‘फोडूया हंडी, जोडूया सद्गुणांची नाती’ संकल्पनेतून दिले मूल्यशिक्षण
गुहागर, ता. 07 : सण-उत्सवांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंदासोबत संस्कार आणि मूल्यशिक्षण देण्याच्या उद्देशाने पीएमश्री स्कूल वेळणेश्वर नं. १ प्रशालेत आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत ‘सद्गुणांची दहिहंडी २०२६’ या अनोख्या व आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘Dahi Handi’ at Velaneshwar School
दहिहंडीमध्ये नेहमीच्या दही-लोण्याऐवजी यंदा विद्यार्थ्यांच्या मनात चांगले संस्कार रुजविणाऱ्या विविध सद्गुणांची आकर्षक कार्डे ठेवण्यात आली. प्रामाणिकपणा, प्रेम, सहकार्य, पर्यावरणप्रेम, ज्ञान, शांतता, स्वच्छता, शिस्त, देशप्रेम, नम्रता, एकता, सेवाभाव, कृतज्ञता, धैर्य, संयम अशा विविध सद्गुणांची कार्डे तयार करण्यात आली होती. ‘Dahi Handi’ at Velaneshwar School
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गावणंग, उच्चश्रेणी मुख्याध्यापक सतीश नलावडे, पदवीधर शिक्षिका शैलजा साळे, बिपिन विचारे, उपशिक्षक बाबासाहेब राशिनकर, उपशिक्षिका सुलक्षणा करडे-राशिनकर, भारती गोवेकर-वावरे, शिक्षण सेविका प्रियंका पवार, अंजूम शेख, तेजस्विनी जगताप, सहाय्यक शिक्षिका साक्षी खरे, आकांक्षा खरे तसेच सर्व शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत सद्गुणांची ही कार्डे दहिहंडीत ठेवण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक गोविंदा नृत्य सादर करून मनमुराद आनंद लुटला. बालश्रीकृष्णाच्या वेशभूषेतील सिया मोरे, राधेच्या वेशभूषेतील आरोही ठाकूर तसेच दिव्यांग विद्यार्थिनी गार्गी कलमकर या उत्सवाच्या प्रमुख आकर्षण ठरल्या. ‘Dahi Handi’ at Velaneshwar School

त्यानंतर विद्यार्थ्यांनी मानवी मनोरा रचून दहिहंडी फोडली. हंडी फोडल्यानंतर त्यातील सद्गुणांची कार्डे विद्यार्थ्यांनी प्रसाद म्हणून स्वीकारली. आपल्या वाट्याला आलेल्या सद्गुणाची माहिती जाणून घेऊन तो सद्गुण आपल्या आचरणात आणावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. ‘फोडूया हंडी… जोडूया सद्गुणांची नाती!’ हा प्रेरणादायी संदेश देत विद्यार्थ्यांना सणाचा आनंद घेतानाच जीवनमूल्यांची जपणूक करण्याची शिकवण देण्यात आली. ‘Dahi Handi’ at Velaneshwar School
मानवी जीवनात सद्गुणांचे स्थान अनन्यसाधारण असून विद्यार्थ्यांच्या मनात मूल्यशिक्षण रुजावे, त्यांच्यात सकारात्मक विचारांची आणि चांगल्या आचरणाची जडणघडण व्हावी, तसेच सण-उत्सवांचा खरा सामाजिक व सांस्कृतिक अर्थ विद्यार्थ्यांना समजावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे पीएमश्री प्रशालेचे शिक्षक बाबासाहेब राशिनकर यांनी सांगितले. पीएमश्री स्कूल वेळणेश्वर च्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे शिक्षण विभागातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, पालक आणि ग्रामस्थांकडून विशेष कौतुक होत आहे. ‘Dahi Handi’ at Velaneshwar School
