सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित दापोली विंटर सायक्लोथॉन २०२६, सिझन १० सायकल स्पर्धा १५ नोव्हेंबर २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाली. यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नासिक, सातारा इत्यादी शहरातील आणि राज्यातील इतर भागातील वय १० ते ७५ वयोगटातील १४० स्पर्धक सहभागी झाले होते. ७५ वर्षीय जेष्ठ रायडर गजानन भाताडे रत्नागिरी, अनेक सायकल मोहीमा केलेल्या कल्याणी तुळपुळे पुणे, सुनिल रिसबूड दापोली यांनी सायक्लोथॉनला झेंडा दाखवून शुभारंभ केला. Dapoli Winter Cyclothon 2026

ही सायक्लोथॉन स्पर्धा ५० किमी व ३० किमी कोस्टल सिनिक रुट अशा गटात झाली. राईड पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. दापोली, बुरोंडी, करजगाव, लाडघर, कर्दे, मुरुड, सालदुरे, पाळंदे, हर्णै, आसूद या समुद्रकिनाऱ्यावरील मार्गावर कोकणातील निसर्ग सौंदर्य अनुभवत सर्वांनी सायकल चालवली. मार्गावर असलेल्या अनेक पर्यटन ठिकाणांना भेटी दिल्या, कोकणी खाद्यपदार्थ, मासे इत्यादींचा आस्वाद घेतला. स्थानिक उत्पादनांची खरेदी केली. या सायक्लोथॉनमध्ये सहभागी झालेले काही स्पर्धक आपल्या कुटुंबासह २ ते ७ दिवसांसाठी दापोलीत मुक्कामाला आले होते. Dapoli Winter Cyclothon 2026

या सायक्लोथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईहून जितेंद्र यादव, अनिल वेल्लमपती, अतुल ओझा हे मुंबई ते दापोली सायकल चालवत आले होते. विद्याधर पालकर हे पुणे ते दापोली सायकल चालवत आले होते. गजानन भाताडे रत्नागिरी (वय ७५), अतुल ओझा मुंबई (वय ६४), शरद कुलकर्णी दौंड, अनिल धामणे पुणे, विठोबा चव्हाण मुंबई, नितीन बर्वे, सुनिल खरात इत्यादी काही ५८-६० वयोगटातील सायकलस्वारांनी ही सायक्लोथॉन राईड यशस्वीपणे पूर्ण केली, डॉ अनिल शिंदे वाई यांनी सिंगल गिअर सायकलने ही राईड पूर्ण केली. सायक्लोथॉन पूर्ण करणारे छोटे सायकलस्वार मेघराज कळमकर (वय १०), अद्वैत जोशी, ग्रिष्मा चव्हाण, रिद्धिमा चव्हाण, शल्व हेदूकर, सम्यक जैन, श्रीराम शिंदे, स्वराज राजपूरकर, आयुष शिंदे, वरद कदम हे ठरले. Dapoli Winter Cyclothon 2026
सायक्लोथॉनसाठी दापोली शिक्षण संस्था, दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज टीम, दापोली तालुका आरोग्य अधिकारी व टीम, दापोली पोलीस टीम, मेनेकी न्यूट्रीशन टीम, राहुल मंडलिक इत्यादी अनेकांचे सहकार्य लाभले. या सायक्लोथॉन स्पर्धेचे नियोजन करण्यात अंबरीश गुरव, प्रशांत पालवणकर, राजेशकुमार कदम, राजेंद्र नाचरे, सुनिल रिसबूड इत्यादी अनेकांनी मोलाची भूमिका बजावली. Dapoli Winter Cyclothon 2026
