ग्राहकांच्या संतप्त प्रतिक्रियांनंतर नियोजन, भाजप मनसेने केली होती मागणी
गुहागर, ता. 03 : महावितरणने तालुक्यातील गुहागर, शृंगारतळी, आबलोली, पालशेत, तळवली व रानवी या शाखा कार्यालयांमध्ये विशेष तक्रार निवारण कक्ष उघडले आहेत. अशी माहिती गुहागरचे उप अभियंता गणेश गलांडे यांनी दिली आहे. भरमसाठ बीलांमुळे सर्वसामान्य ग्राहकांनी महावितरणच्या उपविभागीय कार्यालयावर धडक दिली होती.
महावितरण कंपनीने भरमसाठ वीज बिले माथी मारल्याने तालुक्यातील सुमारे साडेतीनशे संतप्त ग्राहकांनी सोमवारी (31 ऑगस्ट) शहरातील महावितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. वाढीव बीलांमुळे संतप्त असलेल्या ग्राहकांनी येथील अधिकार्यांना धारेवर धरल्याने अखेर जमावाला शांत करण्यासाठी अधिकार्यांना पोलिसांना बोलवावे लागले होते. या घटनेनंतर भाजप तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता, चिपळूण व उप अभियंता गुहागर यांच्याकडे निवेदन दिले. तालुका कार्यालयातील वाढत्या गर्दीमुळे तसेच कोरोना पार्श्वभूमीवर वीज बिलांमधील त्रुटी सुधारण्याकरता महावितरणने गुहागर तालुक्यातील आपल्या सहा शाखा कार्यालयात व्यवस्था करावी. अशी त्यांनी मागणी केली होती. मनसेचे तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी उपअभियंता गणेश गलांडे यांची भेट घेवून वाढीव बीले रद्द करावी अशी मागणी केली होती. तसेच बीले रद्द न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.
या पार्श्र्वभुमीवर महावितरणने तातडीने एक संदेश ग्राहकांपर्यंत पोचविला. या संदेशात म्हटले आहे की, गुहागर तालुक्यातील गुहागर, शृंगारतळी, आबलोली, पालशेत, तळवली व रानवी या शाखा कार्यालयांमध्ये विशेष तक्रार निवारण कक्ष उघडण्यात आले आहेत. चालू महिन्यामध्ये वीज बिले वाटण्यात आली आहेत. यामध्ये ग्राहकांच्या काही शंका असल्यास किंवा बिलामध्ये त्रुटी आढळून आल्यास त्यांनी सदर शाखा कार्यालयांना भेट द्यावी. तेथील कक्षात शंकानिरसन केले जाईल. जेणेकरुन जेणेकरून वीज ग्राहकांना प्रवास व गर्दी टाळता येईल व कोणताही गोंधळ उडणार नाही. सदर केंद्रांना भेट देताना मास्क परिधान करणे व सोशल डिस्टनसिंगचे पालन करणे अनिवार्य आहे.