भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांची मागणी
1.9.2020
गुहागर : तालुका कार्यालयातील वाढत्या गर्दीमुळे कोरोना पार्श्वभूमीवर वीज बिलांमधील त्रुटी सुधारण्याकरता महावितरणने स्वतंत्र व्यवस्था करावी. त्यासाठी गुहागर तालुक्यातील महावितरणच्या सहा शाखा कार्यालयांमध्ये मदत केंद्र निर्माण करावेत. अशी मागणी भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता, चिपळूण व उपअभियंता गुहागर यांच्याकडे केली आहे.कोरोना महामारी संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांना कोरोना काळात आलेली बीले, त्यांनी भरलेली ऑनलाईन बीले, प्रत्यक्षात घेतलेले मिटर रीडींग व आता आलेले वाढीव वीज बीले यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. त्यामुळे संतप्त वीज ग्राहकांनी महावितरणच्या तालुका कार्यालयासमोर सोमवारी (31 ऑगस्टला) मोठी गर्दी केली होती. ही गर्दी पाहून महावितरणला पोलीसांना बोलवावे लागले होते. अशा गर्दीमुळे कोरोना प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हे लक्षात घेऊन महावितरणने गुहागर तालुक्यातील गुहागर, पालशेत, शृंगारतळी, रानवी, तळवली व आबलोली येथील शाखा कार्यालयांच्या ठिकाणी तातडीने स्वतंत्र मदत केंद्रे सुरु करावीत. त्यामुळे वीज ग्राहकांचा वेळ व पैसा वाचेल. जनतेसह महावितरणचे अधिकारी कर्मचारी यांना कोरोना संसर्गासंदर्भातील काळजी घेता येईल. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. अशी मागणी तालुकाध्यक्ष सुर्वे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन सुर्वे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता, चिपळूण व उपअभियंता गुहागर यांना दिले आहे.