पिंपरी – चिंचवड येथे होणार सन्मान
पुणे, ता. 23 : पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक आणि मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त, राजकीय विश्लेषक एस.एम देशमुख यांना पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्यावतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शनिवार दिनांक २५ जून रोजी पिंपरी-चिंचवड येथील आचार्य अत्रे सभागृहात सकाळी ११ वाजता हा सोहळा संपन्न होत आहे. Jeevan Gaurav Award

ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते देशमुख यांना सन्मानित करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय महाराष्ट्र वाहिनीचे संपादक प्रसाद काथे असतील. विशेष अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते अँड. असिम सरोदे उपस्थित राहणार आहेत. यावेळी परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, महिला संघटक जान्हवी पाटील, राज्य प्रसिध्दीप्रमूख अनिल महाजन आदि परिषदेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. Jeevan Gaurav Award

एस.एम देशमुख यांनी पत्रकारांच्या हक्कासाठी आणि हितासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या सतत तीस वर्षांच्या अथक परिश्रमातून आणि संघर्षातून राज्यातील पत्रकारांना कायदेशीर संरक्षण मिळाले. पत्रकार संरक्षण कायदा असणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. याचे सर्वस्वी श्रेय एस.एम देशमुख यांना आहे. पत्रकार पेन्शन योजना, पत्रकार आरोग्य योजनेसह पत्रकारांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावून पत्रकारांना मोठा आधार दिला आहे. एखादा पत्रकार आजारी असेल, एखाद्या पत्रकारावर हल्ला झाला असेल तर संबंधित पत्रकारांना पहिल्यांदा देशमुख यांची आठवण होते. ते गरजू पत्रकारांच्या मदतीला धावून देखील जातात, याचा अनुभव राज्यातील अनेकांनी घेतला. राज्यातील पत्रकारांसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या एस.एम देशमुख यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्य असल्याचे पिंपरी – चिंचवड पत्रकार संघाने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. Jeevan Gaurav Award

पत्रकारांचे कंठमणी असलेल्या एस.एम. देशमुख यांच्या सत्कार सोहळ्यास राज्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे, असे आवाहन पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, संघटक सुनील नाना जगताप, सोशल मिडीया परिषदेचे जिल्हा प्रमुख जनार्दन दांडगे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, बाळासाहेब ढसाळ,अरूण नाना कांबळे आदिंनी केले आहे. सत्कार सोहळयापुर्वी सकाळी ९.३० वाजता पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अनेक तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. Jeevan Gaurav Award