• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर इतिहासाचा समृध्द वारसा

by Ganesh Dhanawade
September 1, 2022
in Guhagar
141 1
0
A legacy of history to Guhagar
277
SHARES
790
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 01 : गोव्याचं कौतुक साऱ्या जगाला वाटतं. अथांग सागर, नारळी पोफळीच्या घनदाट बागा, चैतन्यदायी सागरवारे, जागृत देवस्थाने .. निसर्ग सौदर्य आणि भक्ती यांचा मनोरम संगम गोव्यात झाला आहे. पण गुहागरात आलात की गोव्याची साक्षात प्रतिकृती आहे . येथेही भक्ती आणि सौदर्याचा मिलाफ आहे. गोव्यात श्री मंगेश आणि श्री शांतादुर्गा आहे. तर गुहागरात श्री व्याडेश्वर आणि दुर्गामाता आहे.  A legacy of history to Guhagar

भक्तीचीं अमृततुल्य भावना या गावात अनुभवास येते. निसर्गानं या गावाला भरभरून दिलं आहे. गावात एक चैतन्यदायी शांतता अनुभवाला येते. गुहागर हे एक परिपूर्ण गाव आहे. तेथे पर्यटनाचा सारा आनंद मिळवता येतो आणि भक्तीभावनेचा उत्कट अनुभव घेता येतो. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक गावे ही सागरतीरी वसली त्या गावाना तीर्थक्षेत्राचा आणि व्यापार, संरक्षणविषयक महत्वाचा आधार आहे. जसे जयगड, दाभोळ, वेंगुर्ले, मालवण हे उत्तम बंदर आणि सागरी संरक्षणाचे मोक्याचे ठिकाण म्हणून विकसित झाले. संगमेश्वर, चिपळूण, खेड, महाड, राजापूर आदि अनेक गावेदेखील व्यापारी गावे आणि सागरी नाकी म्हणून विकसित झाली. त्याना खास महत्व प्राप्त झाले याचे कारण ते देशावरची गावे आणि बाजारपेठा तसेच उतारपेठा याना जोडणारी होती. म्हणून त्याना ऐतिहासिक काळातहि महत्व प्राप्त झाले. आणि भरभराट झाली. ही सर्व मोठी गावे, प्राचीन काळापासून गाजणाऱ्या व्यापारी पेठा या नदीच्या किनारी वसलेल्या आहेत. मोठ्या नद्यांचे किनारे तेथे वस्ती करण्यासाठी निवडण्यात आले. पण गुहागर शहराच्या जवळपास नदी नाही. ते गाव सागरी संरक्षणाच्या दृष्टीने मोक्याचे नाही. शिवाय व्यापाराच्या दृष्टीने त्याला भौगोलिक महत्व नाही. त्याचे तसे लॉजिस्टिक सपोर्ट म्हणतात तसे देण्यास उपयोगाचे स्थान नाही. A legacy of history to Guhagar

A legacy of history to Guhagar

प्राचीन काळात गुहागर हे तालुक्याचे मुख्य केंद्र नव्हते. शिलाहार राजांपासून पेशव्यांच्या काळापर्यंत गुहागरला प्रशासन आणि महसुली केंद्र म्हणून दर्जा नव्हता. तरीहि या गावाला खास स्थान आहे. याचे कारण या गावाला प्राचीन काळापासून तीर्थक्षेत्र म्हणूनच महत्वाचा दर्जा आहे. या गावाची रचना आणि विकास हा केवळ तीर्थक्षेत्र म्हणूनच झाला. श्री क्षेत्र परशुराम जसे धार्मिक स्थळ म्हणून भागवान परशुरामाच्या मंदिरामुळे, श्री क्षेत्र गणपतीपुळे हे जसे श्री गणपतीमुळे महत्व प्राप्त होऊन विकसित झाले तसे गुहागर हे शहर हे व्याडेश्वर देवस्थानामुळे वसले. या गावाचा इतिहास मनोरंजक आहे. गुहागर तालुक्यात ऐतिहासिक महत्व असलेली अनेक गावे आहेत. हा तसा दुर्गम वाटणारा तालुका एकेकाळी
समृद्ध आणि इतिहासात महत्वाचे स्थान लाभलेला होता. A legacy of history to Guhagar

पालशेतची आदिमानवाची गुहा

गुहागर तालुक्यात पालशेत या गावी दोन फार महत्वाचे ऐतिहासिक अवशेष सापडले. सुमारे पाऊण लाख वर्षापूर्वी पालशेत गावी सागर किनाऱ्याजवळच्या एका गुहेत आदिमानवी वस्ती होती. कोकणातच नाही तर साऱ्या देशात आणि आशिया खंडात कोठेहि सागर किनारी आदिमानवी वसाहत असल्याचे पुरावे सापडले नाहीत. पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयाचे संशोधक डॉ अशोक मराठे यानी तेथे संशोधन केले आणि आदिमानवी वसाहतीचे पुरावे शोधून काढले. तेथे त्याना दगडाची हत्यारे सापडली. कोकणात रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले पाचाड, मालवण तालुक्यातील पडवे आणि रत्नागिरीजवळचे हातखंबा या गावांमध्ये गुहांमध्ये आदिमानवी वस्ती आणि हत्याराचे अवशेष सापडले. पण सागर किनारच्या गुहेमध्ये प्रथमच दगडी हत्यारे आणि आदिमानवाची वस्ती असल्याचे पुरावे मिळाले.कोकणात सुमारे पाऊण लाख वर्षापूर्वी आदिमानवी वसाहती होत्या हे दर्शविणारा पालशेत गावचा हा पुरावा देशाच्या इतिहासात महत्वाचा आहे. दुसरा याच गावातला पुरावा प्राचीन इतिहासात जागतिक महत्वाचा आहे. पालशेत गावी एका प्राचीन बंदराचे अवशेष सापडले. डॉ. अशोक मराठे यानीच ते अवशेष शोधून काढले. पण नंतर पुरेसा निधी सरकारकडून कामासाठी मिळत नाही म्हणून या बंदराच्या बाकीच्या अवशेषांविषयीचे संशोधन अपुरे राहिले आहे. पण ग्रीसमधील हजार वर्षापूर्वी नकाशे तयार भूगोलाबाबत संशोधन करणारा पेरिप्लस याने कोकण किनाऱ्यावरील अनेक बंदरांचा उल्लेख केला आहे. त्यात वेंगुर्ले, दाभोळ आदि बंदरांचा सुमारे दोन वर्षांपूर्वी नकाशे तयार करून भुगोलाबाबत संशोधन करणारा पेरीप्लस याने कोकण किनाऱ्यावरील अनेक बंदरांचा उल्लेख आहे. त्यात पल्लिपट्टमई या नावानं उल्लेख केलेले गाव म्हणजे पालशेत असावे असा डॉ. मराठे यांचा तर्क आहे. A legacy of history to Guhagar

A legacy of history to Guhagar

वेळंब गावचे ऐतिहासिक महत्व

प्राचीन काळात म्हणजे ब्रिटिश राजवट सुरु होईपर्यंत गुहागर गावात तालुका केंद्र नव्हते. वेळंब हा महाल म्हणजे महसुली विभाग होता. शिवकाळात आणि पेशव्यांच्या काळात वेळंबला हे महत्व होते. वेळंबमधील मोठे वाडे आणि अन्य अनेक जुन्या समृद्धीच्या खुणा आजही त्या वैभवाची आठवण सांगतात. वेळंब ही व्यापारी पेठ तर होतीच पण महाल या महसुली विभागाचे केंद्र म्हणून शिवकाल आणि पेशवाईत त्याचे महत्व असल्याने या गावाचा तालुक्याच्या विविध भागांशी जवळचा संबंध होता. तवसाळ येथे एक गढी बांधण्यात आली होती. A legacy of history to Guhagar
शिवकालाच्या पूर्वीपासून हा छोटा किल्ला होता. त्याचे नाव विजयगड़. तवसाळ हे जुन्या काळात महत्वाचे बंदर होते. त्याच्या संरक्षणासाठी त्याची रचना करण्यात आली होती. अडूर, बोऱ्या, बुधल, पालशेत, वेलदूर, अंजनवेल ही तालुक्यातील प्राचीन काळापासून महत्वाची बंदरे होती. अडूर, पालशेत, बोऱ्या बंदरातून थेट विदेशी व्यापार म्हणजे आखाती देश, रोम आणि इराण, इराकशी व्यापार चालत असावा अशी नोंद मिळते. A legacy of history to Guhagar

A legacy of history to Guhagar

सागरतळातील भिंत

डॉ. अशोक मराठे यानी गुहागर तालुक्याच्या प्राचीन इतिहासाविषयी संशोधन करून या तालुक्याच्या संदर्भात कमालीची मनोरंजक माहिती शोधून काढली. वेळणेश्वर, वेलदूर या भागात सागरतळाशी एक मोठी मानवनिर्मित भिंत असल्याचे डॉ. मराठे यानी उपग्रहामार्फत मिळालेल्या छायाचित्राच्या आधारे शोधून काढले. मोठमोठ्या शिळा रचून या भिंतीची रचना करण्यात आली असावी असा त्यांचा दावा आहे. गणपतीपुळेपासून हर्णे, आंजर्ले, केळशीपर्यंत सागर किनाऱ्यापासून जवळच अशा भिंती सापडल्या आहेत. अतिप्राचीन काळात या भागात एखादी प्रगत संस्कृती विकसित झाली होती आणि त्याचाच एक भाग म्हणून या संरक्षक भिंती बांधण्यात आल्या असाव्या असे डॉ. मराठे म्हणतात. पण अद्याप हा दावा निर्विवाद सिद्ध झाला नाही. A legacy of history to Guhagar

बंदरे, व्यापार आणि धर्मक्षेत्रे

गुहागर तालुक्यात शिलाहार काळात बराच विकास झाला. याच काळात गुहागर गावाला महत्व आले. सुमारे दीड हजार वर्षापूर्वी कोकणात ठाण्यापासून खारेपाटणपर्यंतच्या प्रदेशावर शिलाहार वंशाची राजवट होती. त्या काळात गुहागर तालुक्यात वेळणेश्वर, गुहागर, टाळकेश्वर आदि महत्वाच्या देवस्थानांचा विकास झाला. अनेक बंदरे विकसित झाली. गुहागर तालुक्यात वाशिष्ठी खाडीमध्ये असलेल्या काही गावांमध्ये या सर्व समृद्धीच्या खणा पहावयास मिळतात. कारूळ गावचे लक्ष्मीनारायणाचे मंदीर, पेवे गावी उध्वस्त झालेले शिवमंदीर अशा काही ठिकाणच्या पालशेत येथील प्राचीन बंदराचा धक्का मंदिरांचा इतिहास पाहिला तर मात्र खाडी भागात अनेक गावांमध्ये बऱ्याच ठिकाणी बागायती, शेतीचे उत्पन्न चांगले असावे आणि तालुका प्राचीन काळात समृद्ध असावा असा अंदाज आहे. A legacy of history to Guhagar

व्याडेश्वर महात्म्य ग्रंथातील इतिहास

गुहागरमध्ये रहाणारे कवि विश्वनाथ या पित्रे कुळात जन्माला आलेल्या ब्राह्मणाने इ.स. १६३७ म्हणजे शिवरायांच्या जन्मानंतर सात वर्षानी या ग्रंथाची रचना केली. या ग्रंथात देव व्याडेश्वराच्या मंदिराची उभारणी आणि गुहागर ग्रामाची रचना याचा सारा इतिहास अत्यंत काव्यमय भाषेत दिला आहे. भगवान परशुरामानी अपरांत भूमीची रचना केली त्यानंतर देशोदेशीचे ब्राह्मण आणि विविध कारागीर, शेतकरी यांच्या वसाहती केल्या त्याचे वर्णन केले आहे. व्याडी नावाच्या मुनीने या भूमीत तपस्या केल्याची माहिती आहे. नंतर साकुराणा नावाच्या राजाच्या काळात बांबूच्या बेटात लपलेले व्याडेश्वराचे लिंग एक गायीने तेथे नियमित दूध सोडण्याचा परिपाठ सुरु झाल्यावर गुराख्याने पाहणी केली तेव्हा प्रकटले. मग तेथे व्याडेश्वराचे मंदीर बांधले. त्यासाठी बुधल गावच्या बंदरातून नौकांमधून जयश्रीराणा या आपल्या मित्र राजाच्या क्षेत्रातून सांकुराणा राजाने आणले. हे जयश्री राणा राजे म्हणजेच आजच्या राणे घराण्याचे एक मूळ पूर्वज असल्याचा दावा आहे. सारे राणे येथूनच नंतर कोकणात आणि देशाच्या अन्य भागात गेले असाहि इतिहास सांगितला जातो. श्री देव व्याडेश्वराच्या मंदिरानंतर दुर्गामातेच्या मंदिराचे बांधकाम करण्यात आले. गुहागर परिसरातील रामेश्वर, वेळणेश्वर, गारेमाठ, टाळकेश्वर, तारकेश्वर, दाभोळचा दाभेलेश्वर, चिपळूणचे कार्तिकेयाचे आणि वींद्यवासिनीचे मंदिर, भगवान परशुराम, जयगडचा करहाटेश्वर आणि अगदी गोव्यापर्यंतच्या महत्वाच्या शिवमंदिरांचा उल्लेख आहे. तर उत्तरेकडच्या हरीहरेश्वर आणि कनकेश्वर या अत्यंत विख्यात अशा शिवमंदिरांचाहि उल्लेख आहे. श्रीधर नावाच्या नगररचनाकाराने गुहागर गावाची रचना केली. त्याचे सुंदर वर्णन या ग्रंथात आहे. A legacy of history to Guhagar

ग्रामस्य नाम विदधे गुहागार इति स्फुटम । यन्निर्मितो गुहारण्ये शिवपुत्रस्य वाख्यया

गुहारण्यात शिवपार्वतीच्या प्रतीतीने निर्माण केले असल्यामुळे श्रीधराने या गावाचे नाव गुहागर असे ठेवले.

पितराववतः पुत्रं भृशं स्नेहाद्यया तथा। दुर्गाव्याडेश्वरौ पुत्रं ग्रामं पालयतामिति ।।

माता आणि पिता ज्याप्रमाणे मोठ्या प्रेमाने आपल्या मुलांचे पालन करतात त्याप्रमाणे दुर्गादेवी आणि व्याडेश्वर यानी पुत्ररूप असलेल्या या गावाचे पालन करावे हा यामागचा हेतू.

अत एवोत्तरार्धेऽ स्य ग्रामस्य स्थापितांबिका। आद्ये वाडेश आस्तेऽसौ त्राणायोभयभागयो ।

म्हणूनच या गावाच्या उत्तरेकडच्या अर्ध्या भागात अंबिकेची स्थापना केली आणि पूर्वेकडच्या भागात
वाडेशाची. दोन्ही भागाच्या रक्षणासाठी ही विभागणी आहे.

भुक्तिदो यत्र वाडेशो रामेशो यत्र मुक्तिदः । दुर्गा विजयदा यत्र यत्रार्तिघ्नो गरामठ ।

ज्या गावात भुक्तप्रद वाडेश आहे, ज्यात मुक्ति देणारा रामेश आहे, विजयदात्री दुर्गा विद्यमान आहे
आणि आर्तिनाशन गरामठ आहे ते हे गुहागर गाव!

गुहाग्रामभिदमिदं क्षेत्र पापविनाशनम् । पंच नारायणा यत्र तत्र तीर्थाश्रयोऽम्बुधि

ज्या या क्षेत्रात पाच नारायण आहेत आणि ज्या ठिकाणी तीर्थाचा आश्रम असा सागर आहे ते हे गुहाग्राम (किवा गुहागर) नावाचे क्षेत्र पापविनाशक आहे. असे अत्यंत सुंदर वर्णन गुहागर गावाचे या ग्रंथात केले आहे. शिलाहार राजांच्या काळात म्हणजे इ.स. ७०० ते १२१४ या काळात कोकणाची राज्यव्यवस्था विकसित होऊन भरभराट झाली. त्याच काळात गुहागर चिपळूण आदि प्रमुख शहरांची रचना झाली. म्हणजे नव्याने नगररचना करण्यात आली. वसाहती वाढल्या. गुहागर हा तालुका प्रामुख्याने शेती, बागायती यावर अवलंबून असलेला तालुका आहे. त्या काळात तीर्थक्षेत्र म्हणून गुहागरची स्थापना आणि विकास झाला. गुहागरचे दुर्गादेवीचे देवस्थान हे देखील श्रीधर या वास्तुशिल्पकाराने गावाचा विकास केला त्या काळात म्हणजे सुमारे एक हजार वर्षापूर्वी स्थापन झाले. व्याडेश्वर आणि दुर्गादेवी यांची स्थापना एकाच वेळी करण्यात आली. देशभर ही देवस्थाने विख्यात आहेत. A legacy of history to Guhagar


शिवकाळीन गुहागर

शिवरायांच्या उदयापूर्वी आदिलशाहीचा अंमल या भागावर होता. पण शिवरायानी चिपळूणला आपल्या सैन्याचा तळ केला आणि त्यानी १६६० च्या सुमारास कोकणवर स्वारी करून मंडणगड, संगमेश्वर, राजापूर आदि प्रदेश जिंकला आणि गुहागरदेखील शिवरायांच्या स्वराज्यात सामील झाले. अंजनवेलच्या किल्ल्यावर शिवरायांची सेना होती. तेथून या प्रदेशाची व्यवस्था पाहिली जाई. A legacy of history to Guhagar

A legacy of history to Guhagar

पहिला पेशवा गोपाळगडावर

बाळाजी विश्वनाथ हा पहिला पेशवा होता. ते मूळचे श्रीवर्धनचे. त्यांचा जंजिऱ्याच्या सिद्दीशी बरखेडा झाला आणि त्यांच्या भावाला पोत्यात भरून बुडविण्यात आले. तेव्हा जीव वाचविण्यासाठी पळणारा विश्वनाथ अंजनवेलच्या गोपाळगडावर आला. तेथे किल्लेदाराच्या आश्रयाने तो असताना त्या किल्लेदाराने सिरीच्या भयाने पकडून त्याला ठेवले. तेव्हा किल्लेदाराला लाच देऊन बाळाजी विश्वनाथ तेथून पळाला आणि तो चिपळूणला आला. तेव्हा गौतमेश्वराच्या मंदिराच्या जवळ असलेल्या वाड्यात राहिला आणि नंतर त्याने दळवटणे गावी जमीन घेऊन घर बांधले आणि नंतर तो वरघाटी साताऱ्याला गेला.राघोबादादा पेशवे यांची पत्नी आनंदीबाई ही मूळची गुहागर तालुक्यातील मळण या गावची होती. त्यांच्यासाठी गुहागर गावी एक खास विश्रामधाम सागर किनारी बांधण्यात आले होते. त्याचे देवघर अजून तेथे आहे. A legacy of history to Guhagar
१८१२ साली येथे दुसऱ्या बाजीरावाने एक वाडा बांधला. १८२९ ते १८७३ या काळात गुहागर तालुक्याचे ठिकाण होते. पण नंतर ब्रिटीश राजवटीत त्याचा तालुक्याचा दर्जा काढून घेऊन तो पेटा म्हणून चिपळूणला जोडण्यात आला. पण नंतर सुमारे चाळीस वर्षापूर्वी पुन्हा गुहागर तालुका हा पूर्ण तालुका झाला. A legacy of history to Guhagar

महापुरुषांची भूमी

गुहागर तालुका ही अनेक विद्वान आणि महापुरूषांची भूमी आहे. आचार्य विनोबा भावे यांचे घराणे मूळचे अडूर गावचे आहे. तर वेळणेश्वर हे मूळचे गाडगीळांचे गाव आहे. काँग्रेसचे विख्यात नेते आणि माजी केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ आणि त्यांचे चिरंजीव बॅ. विठ्ठलराव गाडगीळ हे मूळचे वेळणेश्वरचे आहेत. शीर हे गाव आहे कवी माधव यांचे कवी माधव केशव काटदरे यानी अत्यंत सुंदर काव्य कोकण आणि ऐतिहासिक घटनांविषयी लिहिले. विख्यात हार्मोनियम वादक गोविंदराव पटवर्धन आणि विख्यात
प्रकाशक अप्पा परचुरे हे गुहागरचे आहेत. नामवंत इतिहासकार वासुदेवशास्त्री खरे हे गुहागरचे. नामवंत अभिनेते विनोद पवार हे गुहागर तालुक्यातील पवार साखरी गावचे. अनेक नामवंत हे या तालुक्यातील आहेत. A legacy of history to Guhagar

राजकीय वाटचाल

गुहागर तालुक्याला दीर्घकाळ जनसंघ आणि भाजपचे नेते डॉ. तात्यासाहेब नातू आणि गुहागर तालुक्याला दीर्घकाळ जनसंघ त्यांचे चिरंजीव डॉ विनय लाभले. डॉ. तात्यासाहेब लोकप्रियता संपादन केली. त्यानी १९७० ते १९९५ या काळात चार वेळा आमदारपद भूषविले. डॉ. विनय नातू चारवेळा आमदार म्हणून निवडून आले. तसेच काँग्रेसचे स्व. केसरकर आणि रामभाऊ बेंडल यानीदेखील आमदारपद भूषविले. गुहागर पंचायत समितीचे सभापती म्हणून स्व. सदाशेठ आरेकर यांनी दीर्घकाळ अत्यंत संस्मरणीय कारकीर्द गाजविली. अलिकडच्या काळात स्व. नंदकिशोर पवार यांची सभापती म्हणून कारकीर्द गाजली. तर सध्या गुहागर-खेड- चिपळूण मतदार संघाचे आमदार म्हणून माजी मंत्री आणि या मतदार संघातून सलग तीनवेळा निवडून येणारे शिवसेनेचे आ. भास्करराव जाधव यानी समर्थ नेतृत्व या तालुक्याला दिले आहे. A legacy of history to Guhagarन

Tags: A legacy of history to GuhagarGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share111SendTweet69
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.