दोघांमध्ये शैक्षणिक सामंजस्य करार
रत्नागिरी, दि. 01 : रत्नागिरीला संस्कृतच्या दृष्टीने पूर्वी मोठे वैभव प्राप्त झाले होते. येथे विद्वान, शास्त्री होऊन गेले. हे गतवैभव पुन्हा एकदा निर्माण करण्याकरिता रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास विश्वविद्यालयाचे (Kalidas University) भारतरत्न डॉ. पां. वा. काणे अध्ययन केंद्र आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा (Gogte-Joglekar College) संस्कृत विभाग यांनी सामंजस्य करार केला. या अंतर्गत कुलगुरु आणि प्राचार्य व उपप्राचार्य आदींच्या भेटीचा छोटेखानी कार्यक्रम गोगटे महाविद्यालयात झाला. विश्वविद्यालय व महाविद्यालयाची कोणतीही स्पर्धा नाही तर संस्कृत वाढीसाठी एकमेकांना पूरक काम करण्याचे ठरवण्यात आले. Reconciliation agreement


या सामंजस्य कराराअंतर्गत एकमेकांना पूरक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. महाविद्यालयात जे अभ्यासक्रम नाहीत ते केंद्रात चालू करण्यात येतील. तसेच विद्यार्थी व प्राध्यापक यांचे दोन्ही संस्थांना पूरक असे आदान- प्रदान होईल. संस्कृत प्रचार, प्रसारासाठी संयुक्त उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे याशिवाय संस्कृत विषयक कार्यशाळा व शिबीरांचे संयुक्त आयोजन केले जाईल. शैक्षणिक सहली व प्रवास यांचेही आयोजन केले जाणार आहे.
संस्कृत भाषा व साहित्य, भारतीय तत्वज्ञान, प्राचीन भारतीय विज्ञान, भारतीय ज्ञान परंपरा आणि सामाजिक उपक्रम या सर्व क्षेत्रात विश्वविद्यालय आणि गोगटे महाविद्यालय एकत्रित काम करणार आहेत. तसेच रत्नागिरीच्या संस्कृत परंपरेविषयी आणि संस्कृतच्या जास्तीत जास्त वाढीसाठी नवनवीन प्रकल्प हाती घेऊन संशोधन व माहिती संकलन, विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्याचे ठरवण्यात आले. Reconciliation agreement
जास्तीत जास्त शाळांमध्ये संस्कृत सुरू करणे आणि महाविद्यालयीन शिक्षणात संस्कृतकरिता विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याकरिता माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तरावर काम करण्याची सूचना प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी दिली. कोकणातील सर्वांत जुन्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे गोगटे महाविद्यालय असून संस्कृतची मोठी परंपरा येथे जपली जात असल्याचे महाविद्यालयाच्या संस्कृत विभाग प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी सांगितले.
या वेळी कुलगुरु डॉ. मधुसूदन पेन्ना यांनी महाविद्यालयाने उपकेंद्र सुरू झाल्यापासून मदतीचा हात दिला आहे, यापुढेही चांगले उपक्रम राबवू, संस्कृतकरिता योगदान देऊ अशी ग्वाही दिली. कुलसचिव डॉ. रामचंद्र जोशी यांनीही नवनवीन अभ्यासक्रम, पुस्तक प्रकाशन करण्याबाबत सूचना मांडल्या. उपकेंद्र संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी संस्कृतसाठी जे जे करता येईल, ते करू, प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करूया, असे सांगितले. Reconciliation agreement
विश्वविद्यालयाच्या वतीने कुलगुरू डॉ. मधुसूदन पेन्ना, कुलसचिव डॉ. रामचंद्र जोशी, उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, अॅड. आशिष आठवले आणि महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. कुलकर्णी, संस्कृत विभाग प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, उपप्राचार्य यास्मिन आवटे, डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई, सामंजस्य करार समितीच्या समन्वयक डॉ. चित्रा गोस्वामी, प्रा. जयंत अभ्यंकर आणि प्रा. स्नेहा शिवलकर आदी उपस्थित होते. Reconciliation agreement

