रत्नागिरी, ता. 31 : मद्यधुंद अवस्थेत एका तरुणावर धारदार सुऱ्याने प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अंकुश सूर्यकांत मांडवकर याला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी आरोपीच्या वतीने प्रसिद्ध वकील ॲड. भाऊ शेट्ये यांनी न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली. Attack with a sharp weapon in Ratnagiri
ही घटना १० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास रत्नागिरीतील मांडवी येथील भुते नाका परिसरात घडली होती. मुरुगवाडा येथे राहणारा फिर्यादी अरमान अब्दुल्ला इनामदार हा आपल्या घराकडे जात असताना आरोपी अंकुश मांडवकर याने त्याचा रस्ता अडवला होता. फिर्यादीने रस्ता सोडण्यास सांगितल्याचा राग मनात धरून, मद्याच्या नशेत असलेल्या आरोपीने “जागेवरून हलला तर तुला खल्लास करीन” अशी धमकी देत फिर्यादीच्या डोक्यावर, गालावर आणि खांद्यावर सुऱ्याने सपासप वार केले होते. या हल्ल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर बी.एन.एस. कलम १०९, १२६(२), ३५१(३), ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. Attack with a sharp weapon in Ratnagiri

रत्नागिरी शहर पोलिसांनी या जामीन अर्जाला कडाडून विरोध केला होता. आरोपी व्यसनी असून त्याने भरचौकात हे भयंकर कृत्य केल्याने समाजात भीतीचे वातावरण आहे, तसेच जामिनावर मुक्त झाल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो किंवा पुन्हा अशाच प्रकारचा गुन्हा करू शकतो, असा दावा पोलिसांनी आपल्या अहवालात केला होता. मात्र, आरोपीचे वकील ॲड. भाऊ शेट्ये यांनी सादर केलेले युक्तिवाद आणि प्रकरणातील कायदेशीर बाजू लक्षात घेऊन न्यायालयाने अंकुश मांडवकर याची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर वाळुंजकर करत आहेत. Attack with a sharp weapon in Ratnagiri
