देशव्यापी संपात गुहागरच्या सेविकाही सहभागी होणार
गुहागर, ता. 27 : मानधनवाढ, मासिक पेन्शन, नवीन मोबाईल देणे आदी 25 मागण्यांबाबत शासनासोबत केलेल्या चर्चा फोल ठरल्या. त्यामुळे 28 व 29 मार्च असे दोन दिवस अंगणवाडी सेविकांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती सामील होत आहे. या संपात सहभागी होत असल्याचे पत्र गुहागरचे बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना अंगणवाडी कर्मचारी सभा शाखा गुहागरने दिले आहे. (Aganwadi Sevika on Strike)

गुहागरमधील अंगणवाडी कर्मचारी सभा शाखा गुहागरच्या अध्यक्षा सारिका हळदणकर, श्रध्दा वराडकर, स्नेहल साळवी, राधा आंबेकर आदी पदाधिकाऱ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना संपात सहभागी होण्याबाबतचे पत्र दिले आहे. संप कालावधी अंगणवाड्यांचे नित्य काम, प्रशिक्षण, मिटींग, सभा यामध्ये अंगणवाडी सेविका सहभागी होणार नाहीत. असे या पत्रात म्हटले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने संपाबाबतचे पत्र राज्य पातळीवर महिला व बालविकास मंत्री, राज्यमंत्री, सचिव आणि एकात्मिक बालविकास सेवा योजनाचे आयुक्त यांना कृती समितीने दिले आहे. या पत्राची प्रतही गुहागरच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आली. (Aganwadi Sevika on Strike)

Aganwadi Sevika on Strike
कृती समितीच्या पत्रात 25 मागण्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. तो पुढीलप्रमाणे :
१. कोरोना नियंत्रणात आल्याने नियमित कामकाज सुरु करावे. अंगणवाडीत मिळणारा गरम, ताजा, दैनंदिन पूरक पोषण आहार पुन्हा सुरु करावा.
२. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून घोषित करुन शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, वेतनश्रेणी व अन्य लाभ लागू करावे.
3. निवृत्त होताना एकरकमी सेवासमाप्ती लाभाव्यतिरिक्त किमान वैयक्तिक गरजा भागवता येथील इतकी मासिक पेन्शन मिळावी.
4. सर्व मिनी अंगणवाड्यांचे पूर्ण अंगणवाडीत रुपांतर करावे.
5. अंगणवाडीच्या दैनंदिन कामकाजासाठी उत्तम प्रतिचा मोबाईल, मराठीमधील निर्दोष ॲप द्यावे. डेटा रिचार्जची योग्य रक्कम देण्याची व्यवस्था व्हावी.
6. किरकोळ खर्चासाठीची रक्कम 5000 करण्याचे शासनाने मान्य केले होते. त्याची अंमलबजावणी व्हावी.
7. मोबाईलमधील पोषण ट्रॅकर ॲपवर माहिती भरण्यासाठी देण्यात येणारा प्रोत्साहन भत्ता नियमीत मिळावा.
8. प्रवास व बैठक भत्ता काही ठिकाणी दोन ते तीन वर्ष थकित आहे. सदर थकबाकी त्वरीत द्यावी. तसेच यापुढे दर महिन्याला भत्ता मानधनासोबत मिळावा.
9. गणवेशासाठीची रक्कम वाढवावी.
10. अंगणवाड्यांना लागणारे वजन काटे, सतरंज्या आदी साहित्य शासनाकडून नियमितपणे मिळावे.
11. अंगणवाड्या चांगल्या जागेत सुरु व्हाव्यात यासाठी शासनाने भाड्याची रक्कम वाढवावी. सदर भाडे शासनाने जागा मालकाला नियमितपणे द्यावे.
12. मुख्य सेविकांचे काम अंगणवाडी सेविकांवर लादण्यात येवू नये.
13. अंगणवाडी सेविका, मदतनीस, मुख्य सेविका व प्रकल्प अधिकाऱ्यांच्या राज्यात रिक्त असलेल्या जागा भराव्यात. रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया निवृत्तीच्या किमान 6 महिने आधी सुरु करावी.
14. विवाह, पतीची बदली, मुलांचे शिक्षण अशा काही कारणाने सेविका, मदतनिसांना बदली हवी असल्यास संधी द्यावी.
15. पूरक पोषण आहाराचा दर्जा वाढवावा. नियमितपणे मिळावा. आहार पुरवठा पद्धतीत सुधारणा व्हावी.
16. पोषण आहात शिजविण्याची जबरदस्ती अंगणवाडी कर्मचाऱ्यांना करु नये.
17. अंगणवाडी सेविकांना वर्षातील 15 दिवस आजारपणाची पागरी रजा देण्यात यावी.
अशा एकूण 25 मागण्यांचे पत्र महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीमध्ये सहभागी असलेल्या अंगणवाडी कर्मचारी संघ, अंगणवाडी कर्मचारी संघटना, आयटक, अंगणवाडी कर्मचारी सभा, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघ, महाराष्ट्र राज्य पु. प्रा. सेविका आणि मदतनीस महासंघ, कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन या 7 संस्थांच्या प्रमुखाच्या सहीने देण्यात आले आहे.
