शिमगोत्सवानिमित्त प्रबोधनात्मक
गुहागर, ता. 23 : तालुक्यातील चिंद्रवळे गावात शिमगोत्सवाच्या निमित्ताने दिनांक १९ मार्च रोजी रात्री दहा वाजता ‘बहुरंगी नमन’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. गेली अनेक वर्षाची गावाची परंपरा जोपासत दोन दिवसांचा होळी उत्सव, पालखी नाचवण्याचा कार्यक्रम, इत्यादी दिवसा पार पडले. रात्री १० वाजता चिंद्रवळे गावाचे पारंपारिकतेबरोबरच आधुनिकतेला जोड देणारे बहुरंगी नमन मोठ्या उत्साहात पार पडले. Naman at Chindravale


वर्षभराने येणाऱ्या या कार्यक्रमाची संपूर्ण गाववाशीय मोठ्या आतुरतेने वाट पाहतात. मुंबई व शहरांमध्ये गेलेले अनेक जण यानिमित्ताने त्यांच्या मूळ गावी येतात. सणाच्या या दोन दिवशी आबालवृद्ध मिळून ग्रामदेवता श्रीचणकाई देवीच्या उत्सवात सहभागी होतात. यानिमित्ताने गावामध्ये एक उत्साहाचे व आनंदाचे वातावरण दिसून येते. Naman at Chindravale
या गावातील गेली अनेक वर्षाची परंपरा लाभलेले बहुरंगी नमन प्रसिद्ध आहे. यामध्ये संकासूर, राधा, विविध सोंगे (लाकडी मुखवटे), देखावे तसेच पारंपारिक श्रीगणपती, श्रीनटेश्वर, श्रीरणसूर, घोडा, खोजा, कफन चोर, देवी, राम-लक्ष्मण, त्राटिका सम्राट रावण, वाघ व सांबरे अशी विविध लाकडी सोंगे (मुखवटे घालून) सादर केली जातात. लाकडी सोंगाचे सादरीकरण हे या नमनाचे खास आकर्षण असते. ते पाहण्यासाठी गर्दी होते. त्याच बरोबर गण, गवळण, फार्स, वगनाट्य अशा कलाकृती सादर होतात. Naman at Chindravale


या पारंपारिक सादरीकरणात बहुजन समाजाच्या उद्धारासाठी कार्य केलेले महामानव सम्राट बळीराजा, जगद्गुरु संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पात्रांचे सादरीकरण प्रबोध प्रबोधनात्मक दृष्टीने केले जाते. महापुरुषांचे विचार समाजाला नमन या पारंपारिक लोककलेतून समजावून देण्याचा असा प्रयत्न गेले अनेक वर्षे या नमन मंडळामार्फत सुरू आहे. पार पडलेल्या बहुरंगी नमनाला पंचक्रोशीतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. Naman at Chindravale
बहुरंगी नमन सादरीकरणात कलाकार म्हणून गंगाराम डाफळे, भागोजी सोलकर, रामचंद्र डाफळे, दत्ताराम सोलकर, भिकू दाजी देऊळे, यशवंत सोलकर, शंकर गराटे, गोविंद गराटे, प्रभाकर गराटे, हरिश्चंद्र मते, सदाशिव पोस्कर, दत्ताराम डाफळे, गोविंद पोस्कर यांचा विशेष सहभाग होता. शिमगोत्सव उत्स्फूर्त उत्साहाने पार पडला. Naman at Chindravale

