जिल्ह्यातील 11 महिलांना वुमन इन्फ्ल्युएन्सर पुरस्कार
गुहागर, ता. 11 : वेळणेश्र्वरच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. नेत्रा ठाकूर यांना सकाळ माध्यम समुहातर्फे आयडॉल ऑफ महाराष्ट्र (Netra Thakur Idol of Maharashtra) – वुमन इन्फ्ल्युएन्सर (प्रभावशाली महिला) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बुधवार 11 मे रोजी कोल्हापूर येथील हॉटेल सयाजी या पंचतारांकित हॉटेलमध्ये दिमाखदार सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मधुराज् रेसिपी या युट्यूब चॅनेलच्या निर्मात्या मधुरा बाचल यांच्या हस्ते सौ. नेत्रा ठाकूर यांना मानपत्र, देवून गौरविण्यात आले.


कोल्हापूरमध्ये आज सकाळ माध्यम समुहातर्फे विविध क्षेत्रात प्रभावी काम करणाऱ्या सांगली, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. तब्बल 70 लाख सबस्क्राईबर्स असलेल्या युट्यूब शेफ म्हणून जागतिक किर्ती मिळविलेल्या उद्योजिका मधुरा बाचल आणि प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार यांच्या हस्ते महिलांना गौरविण्यात आले. (Netra Thakur Idol of Maharashtra)


सकाळ आयडॉल ऑफ महाराष्ट्र – वुमन इन्फ्ल्युएन्सर (प्रभावशाली महिला) या पुरस्कारासाठी गुहागरमधील वेळणेश्र्वर जिल्हा परिषद सदस्या सौ. नेत्रा नवनीत ठाकूर निवड झाली. त्यांनी जिल्हा परिषद गटात असलेला जनसंपर्क, 4 कोटी 56 लाख 21 हजार रुपयांची केलेली 78 विकासकामे, कोरोना योद्धा म्हणून केलेली कामगिरी आणि नुकताच मिळालेला आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्कार यामुळे त्या राजकीय क्षेत्र (ग्रामीण) मधील प्रभावशाली महिला ठरल्या. (सौ. नेत्रा ठाकूर यांच्यावरील लेखात या मुद्द्यांचा तपशीलवार उल्लेख आहे.) (Netra Thakur Idol of Maharashtra)
नेत्राताईंचा गृहिणी ते राजकारणी प्रवास वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सकाळचे संपादक संचालक श्रीराम पवार म्हणाले की, सकाळ माध्यम समुहाने पहिल्यापासूनच बातमीदारीच्या पलिकडील आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे. समाजात जे चांगले आहे ते वेचावे आणि लोकांसमोर मांडावे याच भावनेतून या पुरस्कारांचे आयोजन केले आहे. सकाळ वुमन इन्फ्ल्युएन्सर पुरस्कारासाठी आपली निवड करताना काही निकष लावण्यात आले. त्यातून तुमची निवड केली गेली. त्यामुळे आपले कर्तृत्व सिद्ध झाले आहे. (Netra Thakur Idol of Maharashtra)
मधुरा बाचल म्हणाल्या, ‘संवेदनशिलता हा महिलांचा एक गुण आहे. यामुळे त्या कल्पक असतात. कुटुंबाचे पालन पोषण असो किंवा एखादा व्यवसाय असो समोर येणाऱ्या प्रत्येक संकटावर त्या मात करतात. अशा संकटांना मागे टाकून व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केलेल्या या स्त्रीशक्तीला माझा मानाचा मुजरा.अभिनेत्री माधुरी पवार म्हणाल्या, समाजात विविध क्षेत्रात महिलांनी आपली वेगळी ओळख बनवली आहे. त्यांच्या कार्यकर्तुत्वापुढे आसमानही ठेंगणे आहे. सकाळने दिलेल्या या पुरस्कारामुळे या महिलांना पुढचे पाऊल टाकण्याचे बळ मिळणार आहे. हा गुणगौरव सोहळा कायमस्वरुपी सर्वांच्या लक्षात राहील. (Netra Thakur Idol of Maharashtra)


Sakal Idol of Maharashtra – Women influencers
याच पुरस्कार सोहळ्यात रत्नागिरी जिल्ह्यातील राधिका राजेश पाथरे (अध्यक्ष. चिपळूण अर्बन सह.बँक), स्वप्ना प्रशांत यादव (मुख्य कार्यकारी अधिकारी, चिपळूण नागरी सह.पतसंस्था), नेत्रा नवनीत ठाकूर (सदस्य, जिल्हा परिषद, रत्नागिरी), वैभवी वैभव खेडेकर (सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षिका, खेड), प्रणाली प्रकाश जंगम (कावेरी गृहोद्योग, भरणे-खेड), साक्षी संतोष रावणंग (पंचायत समिती सदस्य, रत्नागिरी, निवळी), लिला मोहन घडशी (सामाजिक कार्यकर्त्या, लांजा), दिपाली दिपक पंडीत (सहाय्यक अधिकारी, उप विभागीय कार्यालय, राजापूर), ॲड. सुनैना सत्यनारायण देसाई (नोटरी, राजापूर), रेश्मा राजेंद्र जोशी (संचालिका, जागृत ग्रुप, रत्नागिरी-सिंधुदूर्ग), स्नेहल सुधीर यशवंतराव (राज्य महिला उपाध्याक्षा, पुरोगामी शिक्षक समिती, संचालक प्राथमिक शिक्षक सह.पतपेढी, रत्नागिरी) या महिलांचाही सकाळ आयडॉल ऑफ महाराष्ट्र – वुमन इन्फ्ल्युएन्सर (प्रभावशाली महिला) पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. (Sakal Idol of Maharashtra)
पुरस्कार वितरण सोहळ्याची सुरवात ऋद्रम बँडच्या शुभम साळोखे आणि रोहीत सुतार यांनी गिटार आणि ड्रमच्या साथीने बहारदार गाण्यांनी केली. यावेळी सकाळचे निवासी संपादक निखिल पंडीतराव, स्मार्ट सोबती पुरवणीच्या संपादिका सुरेखा पवार, मुख्य व्यवस्थापक (जाहिरात) आनंद शेळके, वरिष्ठ व्यवस्थापक (जाहिरात) उदय देशपांडे, ऐश्वर्या बेहेरे सकाळच्या सांगली आवृत्तीचे सहयोगी संपादक शेखर जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. (Netra Thakur Idol of Maharashtra)