रत्नागिरीत ह.भ.प. नंदकुमार कर्वे यांचे कीर्तन
रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने ५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता कीर्तनसंध्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये पनवेल येथील ह.भ.प. कीर्तनभास्कर अनंत गणेश तथा नंदकुमार कर्वे गोंडवाना संस्थानच्या राजघराण्यातील तीन पिढ्यांचे बलिदान या आख्यान विषयावर कीर्तन करणार आहेत. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या झाडगाव, शेरेनाका येथील राणी लक्ष्मीबाई सभागृहात कीर्तन रंगणार आहे. त्यांना तबलासाथ विश्वनाथ दाबके आणि हार्मोनियमसाथ चैतन्य पटवर्धन करणार आहेत. Kirtan in Ratnagiri

ह.भ.प. कर्वे यांना अलीकडेच रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचा आदर्श कीर्तनकार पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. भजनी कलाकार असलेल्या वडिलांकडून त्यांना संगीताचा वारसा लाभला. संगीत विशारद (हार्मोनियम वादन), संगीत अलंकार असलेले कर्वे हे रसायनी येथे एचओसी स्कूलमध्ये संगीत शिक्षक होते. संगीत राज्य नाट्य स्पर्धेत भूमिका व संगीत संयोजन केले. पनवेल कल्चरल सेंटरचे ते माजी अध्यक्ष आहेत. 1984 पासून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, गोवा आणि कर्नाटक राज्यात त्यांनी कीर्तने केली आहेत. त्यांना उज्जैन येथे कीर्तनरत्न ही उपाधी प्राप्त झाली. तसेच नागनाथ जोशी चर्होलीकर स्मृती पुरस्कार व कीर्तन भूषण पदवी, शृंगेरीपीठाधिश प. पू. विधुशेखर भारती तीर्थस्वामी महाराजांच्या हस्ते कीर्तनभूषण पुरस्कार, हरिकीर्तनोत्तेजक सभेतर्फे कीर्तनभास्कर पदवी प्राप्त झाली आहे. Kirtan in Ratnagiri

भारतीय स्वातंत्र्यासाठी देशभरातील विविध ठिकाणच्या देशभक्तांनी योगदान दिले. यामध्ये गोंडवाना संस्थानच्या राजघराण्यातील पिढ्यांचेही योगदान होते. त्यामुळे या राजघराण्यातील तीन पिढयांचे बलिदान ते मांडणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर व उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये यांनी केले आहे. Kirtan in Ratnagiri
