गाडीचे नुकसान, प्रवासी सुखरुप, गवा गेला पळून
गुहागर, ता. 01 : तालुक्यातील पाटपन्हाळे साळवी स्टॉप येथे चालत्या एस.टी.वर गवा येवून आदळला. सुदैवाने एस.टी. असलेले प्रवासी, चालक, वाहक यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. गवा देखील तेथून पळून गेला. ही घटना रविवार, 1 मे रोजी सायंकाळी 7.30 च्या दरम्यान घडली. Gaur Hit ST Bus

गुहागर शृंगारतळी रस्त्यावर साळवी स्टॉप परिसरात चार ते पाच गव्यांची टोळी आहे. रस्त्यावरुन ये जा करणाऱ्या अनेकांनी हे गवे पाहिले आहेत. यामध्ये एक गवा उंच, धिप्पाड आहे. रविवारी सायंकाळी बोरीवली गुहागर ही गाडी शृंगारतळीकडून गुहागरकडे येत होती. साळवी स्टॉप येथे काही प्रवाशांना उतरवून गाडी मार्गस्थ झाली. इतक्यात रस्त्याच्या बाजुने धावत आलेला गवा थेट एस.टी.च्या दर्शनी भागावर आपटला. धिप्पाड गवा इतक्या वेगात आला होता की धडकेनंतर गवा रस्त्यावर पडला. या घटनेमध्ये एस.टी.च्या काचेसह दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी बोरिवली गुहागर एस.टी.मध्ये केवळ चार पाच प्रवासी होते. चालक वाहकासह प्रवासी सुखरुप आहेत. Gaur Hit ST Bus

दुर्घटनेची माहिती मिळाल्यावर डेपो व्यवस्थापकांसह एस.टी.च्या यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक पहाणीमध्ये एस.टी.चे सुमारे 35 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. Gaur Hit ST Bus

