तीव्र चढ, अरुंद रस्त्यावर पर्यटकांचा चुकतोय अंदाज
गुहागर, ता. 20 : तालुक्यातील धोपावे रानवी रस्त्यावर गेल्या 4 दिवसातं 3 अपघात झाले. सुदैवाने अपघातामध्ये कोणीही गंभीर जखमी झाले नाही. मात्र वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. फेरीबोटीवरुन नवानगरमार्गे वेलदूर हा रस्ता बंद असल्याने पर्यटकांना तीव्र चढ आणि वळणावळणांच्या अरुंद रस्त्याशिवाय पर्याय नाही. या अनोळखी रस्त्यावर अंदाज न आल्याने अनेकांची वाहने अनियंत्रीत होत आहेत. Accident on Dhopave Ranvi Road


सद्या उन्हाळीचा सुट्टीचा हंगाम असल्याने कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातच गेली दोन वर्ष कोरोनामुळे राहीलेल्या वाडीपुजा आणि विवाहांची संख्याही मोठी आहे. गुहागरला स्वत:च्या वाहनाने येणारी मंडळी, पर्यटक सागरी महामार्गाने प्रवास करतात. त्यामुळे दापोलीतून गुहागरकडे दाभोळ धोपावे फेरीबोटीने येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. नेमक्या याच गर्दीच्या हंगामात सार्वजनिक बांधकाम विभागाने धोपावे फेरीबोट, नवानगर मार्गे वेलदूर हा नेहमीच्या परिचयाचा रस्ता वहातुकीसाठी बंद केला आहे. Accident on Dhopave Ranvi Road


गेल्यावर्षी पावसामध्ये याठिकाणी दरड कोसळली होती. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण, मजुबुतीकरण असे काम सध्या वेगाने सुरु आहे. या रस्त्याने वहातुक बंद केल्याने धोपावे रानवीमार्ग गुहागर किंवा शृंगारतळी या मार्गावरील वहातूक सध्या वाढली आहे. धोपाव्याकडून रानवी कडे जाताना या रस्त्यावर जवळपास 4 कि.मी. अंतर तीव्र चढ आणि तीव्र वळणांचे आहे. मुळात अरुंद रस्ता त्यात चढ आणि वळणे असल्याने अनेकवेळा समोरुन वाहन आले की नवा वाहनचालक गांगरतो. ब्रेक दाबून थांबवलेली गाडी पुन्हा मार्गस्थ करणे कठीण होते.


अशावेळी गाडी उतारावर घसरु लागते. तीव्र उतारामुळे अनियंत्रित झालेली गाडी अपघातग्रस्त होते. काही वेळा समोरुन वाहन येण्याचीही आवश्यकत नसते. नवा वाहनचालक सेकंड गिअरवर गाडी चालवतो आणि अचानक फर्स्ट गियर करणे जमत नाही. आणि न्युट्रल झालेली गाडी वेगाने मागे येते. अशा पध्दतीने 3 वाहनांना अपघात झाले. ग्रामस्थांनी तातडीने अपघातग्रस्तांना मदत केली. धोपाव्यात किरकोळ उपचार केले. परंतू फिरण्यासाठी आलेल्या मंडळींचा हिरमोड झाला. कोणीही जखमी झाले नाही तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


अपघाताची ही मालिका लक्षात घेऊन ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली आहे. या संदर्भात सा.बां. उपविभाग गुहागरचे अधिकारी निजसुरे म्हणाले की, सदर अपघात हे रस्ता माहित नसलेल्या वाहन चालकांना चढाचा अंदाज न आल्याने होत आहेत. आम्ही या रस्त्यावर सुचना फलक लावणार आहोत. Accident on Dhopave Ranvi Road

