गुहागर, ता. 16 : शहरातील वरचापाट येथे गुहागर पोलीसांनी सार्वजनिक ठिकाणी करणाऱ्या एका व्यक्तीला रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री 8 वाजता करण्यात आली. सदर व्यक्तीवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (Police Catch Gambler)


याबाबत गुहागर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहिती नुसार, वरचापाट मोहल्ला येथे सार्वजनिक ठिकाणी मटक्याचा व्यवसाय चालतो. अशी माहिती पोलीसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरचापाट माहीमकर मोहल्ला येथील पुलावरील हालचालींवर पोलीस लक्ष ठेवून होते. मंगळवारी रात्री महेश किसन मोरे (वय 51) हे पुलावर हातात एक पावती पुस्तक घेवून बसलेले पोलीसांनी पाहिले. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. के. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंदराव पवार, पोलीस कॉनस्टेबल पी. बी. रहाटे आणि प्रथमेश कदम आणि पंच यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याचे लक्षात आल्यावर पोलीसांनी महेश मोरे याला धरले. त्यांच्या हातातील पुस्तकाची तपासणी केली असता, मुंबई मटका, शुभअंक या सदराखाली त्याने काही आकडे लिहिलेले पोलीसांच्या लक्षात आले. त्याप्रमाणे त्याच्याकडे 3210 रुपये सापडले. (Police Catch Gambler)
गुहागर वरचापाट भंडारवाडा येथे रहाणाऱ्या महेश मोरे याला पोलीसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडील साहित्य जप्त केले. पोलीसांनीच फिर्याद नोंदवून महेश मोरेवर जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली आहे. (Police Catch Gambler)

