गुहागर, ता. 27 : राज्यशासनाच्या १० कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात सप्टेंबरअखेर १,११७ ठिकाणी तीन लाख १५ हजार १४० रोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये ७० हजार ८३ रोपांची लागवड करून चिपळूण तालुक्याने जिल्ह्यात अव्वल स्थान मिळवले आहे. खेड तालुका ५० हजार २२४ रोपांच्या लागवडीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पावसाची ओढ असतानाही विविध शासकीय यंत्रणा, ग्रामपंचायती, शाळा आणि सामाजिक संस्थांच्या सहभागामुळे मोहिमेला प्रतिसाद मिळाला. Tree Plantation Campaign
जागतिक तापमानवाढीचे आव्हान लक्षात घेऊन ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महसूल व वनविभागाने यंदा १० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला होता. त्यानुसार जिल्ह्यातील सात प्रमुख शासकीय व सामाजिक रोपवाटिकांमध्ये तीन लाख ४६ हजार ५५० रोपे उपलब्ध ठेवण्यात आली होती. वनमहोत्सवाच्या १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत शेतकरी, शाळा, संस्था आणि नागरिकांना ही रोपे सवलतीच्या दरात तर काही ठिकाणी मोफत उपलब्ध करून देण्यात आली. कोकणातील हवामान आणि मातीला अनुकूल असलेल्या सुमारे ५० प्रजातींच्या रोपांचा मोहिमेत समावेश होता. Tree Plantation Campaign
आंबा, काजू, कोकम, फणस, जांभूळ, बांबू, साग, खैर, आवळा, कडुनिंब, करंज, वड, पिंपळ, अर्जुन, बेहडा, बकुळ आणि सोनचाफा यांसह विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. तालुकानिहाय आकडेवारीनुसार, चिपळूणमध्ये ७० हजार ८३ रोपांची लागवड झाली. खेडमध्ये ५० हजार २२४, संगमेश्वरमध्ये ४९ हजार ६९७ आणि गुहागरमध्ये ४९ हजार ४३९ रोपांचे रोपण झाले. रत्नागिरी तालुक्यात ३३ हजार ७६४, मंडणगडमध्ये ३१ हजार ५८७, दापोलीत २० हजार ७०३, लांजा तालुक्यात सात हजार २२१ तर राजापूरमध्ये दोन हजार ४२२ रोपे लावण्यात आली. Tree Plantation Campaign
