गुहागर पोलिस ग्राऊंडवरील दुकाने व्यवसायिकांनीच केली मोकळी
गुहागर, ता.10 : गुहागर समुद्रचौपाटीवरील सुरूबनातील अनधिकृत दुकाने बंदर विभागाने काही माहिन्यापूर्वी हटवली होती. त्यानंतर या व्यवसायिकांनी पोलिस ग्राऊंडवर हिच दुकाने थाटली होती. परंतु, याठिकाणीही तक्रार झाल्याने महसूल विभागाने दुकाने हटविण्याची नोटीस दिली होती. दरम्यान, या व्यवसायिकांनी कारवाई पूर्वीच आपली दुकाने मोकळी केल्याने गुरुवारी होणारी कारवाई टळली. Action of Revenue Department
पर्यटकांचा हंगाम संपला असला तरी पाऊस लांबल्याने आजही मोठया संख्येने पर्यटक गुहागरात येत आहेत. अशावेळी पर्यटकांची गैरसोय होऊ नये व आम्हालाही रोजीरोटी मिळावी, यासाठी प्रशासनाने किनारपट्टीलगत व्यवस्था करावी, अशी मागणी या व्यवसायिकांकडून होत आहे. Action of Revenue Department

बंदर विभागाने गेल्यावर्षी गुहागर समुद्रचौपाटीवरील सुरूबनातील तब्बल २२ छोटया मोठ्या भेळपुरी, चायनीज, नाष्टा, नारळपाणी, आईस्कीम दुकान व्यवसायीकांवर कारवाई केली होती. व्यवसायीकांनी दुकाने न काढल्याने थेट जेसीबीच्या सहाय्याने सर्व दुकाने पाडण्यात आली. त्यानंतर व्यवसायीकांनी पर्यटकांना सेवा देण्यासाठी गुहागर पोलिस ग्राऊंडवर सात जणांनी छोटी दुकाने सुरु केली. फिरत्या दुकानाच्या संकल्पनेवर त्यांनी पर्यटनांना सेवा देण्यास सुरूवात केली. Action of Revenue Department
दरम्यान, पावसाळी हंगाम सुरु होत असल्याने या व्यवसायिकांनी शेड तयार केल्या होत्या. याठिकाणी खेळाचे ग्राऊंड आणि वाहने पार्किंग केली जातात. त्यामुळे पोलिस ग्राऊंडवर या खाद्य पदार्थांच्या दुकानामुळे अडथळे येत असल्याच्या तक्रारी झाल्याने महसूल विभागाने येथील सात व्यवसायिकांना आपली दुकाने हटविण्याची नोटीस दिली होती. दुकाने स्वतः मोकळी करा, अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल असे म्हटले होते. गुरुवारी या कारवाईची शेवटची डेडलाईन होती. मात्र, व्यवसायिकांनी आपणहून आपली दुकाने मोकळी केली. बांधलेल्या शेड काढण्यात आल्या. त्यामुळे महसूल विभागाची कारवाई टळली आहे. असे असले तरी सद्या गुहागर किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होणार आहे. Action of Revenue Department
