black Heron seen for the first time in Chiplun

काळा बगळा म्हणजे ब्लॅक हेरॉन (Black Heron – Egretta ardesiaca) हा मुख्यत्वे सेनेगल, सुडान, तंजानिया, केनिया, मॉझॅम्बिक, दक्षिण आफ्रिका आणि मॅडगास्कर येथे दिसून येतो. काही अपवादात्मकदृष्ट्या युरोपमधील (ग्रीस, इटली) किंवा आयर्लंडमध्ये (डब्लिन) याची दुर्मिळ नोंदी आढळल्या आहेत. हा पक्षी स्थलांतर करीत नाही. अन्न आणि पाण्याचे दुर्भिक्ष असेल तरच तो आपला अधिवास सोडून त्याच परिसरातील अन्य ठिकाणी जातो. आजपर्यंत भारतात हा पक्षी आढळल्याची कोणतीही नोंद नाही. त्यामुळेच चिपळूणमध्ये हा पक्षी दिसून आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. Black Heron seen for the first time in Chiplun
काय आहे कॅनोपी फिडींग
Canopy feeding (किंवा umbrella feeding) ही एक अनोखी मासे पकडण्याची पद्धत आहे, जी काही पाणथळ पक्षी वापरतात. या पद्धतीत पक्षी आपले पंख अर्धवर्तुळाकार करून पाण्यावर सावली निर्माण करतो, ज्यामुळे मासे त्या सावलीत येतात आणि ते सहज पकडता येतात.
आफ्रिकेतून हे दोन पक्षी भारतात कसे आले ही अनाकलनीय गोष्ट आहे. गेले आठवडाभर मी हे पक्षी पुन्हा दिसण्याच्या प्रतिक्षेत आहे. त्यासाठी दररोज अनेक पाणथळ जागा मी धुंडाळत आहे.- डॉ. श्रीधर जोशी, चिपळूण Black Heron seen for the first time in Chiplun