कुरतडे येथे अद्यावत फायरिंग रेंज उभारण्याच्या हालचालींना वेग
रत्नागिरी, ता. 22 : स्वातंत्र्यानंतर प्रथमच रत्नागिरी पोलीस दलासाठी स्वतंत्र फायरिंग रेंज मिळण्याच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. पोलीस अधिकारी व अंमलदारांना नियमित गोळीबार सराव आणि प्रशिक्षणाची सुविधा आता जिल्ह्यातच उपलब्ध व्हावी, या उद्देशाने कुरतडे येथे अद्यावत फायरिंग रेंज उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. Firing range to be set up at Kuratade
पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या पुढाकारातून या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची संकल्पना मांडण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत व जिल्हाधिकारी श्री. मनुज जिंदाल यांनी या प्रस्तावाचे गांभीर्य ओळखून रत्नागिरी पोलीस दलाच्या या संकल्पनेला तात्काळ प्रशासकीय मान्यता दिली आहे. Firing range to be set up at Kuratade
प्रस्तावाला मंजुरी मिळताच पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांनी कुरतडे येथील प्रस्तावित जागेची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. आतापर्यंत स्वतंत्र फायरिंग रेंज नसल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना सरावासाठी इतर ठिकाणांवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, कुरथडे येथे ही ‘फायर बट’ (फायरिंग रेंज) प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील १५०० पोलीस अंमलदार आणि २०० पोलीस अधिकाऱ्यांना नियमित गोळीबार सरावाची सुविधा थेट रत्नागिरीतच उपलब्ध होणार आहे. यामुळे पोलीस दलाची सज्जता आणि प्रशिक्षण क्षमता अधिक मजबूत होण्यास मोठी मदत होणार आहे. Firing range to be set up at Kuratade
