लेखक: अपूर्व विकास, समुपदेशक व मानसशास्त्र तज्ज्ञ
Guhagar News : “मी काय कपडे घालायचे हे ठरवणारा तू कोण?” चोवीस वर्षांच्या लेकीचा चिडका प्रश्न अख्ख्या घरात घुमला. लेक पार्टीला निघाली होती. स्पाघेटी स्ट्रॅप्सचा डीप नेक टॉप आणि मिनी स्कर्ट. उघडी अंगप्रत्यंगं अगदी मादक दिसत होती. बाबाच्या कपाळावर आठी पडली. तो नकळत बोलून गेला, “अगं, काय हे…?” त्यावर लेकीची ही आगपाखड झाली होती. “तुझा संबंध काय? It’s my choice. My body, my rules. किती बॅकवर्ड आहेस तू…” सोफ्यावर TV बघत बसलेल्या मम्मीनेही नजरेनेच लेकीला साथ दिली.
बाबा शांत झाला. लेकीच्या चोवीस वर्षांच्या तामसिक नजरेत त्याने पन्नास वर्षांची अनुभवी नजर ओतली. “बरोबर आहे तुझं. मी कोण ठरवणारा? मी बाप असलो म्हणून काय झालं? तू उच्चशिक्षित आहेस. पहिलीच नोकरी अठ्ठावीस लाखाच्या पॅकेजची मिळवलीस. तुझं शरीर, तुझी मर्जी. फक्त एक प्रश्न – हा खरंच तुझा चॉईस आहे का? खात्री आहे तुला?”
लेकीने तळवे उडवले. “ऑफ कोर्स. म्हणजे काय? मी स्वतः निवडतेय हे कपडे.”
“हे कपडे पहिल्यांदा कुठे बघितलेस?” बाबाचा शांत प्रश्न. ती अडखळली. आपण हे कपडे सगळ्यात आधी कुठे बघितले? मैत्रिणींच्या अंगावर? रील्समध्ये? त्याआधी म्युझिक व्हिडिओ? त्याआधी मूवीज? खरंतर लहानपणापासून हेच बघतोय आपण. शेवटी ती चिडून म्हणाली, “Why does it matter? मी माझी सेक्शुअलिटी कशी कॅरी करायची हा माझा चॉईस आहे. मी एक मॉडर्न वूमन आहे. आणि हा माझा बोल्डनेस आहे. पुरुषप्रधान व्यवस्थेला चपराक आहे ही माझी.” डायलॉग भारी होता! My Body My Rules
पण जणू ती काही बोललीच नाही अशा थाटात बाबा म्हणाला, “मध्ययुगीन युरोपात मुलींना असे कपडे घालायला लावायचे, माहितीये?” ती हसली. “तू डोक्यावर पडलास का रे? तेव्हा मिनी स्कर्ट होते का?” बाबा शांतपणे म्हणाला, “नाही, पण डीप नेक होते. त्यातून जे दिसायचंय ते ठळकपणे दिसावं म्हणून कॉर्सेट्स होते.” बाबाने फोनवर medieval European women चे फोटो दाखवले. उमरावांच्या नि राजघराण्यातल्या बायका. त्यांचे ‘डीप नेक’ बघून तर तिलाही ‘कॉम्प्लेक्स’ यावा! करकचून बांधलेले कॉर्सेट्स. क्लिवेज इतकं वर ढकललेलं की वाटावं, ऊशीखाली हात घालून ऊशी वर दुमडलीये. ते पाहून लेक जरा थबकली. My Body, My Rules
बाबा म्हणाला, “तो काळ पुरुषप्रधान होता. बाई म्हणजे पोरं जन्माला घालायचं साधन. बास! घरी मुलगी झाली की आईबापाला टेन्शन. हिला खपवायची कशी? मग तरूण झाली की तिला सजवून बॉल डान्सला न्यायचे. का? तर ती एखाद्या श्रीमंत उमरावाच्या पोराच्या नजरेत भरावी; त्याने लग्नाची मागणी घालावी. घरची जबाबदारी जावी. शिवाय श्रीमंत जावयाशी धंद्याचे कॉन्ट्रॅक्ट व्हावेत. पोरीला काय हवंय कोण विचारायचं? तिचं काम – लग्न कर, संसार कर, आणि स्वत:चं सेक्स अपील टिकव. वय वाढत जाईल तसा ‘डीप नेक’ डीपर होत जायचा. तिचं शरीर उघडं करण्याची सुरुवात पुरुषप्रधान व्यवस्थेनेच केली.”
लेकीचा हात नकळत स्वत:च्या स्ट्रॅप्सवर गेला. “ठीक आहे, ते त्यांच्यावर लादलं गेलं. पण आज तर हा आमचा चॉईस आहे ना?”
“असं म्हणतेस?” बाबा म्हणाला. “फास्ट फॉरवर्ड टू २०व्या शतकातली अमेरिका. आता सिनेमा आला होता. धंदा हवा होता. स्टुडिओचे मालक विचारात पडले. सामान्य अमेरिकन कामगार ९ ते ५ मिलमध्ये काम करून घरी जातो. घरी कॅथोलिक संस्कारात वाढलेली बायको. बटणं गळ्यापर्यंत, फ्रॉक घोट्यापर्यंत. या पुरुषाला टॉकीजमध्ये कसं खेचायचं? उत्तर – सेन्सेशन! सेक्स! आणि मग आल्या तंग कपड्यातल्या मर्लीन मन्रो, रेचल वेल्श, बो डेरेक, स्टेला स्टिवन्स! सेक्स कॅन्डल! बॉम्बशेल!! पुढे ९०च्या दशकात मोनिका बेल्युची, शेरॉन स्टोन झाल्या! आपल्याकडे परवीन बाबी, डिंपल कपाडियाने सुरू केलेली परंपरा बिपाशा बासू आणि मल्लिका शेरावतने पुढे नेली. नियम ठरला – हिरॉईन म्हणजे जास्तीत जास्त अंगप्रदर्शन. ‘हम दिल दे चुके सनम’ सारख्या तथाकथित कौटुंबिक सिनेमातही ऐश्वर्या राय ‘डीप नेक’ कुर्त्यातच वावरली! मग २००० सालच्या पुढे आले म्युझिक व्हिडिओ, रिमिक्स. जगभर ‘बाई म्हणजे सेक्स’ हा विचार ठासला गेला. मीडिया फुलला. आणि बरोब्बर त्याच काळात तुझी पिढी जन्माला आली.” My Body, My Rules
लेक आता जरा वरमली होती. म्हणाली, “हे सगळे मीडिया चालवणारे पुरुषच होते ना?” बाबा म्हणाला, “हो. आंबटषौकिन स्त्रीलंपट पुरुष. ज्यांना पैशासाठी बाईला उघडं करायचं होतं. पण त्याचवेळी जगभरात फेमिनिस्ट चळवळ जोरात होती. बायका अन्यायाविरुद्ध चिडत होत्या; न्याय्य हक्कांसाठी लढत होत्या. त्या मीडियावर स्वाभाविकच चिडल्या. ‘स्त्रीला उपभोग्य वस्तू का बनवता?’ हा त्यांचा खडा सवाल होता. मीडिया अडचणीत आला. उत्तर नव्हतं. मग त्यांनी शक्कल लढवली. अशी शक्कल, जी फक्त सैतानालाच सुचू शकते. त्यांनी स्वत:च फेमिनिझमची चळवळ हायजॅक केली!! तथाकथित बोल्ड अभिनेत्र्यांची फौज उभी केली. त्या मुलाखतीत म्हणायच्या, ‘हे कपडे मी माझ्या मर्जीने निवडतीये. माझ्याकडे एक सुंदर शरीर आहे. मग मी ते का दाखवू नये? बघायचं नसेल तर बघू नका.’ इथे तक्रार करणाऱ्या बायकांची तोंडं बंद झाली आणि समाजाची बुद्धी शून्य झाली.
“तिथून नवा फॉर्म्युला आला: अंगप्रदर्शन म्हणजेच महिला सबलीकरण! अंगप्रदर्शन म्हणजेच आधुनिकता! स्त्रीने सेक्शुअल असायलाच हवं! नाही तर आम्ही तिला ‘बॅकवर्ड’ ठरवणार! शरीराचे प्रायव्हेट पार्ट दाखवणारे कपडे घाला; तुमच्या शरीरावरचा तुमचा हक्क दाखवा; आणि पुरुषसत्तेविरुद्ध क्रांती करा! ते कपडे आंबटषौकिन पुरुषांनीच बनवलेत हे आपण अर्थातच विसरून जाऊ! पैसा मिळतोय म्हटल्यावर अनेक बायाही त्यांना सामील झाल्या. न्याय मागणारं फेमिनिझम अडगळीत गेलं. फक्त सेक्स उरला.
“तुम्ही मोठे झालात तोपर्यंत सोशल मीडिया फोफावला होता. इंस्टा, रील्स. अनेक मुलींना लक्षात आलं – अटेंशनसाठी कर्तृत्व नको. फक्त शरीर उघडं कर आणि पोस्ट कर. हजारो लाईक्स, कमेंट्स! मज्जा!! सोशल मीडिया चालवणाऱ्या कंपन्यांनी सुनीता विल्यम्सचं किंवा झाशीच्या राणीचं फार कौतुक केलं नाही कधी. पण स्वतःला उघडं टाकणाऱ्या बाईला ‘Queen, you totally slay!’ हे तोंड फाटेस्तोवर ऐकवतात. का? कारण ती खूश होऊन आणखी ‘कंटेंट’ पोस्ट करेल, तिचे फॉलोअर्स वाढतील, त्यांना जाहिराती दाखवता येतील, त्यातून ढिगाने पैसा येईल! एका अर्धनग्न influencer ला महिन्याला १० लाख रुपये दिले तरी त्यांच्या बापाचं काही जात नाही; कारण त्याच महिन्यात तिच्यामुळे त्यांचा करोडो डॉलर्सचा फायदा होतो. यातली प्रत्येक बाई म्हणते, ‘It’s my life… मला दुनियेची पडलेली नाही…’ मग हे दुनियेला ऐकवण्याची गरज का वाटते? त्या सेक्शुअलिटीला दुनियेसमोर सादर करण्याची इच्छा का होते? जर दुनियेची पडलेली नाही, तर एखाद्या फोटोला कमी लाईक्स मिळाले तर दिवस खराब का जातो? हा खोटेपणा सहज लक्षात येतोय. My Body, My Rules
“मीडियाला महिला शक्तीची पडलेली नाही गं; पण नागडे-उघडेपणाला शक्ती समजायला बाया तयार असतील तर मीडियाला पैशाचं छान झाड मिळतंय! तू म्हणतेस, ‘It’s my choice. मी स्वत:हून निवडतीये हे.’ जरूर. पण विचार कर – जेव्हा लहानपणापासून मेंदूवर एकच गोष्ट सतत आपटली जाते, तेव्हा खरंच choice उरतो का? की फक्त delusion of choice उरतो? ब्रेनवॉश हा विषयच असा आहे, की तो झालाय हे आपल्याला कळत नसतं! आपण स्वत:ला स्वतंत्रच समजत असतो! निर्णय तुझाच आहे. पण जर कुणीतरी तुला पद्धतशीर scam करतंय आणि तुला ते जन्मात कधी कळलंच नाही, तर ते फार ‘बॅकवर्ड’ ठरेल!”
लेक बावचळली. मग म्हणाली, “पण असे कपडे घातले की कॉन्फिडंट वाटतं. शरीराची मालकी माझ्याकडे आहे असं वाटतं.”
बाबा हसला. “कॉन्फिडंस कपड्यातून येत असेल तर तो कॉन्फिडंस नाही, भ्रम आहे. शक्ती मनात असते, कपड्यात नाही. आणि शरीराची मालकी दाखवायला प्रायव्हेट पार्ट उघडे करावे लागतात का? आपलं बॅंक अकाऊंट प्रायव्हेट असतं. त्याची मालकी दाखवायला आपण दुनियेला डिटेल्स दाखवत नाही. जे प्रायव्हेट आहे ते प्रायव्हेटच ठेवतात. शरीराची प्रायव्हसी ही एक नैसर्गिक समज असते. ५-६ वर्षाच्या मुलांनाही ही समज असते. पण तुमच्या पिढीला मीडियाने शिकवलं – अटेंशनसाठी प्रायव्हसी संपवा. बाऊंडरीज संपवा. जशी तुझ्या खाजगी आयुष्यातली प्रत्येक बारीक गोष्ट तुझ्या फ्रेंड्सना माहीत असते त्याचप्रमाणे तुझ्या शरीराचीही प्रायव्हसी दुनियेसमोर उघडी असते. प्रायव्हेट पार्ट दाखवूनच स्त्रीला शक्ती मिळते, हा विचार तुझा आहे का तुला शिकवला गेलाय?” My Body, My Rules
“पण… मी कुणाला त्रास देत नाहीये,” लेक एक शेवटचा डाव टाकायला म्हणाली. “मम्मीला प्रॉब्लेम नाही; मग तुला का आहे?”
बाबाने मम्मीकडे एक नजर फेकली. “तुझी मम्मी लहानपणी पुरुषप्रधान संस्कृतीत वाढली. तिला राग आहे. नवरा त्यातला नाही, हे तिला कळलेलं नाही; मीडियाने कळू दिलेलं नाही. आपल्याला जितकं बंदिस्त ठेवलं गेलं तितकंच आपण लेकीला मोकळं सोडलं पाहिजे, हा तिचा विचार. म्हणूनच तू जे काही करशील त्याला ती पाठिंबा देते आणि ‘आत्ताच्या काळात हे चालतंच ना,’ हे मला ऐकवते. तिला पुरुषसत्तेविरोधात बंडखोरी करायचीये; पण बंड आंधळं ठरतंय. मुलीला कधी ‘नाही’ ऐकवलंच नाही तिने; त्यामुळे मुलीच्या आईची जागा मीडियाने घेतली. तिला वाटतं, तू क्रांती करतीयेस. पण मीडियाचं ऐकून क्रांती होत नसते! इथे विवेक गहाण ठेवला जातोय.” मम्मी जरा हडबडली; पण काही बोलू शकली नाही.
“आणि हो, तू कुणाला त्रास देत नाहीयेस. पण स्वतःचं नुकसान करतीयेस. कारण जेव्हा ‘सेक्शुअलिटी’ उघडी होते, तेव्हा ती आपलीच ‘पर्सनॅलिटी’ गिळंकृत करते. आपण आपल्याच सेक्शुअलिटीच्या धुंदीत बुडून बसतो; पर्सनॅलिटीतले बाकीचे गुण पुढे येऊच शकत नाहीत. पटत नसेल तर हे लक्षात घे – तुझे आजवरचे बॉयफ्रेंड्स : कसे निवडलेस? जो कुणी फडतूस माठ्या तुझ्या बोल्डनेसवर भाळून तुला अटेंशन देतो त्याला तू जवळ करतेस. त्याच्यातले दुर्गुण तुला नंतर कळतात, आधी नाही. मग ब्रेक-अप. मग डिप्रेशन. मग पुन्हा कुणीतरी अटेंशन द्यावं म्हणून ‘बोल्डनेस’चा आटापिटा. कळतंय काय नुकसान होतंय ते? तू फक्त एक सेक्सी मादी म्हणून घडतीयेस; सजग माणूस म्हणून नाही, हे कळतंय? पुढे आणण्यासारखे दुसरे कुठले गुणच नाहीत म्हणून आपण उघडं शरीर पुढे आणतोय का? मी इथे सभ्यता, संस्कृती, श्लील-अश्लील हे विषय तर मांडलेसुद्धा नाहीत. मी इथे फक्त तुझा वैयक्तिक लॉस दाखवतोय. तुला दुनियेची नाही पडलेली – ग्रेट! पण स्वत:ची तर पडलेली आहे ना? My Body, My Rules
“आणि ज्या अटेंशनसाठी तू धडपडतीयेस, ती दुनिया तुला आदर कधीच देणार नाही. फक्त सेक्स कॅन्डल म्हणून बघेल. कारण उघडी सेक्शुअलिटी आदर निर्माण करत नाही; फक्त हवस निर्माण करते. उद्या मी आपल्यातला हा सगळा संवाद लिहून काढला आणि पोस्ट केला तर लोक मला म्हणतील, ‘ए… बायकांना शहाणपणा शिकवू नको… पुरुषांना सांग नजर सुधारायला.’ ठीक आहे. पण तूच सांग – जॉन अब्राहम त्याचे शर्टलेस फोटो पोस्ट करतो तेव्हा त्याचे घाटदार cuts बघून तुला आदर वाटतो का? ‘किती आदरणीय महोदय आहेत हे!’ असं वाटतं? की ‘आईशप्पथ, काय कडक कोंबडा आहे!’ असं वाटतं? हाच निसर्ग आहे. मग तुझे घाटदार curves बघून जगाला आदर कसा वाटेल? ‘आईशप्पथ, काय कडक माल आहे!’ हेच वाटणार. वाटू नये तसं. समाजाने बघत बसू नये. हे मान्य. पण तेच होणार. मग बघावंसं वाटेल ते आपण दाखवतही बसू नये. नंतर तूच म्हणशील, ‘माझं sexual objectification झालं’. शेवटचा प्रश्न – तुला व्यक्ती म्हणून पुढे यायचंय का वस्तू म्हणून?” My Body, My Rules
मम्मी रूममध्ये आत गेली. लेक शांत झाली. पहिल्यांदाच तिला बाबामध्ये मीडियाने शिकवलेला ‘तिरस्करणीय misogynist पुरुष’ नाही, तर ‘caring बाप’ दिसला.
© अपूर्व विकास
समुपदेशक व मानसशास्त्र तज्ज्ञ
(निगडी, पुणे)
Phone: 8928183848
WhatsApp: 7774917184
Online Counseling Available.
Facebook: Counselor Apoorva
