गुहागर, ता. 31 : रिगल एज्युकेशन सोसायटी, चिपळूण संचलित रिगल कॉलेज, शृंगारतळी येथे विद्यार्थ्यांसाठी कराटे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू डॉ. योगिता खाडे यांचे स्वागत रिगल कॉलेजच्या प्राचार्या मा. सौ. रेश्मा मोरे यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. Karate training at Regal College
यानंतर डॉ. योगिता खाडे यांनी विद्यार्थ्यांना कराटेचे महत्त्व, त्याचे फायदे आणि स्वसंरक्षणाची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध व्यायामप्रकार, स्थिर व गतिमान हालचाली (Static and Dynamic Actions), मानेची स्थिती (Neck Position) तसेच यासोबतच स्वसंरक्षणासाठी आवश्यक असलेल्या नऊ पोझिशन्स, गेदान (Gedan), जोदान (Jodan) आणि किझामी झुकी (Kizami-zuki) यांसारख्या कराटे तंत्रांची माहिती देऊन त्यांची प्रात्यक्षिके करून दाखवली. विद्यार्थ्यांनीही या सर्व प्रकारांचा उत्स्फूर्तपणे सराव केला. Karate training at Regal College

आजच्या काळात प्रत्येक विद्यार्थ्याने, विशेषतः मुलींनी स्वसंरक्षणाचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. कराटेमुळे शारीरिक तंदुरुस्ती, आत्मविश्वास, शिस्त आणि संकटाच्या वेळी स्वतःचे संरक्षण करण्याची क्षमता विकसित होते, असे प्रतिपादन डॉ. योगिता खाडे यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये स्वसंरक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणे, शारीरिक क्षमता वाढविणे आणि आत्मविश्वास विकसित करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांनीही या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध कराटे व्यायामप्रकार व तंत्रांचा सराव केला. Karate training at Regal College

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. अदिती किल्लेकर यांनी केले. रिगल कॉलेजच्या प्राचार्या मा. सौ. रेश्मा मोरे, कार्यक्रम व्यवस्थापक प्रा. सौ. पूजा मोरे तसेच सर्व प्राध्यापकवर्ग यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली. या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे महत्त्व समजावून देण्याबरोबरच आत्मविश्वास, शिस्त आणि शारीरिक सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला. Karate training at Regal College
