शिरीष दामले, रत्नागिरी; मो. 9423875402
तत्त्व, निष्ठा, बांधिलकी या शब्दांशी बहुतांश समाजाने फारकत घेतलेल्या सध्याच्या वातावरणात निष्ठा हे मूल्य मानून त्याप्रमाणे आयुष्य व्यतीत केलेल्या बापूसाहेब परूळेकर यांची माहिती सध्याच्या पिढीला नसणे ओघानेच आले. या वातावरणात ते रमले नसतेच. जनता पक्षाची फाटाफूट होऊन भाजप निर्माण झाला तेव्हाही संघाच्या पठडीत वाढलेल्या बापूंनी पक्ष सोडून जाण्यास नकार दिला. त्यांची निष्ठा ही अशी अव्यभिचारी होती. त्यानंतरच्या राजकारण आणि समाजकारणातून ते बाजूला झाल्याने तसे विस्मरणातच गेले होते. त्यांच्या निधनाने आता आम्हाला ते कायमचे पारखे झाले; मात्र त्यांच्या जाण्याने आपण काय गमावले, याची ही नोंद. Bapusaheb who preserves the integrity of life

रत्नागिरीत परूळेकरांचे घराणे तालेवार. त्यामुळे बापूसाहेबांना वकिली आणि सामाजिक कामाचा वारसा लाभला होता. बापूंच्या जीवननिष्ठा पक्क्या होत्या. व्यावसायिक निष्ठा तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीशी निष्ठा, सामाजिक बांधिलकी यांसह व्यक्ती म्हणून त्यांच्या निष्ठा सावरकरचरणी होत्या. यांच्याशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही. यामुळेच भाजपच्या राजकारणात त्यांचा कधी उदोउदो झाला नाही. त्यांना त्याची कधीच फिकीर नव्हती. आजच्या हिंदुत्ववाद्यांना सावरकर फारच जवळचे वाटू लागले असले तरी बापूंचे सावरकर प्रेम बेगडी नव्हते. सावरकरांचे अनुयायी या अर्थाने बापूही हिंदुत्ववादी होते; पण विरोधाभास असा की, याच हिंदुत्ववाद्यांकडून बापूंना जातिभेदाचे चटके बसले होते. अगदी वकिली सुरू केल्यानंतरही या अनुभवातून त्यांना जावे लागले. त्यांच्या व्यावसायिक निष्ठेबद्दल जाणकार नेहमीच सांगत. त्यातून ज्यांना शिकावयाला मिळाले ते शिकले आणि त्याबद्दल कृतज्ञ राहिले. विधिज्ञ या उपाधीला बापू सर्वथा पात्र होते. कायद्याचे फक्त जाणकार नव्हेत तर कायद्याचे प्रयोजन, कायद्याचा वापर, त्याची अंमलबजावणी आणि त्याला आवश्यक असा मानवी चेहरा या साऱ्याची जाण त्यांच्यापाशी होती. Bapusaheb who preserves the integrity of life

विविध कायद्यांवरील त्यांचे भाष्य ऐकताना ते जाणवत असे. शहाबानो खटल्याच्या काळात त्यांना भेटणे म्हणजे बौद्धिक आनंद होता. त्या प्रकरणाच्या खाचाखोचा, कायद्याच्या बाबी, मुस्लिम कायद्यातील तरतुदी, त्या निकालाचे दूरगामी परिणाम, ते टाळण्यासाठी झालेले राजकारण याच्यावर त्यांनी किमान अडीच तास मूलगामी विवेचन आम्हा पत्रकारांसमोर केले होते. त्यावर लिहिताना ती शिदोरी आम्हाला दीर्घकाळ पुरली आणि कायद्याच्या विषयावर लिहायचे असून आमचे हसे झाले नाही. संसदेत खासदार म्हणून त्यांची कामगिरी अतिशय उजवी होती. त्यांनी अशासकीय विधेयके मांडली. हा काहीसा अॅकॅडमिक भाग असल्याने तो सामान्यांपर्यंत पोहोचला नाही. पुराव्याच्या कायद्यात बदल करण्याचे प्रयत्न त्यांनी केले होते; पण तत्कालीन ज्येष्ठ वकील आणि भाजपमधील ढुढ्ढाचार्य यांनीच ते यशस्वी होऊ दिले नाहीत, अशी आठवण बापू सांगत. संसदेत बापूंनी जे मांडले, त्याचे संदर्भ असलेली पुस्तके त्यांच्या घरी आजही आहेत. कोणीही या आणि त्याचा अभ्यास करा, असे ते म्हणत. सावरकरांचा करकरीत बुद्धिवाद त्यांच्या अनुयायांना पचत नाही. त्यामुळे सावरकरांचे सच्चे अनुयायी असलेले बापूही त्या अर्थाने लोकप्रिय होऊ शकले नाहीत; परंतु बापूंनी ती किंमत मोजली. Bapusaheb who preserves the integrity of life

जनता पक्षापासून बापूंनी फारकत घेतली नाही आणि राजकारणही सोडले. भाजपमधील अनेक महाजन रत्नागिरीत आले तरी बापूंच्या भेटीला जाण्याची हिंमत त्यांना नव्हती. बापूंनीच हे खणखणीतपणे सांगितले होते. राजकीय प्रलोभनापासून बापू दूर राहिले कारण, त्यांच्या निष्ठा स्पष्ट, ठाम होत्या. उदारमतवादी बापूंना दिल्लीत काँग्रेसजनही किती मानत त्याचा साक्षात पुरावा स्व. राजीव गांधी पंतप्रधान असतानाच आला होता. राजीव रत्नागिरीत आले तेव्हा बापूंना भेटायला घरी येतो, असा निरोप त्यांनी दिला. बापूंनी मात्र लवाजम्यासह तुम्ही येण्यापेक्षा मीच तुम्हाला विमानतळावर भेटतो, असे सांगितले. स्थानिक राजकारणापासून ते खासदारकीपर्यंत बापूंचा प्रवास झाला आणि यातूनच त्यांचे दबदबा वाटावे असे व्यक्तिमत्व तयार झाले; मात्र दुसऱ्याला आपल्या व्यक्तिमत्वाचा धाक वाटेल असे ते कधीच न वागता सर्वांशी आपुलकीनेच वागत. रत्नागिरीतील न्यायालय हा त्यांच्या भावजीवनाचा एक भाग होता. येथे न्यायमूर्ती खारेघाट यांना लोकांनी निरोप कसा दिला. आंबेडकर रत्नागिरीच्या न्यायालयात आले होते. न्यायालयाची बांधणी, इमारत या साऱ्यांबद्दल बापू अत्यंत उमाळ्याने बोलत. उदारमतवादी राजकारणात उमदेपणाने वावरणारे बापू हे रत्नागिरीतील अखेरचे शिलेदार होते. आज आम्ही त्यांनाही गमावले. Bapusaheb who preserves the integrity of life
