हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी; आ. जाधव यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
गुहागर, ता. 29 : लोणावळा येथे क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून स्थानिक तरूणांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मौजे अडूर-कोंडकारूळ येथील कमलेश तानाजी धोपावकर या तरूणाच्या कुटुंबाला विशेष बाब म्हणून आर्थिक सहाय्य करणे तसेच याप्रकरणातील हल्लेखोरांचा शोध घेवून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, या मागणीचे पत्र आ. भास्करराव जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. Assault for trivial reasons


या निवेदनात म्हटले आहे की, गुहागर मतदारसंघातील मौजे अडूर-कोंडकारूळ (ता. गुहागर) येथील कमलेश तानाजी धोपावकर हा मच्छिमारी बोटीवर काम करणारा तरूण दि. 25 मे 2025 रोजी मित्रांसमवेत त्यांच्या समाजाचे कुलदैवत असलेल्या एकवीरा देवीच्या दर्शनासाठी लोणावळा या ठिकाणी गेला होता. लोणावळा येथे ज्या ठिकाणी हे सर्वजण थांबले होते. त्या फार्म हाऊसच्या परिसरात गाडी वळविण्याच्या क्षुल्लक कारणावरून तिथल्या काही स्थानिक तरूणांनी त्यांच्याशी वाद घालायला सुरूवात केली आणि त्यातून धारधार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यात कमलेश धोपावकर हा गंभीर जखमी झाला. बरोबर असलेल्या मित्रांनी त्याला रूग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. Assault for trivial reasons


कमलेश आणि त्याच्या मित्रांवर हल्ला करणारे दहा ते बाराजण होते. कमलेश गंभीर जखमी झाल्याचे पाहून ते तिथून पसार झाले. त्यांना अदयाप अटक झालेली नाही. त्यामुळे या तपासात लोणावळा पोलिसांची भूमिका संशसयास्पद असल्याची चर्चा सुरू आहे. यातील सर्व आरोपिंचा तात्काळ शोध घेवून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती केली आहे. Assault for trivial reasons


या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेला कमलेश धोपावकर हा अत्यंत गरीब कुटुंबातील होता. मच्छिमारी बोटीवर काम करून तो पत्नी, दोन मुलांसह कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होता. कुटुंबात कर्ता, कमवणारा तो एकमेव होता. त्याच्या अकाली मृत्यूमुळे धोपावकर कुटुंबाचा आधारच कायमचा निघून गेल्याने या कुटुंबावर अक्षरशः आकाश कोसळले आहे. ही परिस्थिती लक्षात घेवून विशेष बाब म्हणून सदर तरूणाच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून जास्तीत जास्त आर्थिक मदत करून सहकार्य करावे, अशी मागणी आ. जाधव यांनी केली आहे. Assault for trivial reasons