भाजयुमोचे जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन
गुहागर, ता. 25 : शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये स्त्री रोग तज्ञ नसल्याचे गरोदर माता आणि अन्य महिलांना उपचारासाठी अन्यत्र जावे लागत आहे. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया थांबल्या आहेत. तरी ग्रामीण रुग्णालयाला कायम स्वरुपी स्त्री रोग तज्ञ द्यावा. असे निवेदन गुहागरमधील भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांना दिले आहे.
ग्रामीण रुग्णालय गुहागरमध्ये येणाऱ्या बाह्यरुग्णांची संख्या कमी असल्यावरुन यापूर्वीच आमदार भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली होती. आज भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे आणि भौतिक सुविधांबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांची भेट घेवून निवेदन दिले. यामध्ये स्त्री रोग तज्ञासह दंत चिकित्सक, बिघडलेले क्ष किरण यंत्र आदी समस्यांचा समावेश आहे.
याबाबत बोलताना भाजयुमोचे तालुकाध्यक्ष संजय मालप म्हणाले की, ग्रामीण रुग्णालयात स्त्री रोग तज्ञ नसल्याने गरोदर माता आणि महिलांना उपचारासाठी अन्यत्र जावे लागत आहे. ग्रामीण रुग्णालयातील दंत चिकित्सक पद रिक्त आहे. क्ष किरण यंत्र बंद आहे. अशा परिस्थितीत येथील बाह्य रुग्णांची संख्या वाढणार कशी. आता युपीएल कंपनीने अधिक क्षमतेचा आवाज न येणारा जनरेटर रुग्णालयाला भेट दिला आहे. त्यामुळे ही रिक्त पद भरल्यास सिझेरियन, कुटुंब कल्याण आदी शस्त्रक्रिया इथे होवू शकतात.
भाजपचे शहराध्यक्ष प्रकाश रहाटे म्हणाले की, गुहागरच्या स्मशानभुमीतील शवविच्छेदन कक्षांची दुरावस्था झाली आहे. येथे रात्री एखादे शव ठेवायचे असेल तर नातेवाईकांना किंवा पोलीसांना पहारा द्यावा लागतो. ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात शव विच्छेदन कक्ष बांधल्यास वैद्यकिय अधिकाऱ्यांना आवश्यक सुविधा सहज उपलब्ध होतील. शव विच्छेदनाची प्रक्रिया जलद गतीने होईल. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन केंद्राची उभारणी करावी. अशी विनंती आम्ही केली आहे.
शहर भाजयुमोचे अध्यक्ष मंदार पालशेतकर म्हणाले की, 108 ही रुग्णवाहिका सध्या चिखली आरोग्य केंद्रात असल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबतही आम्ही डॉ. फुले यांच्याशी चर्चा केली आहे. ही रुग्णवाहिका गुहागरला असेल तर तालुक्यातील कोणत्याही रुग्णाला कमी वेळात सेवा मिळू शकते. याचाही विचार आरोग्य विभागाने करावा असे आम्ही निवेदनात म्हटले आहे.
जिल्हा शल्य चिकित्सकांनी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले असून विविध मागण्याच्या पुर्ततेबाबत आपण प्रयत्न करु असे सांगून आश्र्वस्त केले आहे. यावेळी भाजपा महिला तालुक़ा अध्यक्ष श्रद्धा घाडे, युवामोर्चा शहर उपाध्यक्ष हेमंत बारटक्के, पराग कांबळे व कार्यक़र्ते उपस्थित होते.