कालिदास विरचित मेघदूत काव्याचे पठण
रत्नागिरी, ता. 01 : रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पां. वा. काणे रत्नागिरी उपकेंद्रामध्ये काल ३० जून रोजी कालिदास दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांच्या हस्ते कालिदासांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. तसेच सायंकाळी ४ वाजता निसर्गाच्या सान्निध्यात कालिदास विरचित मेघदूत या काव्याचे पठण करण्यात आले. Kalidasa Day celebrated in Ratnagiri

या वेळी संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी उद्बोधनपर भाषणात उपस्थितांना उद्देशून कालिदासदिनाचे औचित्य सांगितले. समग्र संस्कृत साहित्यातील बहुतांश भाग कालिदासाच्या साहित्याने व्यापला आहे, असे म्हणत राष्ट्रकवी म्हणून जगद्विख्यात असलेल्या कालिदासाच्या प्रसिद्ध सप्त कृतींविषयी माहिती दिली. कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाकडून कालिदासाच्या रघुवंशम् आणि कुमारसंभवम् ही महाकाव्ये, मेघदूत व ऋतुसंहार ही खंडकाव्ये, अभिज्ञानशाकुंतलम्, विक्रमोर्वशीयम्, मालविकाग्निमित्रम् ही नाटके या सात कृतींचे मराठी भाषेत अनुवादित झालेल्या साहित्याचा सर्वांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. Kalidasa Day celebrated in Ratnagiri

यावेळी उपकेंद्रातील कर्मचारी, लिपिक, व्याख्याते उपस्थित होते. डॉ. पां. वा. काणे संस्कृत उपकेंद्रातर्फे संस्कृत विषयक नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. रत्नागिरीकर विद्यार्थ्यांनी, संस्कृतप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. Kalidasa Day celebrated in Ratnagiri

