अभ्यास गटाचा दावा चिपळूण बचाव समितीने फेटाळला
चिपळूण, ता. 23 : कोळकेवाडीतून येणाऱ्या अवजलाच्या अभ्यासासाठी नियुक्त गटाने पहिल्याच बैठकीत गतवर्षीच्या महापुराला कोळकेवाडी धरण जबाबदार नसल्याच्या केलेल्या दाव्याला मंगळवारी चिपळूण बचाव समितीने आक्षेप घेतला आहे. शिवाय ज्या अधिकाऱ्यांची वाट लावली तेच अधिकारी आता चौकशी करणार असतील तर चिपळूणकरांना न्याय मिळणार नाही. त्यापेक्षा टाटा किंवा आयआयटी अशा संस्थेकडून २२ जुलैच्या पुराची चौकशी करावी, अशी मागणी प्रसिद्धीपत्रकाद्वारे समितीने केली आहे. Kolkewadi Dam

समितीचे बापू काणे, शिरीष काटकर, अरुण भोजने यांनी दिलेल्या या पत्रकात पुढे म्हटले आहे की, अभ्यास गटाच्या म्हणण्यानुसार गतवर्षी २२ जुलै रोजी ११ हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आले होते. म्हणजे आम्ही बचाव समिती व समस्त चिपळूण नागरिक जे टाहो फोडून सांगत होते की, कोळकेवाडी धरणातून पाणी सोडण्यात आलेले आहे. परंतु संबंधित आभिप्रायामुळे आमचे म्हणणं हे अधोरेखित झालं आहे, असे समितीने म्हटले आहे. Kolkewadi Dam

अभ्यासगटाच्या म्हणण्यानुसार अकरा हजार क्युसेक पाणी सोडल्यामुळे महापुराची दाहकता वाढली नाही. कारण वाशिष्ठीची क्षमता ही अडीच लाख क्युसेक आहे. त्यांचं हे म्हणणं पुर्णपणे चुकीचं आहे. कारण पोफळीच्या पायथ्यापासून ते गोवळकोटपर्यंत नदीचे पात्र रुंदीला कमीत कमी ७० मीटर व जास्तीत जास्त १३० मीटर आहे. नदीपात्रामध्ये पुर्वीचे असलेल्या बेटांचे आकार हे दुपटीने वाढल्यामुळे तसेच नदीमध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळामुळे नदीची धारण क्षमता व वहन क्षमताही जास्तीत जास्त १७ हजार क्युसेक असू शकते. Kolkewadi Dam

त्यामुळे कोळकेवाडी धरण व पोफळी येथील छोटे धरण यांच्यातून सोडलेल्या पाण्यामुळेच पुराची दाहकता वाढली हे सत्य आहे. २१ व २२ जुलै रोजी कोळकेवाडी व कोयना धरण व्यवस्थापनांच्यावतीने धरणांत पूर नियंत्रण करण्यासाठी कुठलेही उपाययोजना करण्यात आली नाही. भारतीय वेधशाळेने ८ दिवसांपुर्वीच अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्याची दखल घेऊन कोयना धरण व कोळकेवाडी धरण व्यवस्थापन यांनी धरणातील पाणीसाठा हा कमीतकमी क्षमतेचा ठेवायला हवा होता. परंतु तसे न करता २१ जुलै रोजी कोयना धरणामध्ये 80 टीएमसी पाणी साठा होता. परिणामी कोयना खोऱ्यात कोसळणाऱ्या पावसाचे पाणी साठवण करता आले नाही. ते वीज निर्मितीच्या माध्यमातून नदी व कालव्यांतून सोडण्यात आले, असे समितीचे म्हणणे आहे. Kolkewadi Dam
