सरपंच शिगवण यांनी घेतली गटशिक्षणाधिकारी भागवत यांची भेट
गुहागर, ता. 26 : गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा तळवली क्रमांक १ ची इमारत धोकादायक झाली आहे. त्यामुळे पहिली ते चौथी शाळा बौद्ध वाडीतील समाज मंदिर तळवली येथे घेण्यात येते. एका खोलीमध्ये तिसरी व चौथीचा वर्ग व दुसऱ्या खोलीमध्ये पहिली व दुसरीचा वर्ग भरत आहे. ही शाळा पहिली ते सातवी पर्यंत होती. परंतु विद्यार्थी पट संख्या कमी झाल्याने फक्त पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग शिल्लक राहिले आहेत. Talwali Z.P. school dangerous

शाळेची इमारत एकूण ५ खोल्यांची आहे. इमारतीमध्ये सध्या पहिली ते चौथी मध्ये १८ विद्यार्थी पट संख्या आहे. या शाळेची इमारत पूर्णतः धोकादायक स्थितीत असून सन २०२१ /२२ मध्ये या शाळेच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव गुहागर शिक्षण विभागाकडून जिल्हास्तरावर पाठविण्यात आला आहे. परंतु अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. विद्यार्थ्यांना या इमारतीमध्ये बसवणे धोकादायक असल्याने येथील बौद्ध वाडीतील समाज मंदिरात विद्यार्थ्यांची शाळा भरत आहे. १८ विद्यार्थ्यांना दोन शिक्षक सध्या कार्यरत आहेत. Talwali Z.P. school dangerous

जुन्या इमारतीमध्ये धोकादायक स्थितीतच विद्यार्थी बसत होते. परंतु यावर्षी सदर इमारत जास्त धोकादायक बनू शकल्याने या इमारतीमध्ये विद्यार्थी बसविण्यात ग्रामस्थांनी विरोध केला. तळवली ग्रामपंचायतच्यावतीने देखील याबाबत प्रस्ताव पाठवले आहेत. याकडे संबंधीत विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. नवीन इमारत मिळण्यासाठी तळवली ग्रामपंचायत सरपंच मयुरी शिगवण यांनी नुकतीच येथील शिक्षण विभागाच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी भागवत यांची भेट घेऊन कैफियत मांडली. शेवटी शिक्षण विभागाकडून लवकरात लवकर इमारतीचा प्रश्न मार्गी लावू असे सांगितले. गेली दोन वर्षे कोरोना काळात शाळांच्या दुरुस्तीकडे कुणीच लक्ष दिले नसल्याने अनेक शाळांची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे ऑनलाईन शिक्षणाच्या युगात शाळांच्या दुरुस्तीकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. Talwali Z.P. school dangerous

