27 मार्चला मतदानाचा पहिला टप्पा, 2 मे होणार मतमोजणी
गुहागर, ता. 26 : देशातील पश्चिम बंगाल, आसम, केरळ, तामिलनाडु या चार राज्यात आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील मार्च महिन्यात विधानसभा निवडणुका (Assembly Election 2021) होत आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 27 मार्चला तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला होणार आहे. सर्व राज्यातील मतमोजणी 2 मे ला होईल. पाचही राज्यात आजपासून आचारसंहिता लागु करण्यात आली आहे. अशी माहिती निवडणूक आयोगाने (Election Commission) आज पत्रकार परिषदेत दिली.
केरळ (Kerala), तामिळनाडु (Tamilnadu) आणि पदुचेरी (Pondicherry) राज्यात 6 एप्रिलला मतदान होणार आहे. आसाम (ASAM) मध्ये 27 मार्च, 1 एप्रिल आणि 6 एप्रिल असे तिन टप्प्यात मतदान होणार आहे. तर पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये 8 टप्प्यात मतदान होणार आहे. सर्व राज्यातील निवडणुकांचे निकाल 2 मे रोजी लागतील.
तामिळनाडू विधानसभेत 234 जागा आहेत. केरळ राज्यात विधानसभेच्या 141 जागा आहेत. त्यापैकी 140 लोकप्रतिनिधींसाठी निवडणूक प्रक्रिया राबविली जाते. 1 जागा राष्ट्रपती निवडतात. आसाममध्ये 126 जागांसाठी निवडणुक होणार आहे.
केंद्रशासीत असलेल्या पदुचेरीमध्ये विधानसभेच्या 33 जागा आहेत. येथील काँग्रेस सरकारचा कार्यकाळ जुन 2021 मध्ये संपणार होता. मात्र त्याआधीच येथील सरकारवर अविश्र्वास ठराव दाखल करण्यात आला. या ठरावावर मतदान होण्यापूर्वीच काँग्रेसचे मुख्यमंत्री नारायणस्वामी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे निवडणुका होवून नवीन सरकार स्थापन होईपर्यंत पदुचेरीमध्ये राष्ट्रपती शासन लागु करण्यात आले आहे.
पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये विधानसभेच्या (Assembly) एकूण 294 जागा आहेत. 30 मे रोजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (तृणमुल काँग्रेस, TMC) यांचा कार्यकाळ संपत आहे. भाजप आणि तृणमुल काँग्रेसमध्ये गेले दोन महिने धुमश्चक्री सुरु आहे. पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक, जाळपोळ, हिंसाचार आदी घटनांमुळे वातावरण तापले आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने (Election Commission) घेतला आहे. या ठिकाणी 27 मार्च, 1 एप्रिल, 6 एप्रिल, 10 एप्रिल, 17 एप्रिल, 22 एप्रिल, 26 अप्रैल, 29 एप्रिल) अशा 8 टप्प्यात मतदान होणार आहे.
मुख्य निवडणुक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले की, मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात येणार आहे. कोरोना महामारीच्या (Coronavirus Pandemic) संकटामुळे बिहारमध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात आली होती. त्याचप्रमाणे या पाचही राज्यात मतदान केंद्राची संख्या वाढविण्यात आली आहे. कोरोनावरील लस उपलब्ध झाल्याने बिहार पेक्षाही जास्त मतदान या पाच राज्यात होईल. त्यामुळे मतदानाची वेळ देखील 1 तासाने वाढविण्यात येणार आहे.