टिंबलो शिपयार्डने जमीन कर थकविल्याने मालमत्ता जप्त
गुहागर, दि.19 : तालुक्यातील साखरी–त्रिशूळ मोहल्लावाडी, म्हस्करवाडी येथील क्षेत्रामध्ये उभारण्यात आलेल्या टिंबलो शिपयार्ड प्रा. ली. (Timblo Shipyard Pvt. LTD) या कंपनीने २०२१-२२ या वर्षाचा २ लाख ९८ हजार ५४७ रुपयांचा जमीन महसूल कर थकवल्याने गुहागर महसूल विभागाच्यावतीने तहसीलदार प्रतिभा वराळे (Tehsildar Pratibha Varale) यांनी दिलेल्या आदेशानुसार कंपनीचे कार्यालय व आवाराला असलेल्या गेटला सील ठोकण्यात आले आहे. Guhagar Revenue Department Action


साखरी-त्रिशुळ येथील मोहल्लावाडी, म्हस्करवाडी याठिकाणी टिंबलो शिपयार्ड कंपनीचा जहाज बांधणीचा प्रकल्प होता. याठिकाणी जहाज बांधणी होत असे. परंतु, काही वर्षे हा प्रकल्प पूर्णत: बंद आहे. या कंपनीने येथे घेतलेल्या २५ एकर २६ गुंठे या क्षेत्राचा वापर औद्योगिक कारणाकरिता केला असल्याने कंपनीने येथील जमीन महसूल कर भरणे आवश्यक होते. २०२१-२२ या वर्षाचा जमीन महसूल कर २ लाख ९८ हजार ५७४ इतका महसूल विभागाच्यावतीने आकारण्यात आला आहे. Guhagar Revenue Department Action
गत वर्षापर्यंत या कंपनीने जमीन महसूल कर भरला होता. परंतु यावर्षीचा कर अद्याप भरलेला नाही. कर भरण्याकरिता महसूल विभागाच्यावतीने वारंवार नोटीस देण्यात आल्या आहेत. सदरील कर भरण्याकरिता १० मार्च ही अंतिम तारीख देण्यात आली होती. परंतु कंपनीने कर भरला नाही. अखेर जमीन महसूल कर वसुली करिता गुहागर महसूल विभागाच्या वतीने कंपनीची स्थावर मालमत्ता जप्त करून ती सील करण्याची तहसीलदार प्रतिभा वराळे (Tehsildar Pratibha Varale) यांच्याकडून कारवाई करण्यात आली आहे. Guhagar Revenue Department Action
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १७६ (ड) प्रमाणे कंपनीने जमीन महसूल कर भरण्यास टाळाटाळ केली असल्याने स्थावर मालमत्ता कलम १८२ अन्वये कंपनीची मालमत्ता जप्त करून बुधवारी कंपनीचे कार्यालय आणि मुख्य प्रवेशद्वार सील करण्यात आले आहे. Guhagar Revenue Department Action
मंडल अधिकारी शशिकांत साळुखे, तलाठी हनुमंत भिसे यांनी कंपनीला सील ठोकण्याची कारवाई केली. थकलेल्या कराच्या रकमेचा बोजा कंपनीच्या सातबाऱ्यावर चढवण्यात येणार असल्याचे मंडल अधिकारी शशिकांत साळुखे यांनी सांगितले. Guhagar Revenue Department Action

