पालकमंत्री उदय सामंत, दुसरी संस्था हवी असेल तर वर्षभर तयारी करा
गुहागर, ता. 16 : जिल्ह्यातील पहिली सीबीएससी शाळा बंद करुन विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. आरजीपीपीएलने पूर्वीप्रमाणेच सीएसआर फंडातून बालभारती पब्लिक स्कूलला मदत करावी. अशा ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी पालकांना दिली. ते अंजनवेल येथे बालभारती पब्लिक स्कुलच्या (Balbharati Public School) सभेत बोलत होते. Balbharti Public School will not close
काय आहे नेमकं प्रकरण
दाभोळ वीज प्रकल्प बंद पडल्यानंतर केंद्र सरकारने रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प या कंपनीची स्थापना केली. या कंपनीमध्ये नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन (एनटीपीसी) आणि गॅस इंडिया ॲथोरिटी लिमिटेड (गेल) या केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या दोन कंपन्यांना भागीदार केले. आणि दाभोळ वीज प्रकल्प पुन्हा कार्यान्विन करण्याची जबाबदारी सोपवली. देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी एनटीपीसीचे प्रकल्प असतात त्याठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी, कमर्चाऱ्यांच्या मुलांसाठी एनटीपीसीमार्फत शाळा चालविली जाते. ही शाळा चालविण्यासाठी एनटीपीसीच्या बहुतांश प्रकल्पात चाईल्ड एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली या शैक्षणिक संस्थेच्या मान्यतेने सीबीएससी बोर्डाची शाळा सुरू होते. त्यासाठी एनटीपीसीकडून चाईल्ड एज्युकेशन सोसायटीला काही रक्कम द्यावी लागते. याच पध्दतीने गुहागर तालुक्यातील दाभोळ वीज प्रकल्प चालविण्याची जबाबदारी एनटीपीसीवर सोपविल्यानंतर चाईल्ड एज्युकेशन सोसायटीची (childe Education society) मान्यता असलेली बालभारती पब्लिक स्कुल ही सीबीएससी बोर्डाची शाळा आरजीपीपीएल प्रकल्पाच्या निवासी संकुलात सुरु झाली. प्रकल्पातील अधिकाऱ्यांच्या मुलांची संख्या कमी असल्याने या शाळेत स्थानिक विद्यार्थ्यांनाही प्रवेश दिला गेला. आज या शाळेत शिकणाऱ्या स्थानिक मुलांची संख्या ही प्रकल्प अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मुलांपेक्षा अधिक आहे. Balbharti Public School will not close
चाईल्ड एज्युकेशन सोसायटीने बालभारती पब्लिक स्कूल संदर्भात करार करताना, मॉन्टेसरी ते दहावी या प्रत्येक वर्गात 40 विद्यार्थी गृहित धरुन चाईल्ड एज्युकेशन सोसायटीला प्रति विद्यार्थी ठराविक रक्कम देणे बंधनकारक केले होते. हे पैसे एनटीपीसीच्या सीएसआर फंडातून खर्च केले जात असत. बालभारती पब्लिक स्कुलमधील जे विद्यार्थी राईट टू एज्युकेशन या ॲक्टखाली लाभार्थी होते त्यांचेही पैसे चाईल्ड एज्युकेशन सोसायटी मागत होती. दुसऱ्या बाजुला आरजीपीपीएलमधील वीज उत्पादन थांबलेले असल्याने काटकसरीतून कंपनीचा खर्च कमी करण्याचे आरजीपीपीएलने गेली काही वर्ष अवलंबविले होते. याच काटकसरीचा भाग म्हणून मध्यंतरी आरजीपीपीएलने ग्रामपंचायतीना कर न देण्याचा पवित्रा घेतला होता. त्याच पध्दतीने राईट टू एज्युकेशनमधील विद्यार्थ्यांचे पैसे का भरायचे अशी भूमिका आरजीपीपीएलने घेतली. त्यातूनच गेले काही महिने चाईल्ड एज्युकेशन सोसायटी आणि आरजीपीपीएलमध्ये सुरू असलेल्या आर्थिक वादाची परिणिती अखेर शाळा बंद करण्यापर्यंत आली. ही शाळा 1 एप्रिल पासून बंद करत असल्याचे पत्र चाईल्ड एज्यूकेशन सोसायटीने बाल भारती पब्लिक स्कूल व्यवस्थापन समितीला दिले. Balbharti Public School will not close
आरजीपीपीएलची शाळा बंद पडू नये म्हणून धडपड
चाईल्ड एज्युकेशन सोसायटीने शाळेची मान्यता काढून घेतली तर विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाईल अशी भिती आरजीपीपीएलच्या अधिकाऱ्यांना वाटत होती. म्हणून त्यांनी पुढील शैक्षणिक वर्षापासून ही शाळा अन्य संस्थेच्या मान्यतेद्वारे चालविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यातूनच खेडमधील रोटरी प्रतिष्ठानचे नाव समोर आले. या संस्थेमधील विद्यार्थ्यांनी जेईई, नीट यासारख्या स्पर्धा परिक्षांमध्ये सातत्याने उज्ज्वल यश संपादन केले आहे. याशिवाय विविध स्पर्धांमध्येही या शाळेचे विद्यार्थी राज्य, देश पातळीवर चमकतात. त्यामुळे गुहागर तालुक्यातील अनेक पालक जेईई, नीट, सीईटी या स्पर्धां परीक्षांच्या तयारी करता आपल्या पाल्याला रोटरी स्कुलमध्ये टाकतात. या गोष्टी लक्षात घेवून आरजीपीपीएल रोटरी प्रतिष्ठानला ही शाळा चालविण्यासाठी देण्याच्या प्रयत्न करत होती. प्राथमिक बोलणी झाली होती. तांत्रिक बाबींवर चर्चा सुरू होती.
अत्यंत विश्वासार्ह सुत्रांकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे रोटरी स्कुलची फी सध्याच्या आरजीपीपीएलच्या फी पेक्षा कमी होती. स्वाभाविकच रोटरीकडून शिक्षकांना दिला जाणारा पगारही कमी होता. त्यामुळे काहीजणांना रोटरी प्रतिष्ठानचा हस्तक्षेप मान्य नव्हता. त्यातच रोटरी प्रतिष्ठानद्वारे शाळा चालविली गेली तर राईट टू एज्युकेशनचा लाभ मिळणार नाही अशी आवई उठवली गेली. त्यामुळे पालक अस्वस्थ झाले. Balbharti Public School will not close

पालकमंत्री धावून आले
बाल भारती पब्लिक स्कूल व्यवस्थापन समितीकडून ही शाळा अन्य संस्थेच्या ताब्यात देण्यासंदर्भात चर्चा सुरू होती. याचवेळी काही पालक व स्थानिक शिक्षकांनी हा विषय पालकमंत्र्यांपर्यंत पोचविला. तत्काळ पालकमंत्र्यांनी आरजीपीपीएल निवासी संकुलात शासकीय अधिकारी, स्कूल व्यवस्थापन समिती आणि पालक यांची संयुक्त सभा घेतली.
सभेमध्ये पालकांकडून शाळेचा शैक्षणिक दर्जा खालावला असल्याचे प्रामुख्याने सांगण्यात आले. यामध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा असूनही येथील विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलता येत नाही. शाळेत कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा घेतल्या जात नाहीत. आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांचे प्रस्तावही मुख्याध्यापकांमार्फत शासनाकडे पाठवले जात नाहीत. दरवर्षी फी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली जाते. अशा तक्रारी पालकांनी मांडल्या. Balbharti Public School will not close
या सभेत बोलताना पालकमंत्री सामंत म्हणाले की, 15 दिवसांत शाळा बंद करणे सोपे नाही. त्यासाठी वर्षभराची पक्रिया करावी लागते, बालभारती पब्लिक स्कूलमध्ये कोण राजकारण करत आहे ते मला माहीत आहे. येथील स्कूल व्यवस्थापन बदलावे. संस्था चालकांनी पालकांबरोबर बैठक घेऊन दर्जेदार शिक्षणासाठी योग्य ते बदल करावेत. या शाळेतील मुख्याध्यापकांमुळे अनेक प्रश्र्न निर्माण होत आहेत. संस्थेने त्यांना बदलावे. दर दोन महिन्यांनी पालकांसमवेत बैठक घ्यावी. कंपनीने पूर्वीप्रमाणेच शाळेला आर्थिक मदत करावी. मुलांच्या शिक्षणाबाबत मी कोणतीही तडजोड करणार नाही. पालकांना व संस्थाचालकांना दुसरी संस्था ही असेल तर महाराष्ट्रातील दर्जेदार शिक्षण देणाऱ्या नामवंत शाळांना आमंत्रित करा. पालक, संस्थाचालकांनी समन्वयाने वर्षभरात प्रस्ताव व अन्य प्रक्रिया पूर्ण करावी. मात्र ही शाळा बंद करु नये. Balbharti Public School will not close
या सभेला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे, गुहागरचे तहसीलदार परिक्षित पाटील, बालभारती स्कूलचे अध्यक्ष मीनू गोस्वामी, आरजीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल देसाई, शिवसेनेचे नेते राजेश बेंडल, विपूल कदम, जिल्हा परिषद सदस्य सौ. नेत्रा ठाकूर व महेश नाटेकर, गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर, उपनगराध्यक्ष प्रदिप बेंडल, पंचायत समिती सदस्य गौरव वेल्हाळ आदी उपस्थित होते. Balbharti Public School will not close
