लेखिका : सुचिता भागवत, चिपळूण 9273609555
“ताई मला रेकी द्याल का, माझ्या छातीत दुखतय .. ” मला त्यांचा फोन आला… तशी आमची ओळख फारशी नव्हती. एका निसर्गोपचार ग्रुप वर आम्ही एकत्र होतो इतकच.. पण हक्काची हाक ऐकली आणि रेकी ने ही साथ दिली…
पुन्हा त्यांचा संध्याकाळी फोन आला -“आता छान वाटतंय ”
आमची तशी पाहिली तर पहिलीच भेट . त्यानंतर फोनवर अनेकदा भेट होत असते..
पण प्रत्येक भेटीत ही व्यक्ती काहीतरी वेगळी आहे हे जाणवत गेलं.. विशेष करून अंतर्बाह्य निर्मळ ; एखाद्या लहान मुलासारखा निष्कपट व्यक्तिमत्व… Tree lover rajendra

खरं तर त्यांचं वय पन्नास च्या पुढे असेल पण कायम ताई नाहीतर मॅडम म्हणणार..
अधेमधे बोलणं व्हायचं त्यातून त्यांचा वेगळेपणा उलगडत गेला ..
त्यांच्या निर्मळतेच मूळ लक्षात आलं ..सरकारी नोकरी करणाऱ्याला हे असलं “वेड” असावं याचं मला आजही आश्चर्य वाटतं ..
ते वेड होतं – वडाच्या, पिंपळाच्या, उंबराच्या झाडांना जगवण्याचं, त्यांची लागवड करण्याचं..
नोकरीवरून आल्यावर, सकाळच्या वेळी किंवा सुट्टीच्या दिवशी हा अवलिया बाहेर पडतो.. स्वखर्चाने वड, पिंपळ, उंबर अशी झाडं विकत घेऊन अनेक ठिकाणी लागवड करतो. त्याला स्वतःला पाणी घालतो.. पोटच्या लेकराला नेहा न्याहाळाव, जपावं तसं त्यांना पाहतो, जपतो…
कुणाचं लग्न, मुंज वा कार्यक्रम असला तर वटवृक्षाचे रोप भेट देणार… स्वागत समारंभ असो किंवा कुणाचा निरोप समारंभ पण यांची भेट पात्र ठरलेली… वड, पिंपळ, उंबर यांची रोपं..
एकदा असाच त्यांचा फोन आला ..आवाज खूप थकलेला; जवळच कुणी गेल्यावर असतो ना तसा खोल…” ताई बघा हो, हे लोक वणवे लावतात, सिग्रेट फेकतात .. मी वाढवलेली झाडे जळून गेली …”
मी काय बोलणार… त्यांनी लावलेली रोज शिंपून वाढवलेली झाडं जळून करपुन त्यांचे सांगाडे झालेले पाहताना त्यांना काय वाटलं असेल बरं …
आईच दुःख हे केवळ आईच जाणे…
एकदा मला म्हणाले, गावोगावी वड, पिंपळ लागले पाहिजेत.. जगले पाहिजेत…”
यानंतर अनेक वेळा या विषयावर आमचं बोलणं होत असतं..
ते म्हणाले ,”आपण आज आपल्या आजा- पणज्यांनी लावलेल्या झाडांच्या जीवावर श्वास घेतोय ..आपण त्यांचे पांग पुढच्या पिढ्यांसाठी झाडे लावून फेडायला नकोत का ? आता बघा, हा वड, पाच-सातशे वर्षाहून जास्त जगेल..किती पिढ्यांची सोय होईल.. Tree lover rajendra

खरच माणसं ध्येयवेडी असतात पण त्या वेडामागे भविष्यासाठी एवढं मोठं शहाणपण दडलेलं पाहताना मन सुखावतं ..आपणही यात आपला खारीचा वाटा द्यावा असं मला नेहमी वाटतं आणि म्हणून माझ्या कार्यक्रमांमध्ये ग्रामीण भागात मी हा विषय मांडायला सुरुवात केली …
वडाचं झाड तासाला 712 कीलो ऑक्सिजन देतं त्याची किंमत आज एका ऑक्सीजन सिलेंडर साठी (दहा लिटर च्या) साडेपाच हजार रुपये या तुलनेत किती होईल बरं…
तर असे हे काळाची गरज ओळखून, निस्वार्थ भावनेने कार्य करणारे ओरोस (तालुका- कुडाळ) येथील श्री राजेंद्र कदम…
आज वटपौर्णिमा; आजच्या दिवशी राजेंद्र दादांसारख्या व्यक्तीच्या कार्याची दखल घेतली आणि त्यात आपलं योगदान दिलं तरी येणाऱ्या पिढ्यांच्या आयुष्य वृद्धीचा आशीर्वाद ते यमराज हसत हसत देतील..!!
पाण्याचा साठा करून ठेवणारी, हजारो पक्षांना जीवन देणारी, शेकडो औषधी उपयोगांनी युक्त अशी वडाची झाडं वाचली पाहिजेत, नव्याने लागवड केली पाहिजेत.. हा त्यांचा ध्यास आहे.. त्यासाठी ते कुठेही जायला तयार असतात.. ढासळणाऱ्या निसर्गाचा तोल सावरण्याचा हा एक परिणामकारक उपाय राजेंद्र दादांनी शोधला आहे ..त्याचा होईल तितका प्रचार-प्रसार ते प्रसिद्धीपराङमुखतेने करतात.. अशा या निसर्गवेड्या अवलियाला मनःपूर्वक प्रणाम आणि त्यांच्या उदंड आयुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना…!! Tree lover rajendra
(श्री. राजेंद्र कदम : 9421367251)
