मुंबई, ता. 07 : जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये एसटीच्या उत्पन्नात तब्बल ६६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. उत्पन्नवाढीसाठी सुचविलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाल्याने एसटीच्या तोट्याचे प्रमाणही कमी होऊ लागले आहे. आगामी काही महिन्यांत एसटीचा चालू तोटा भरून काढण्याच्या दिशेने महामंडळाची वाटचाल सुरू असल्याचा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. Increase in ST bus revenue
एसटीचे प्रत्येक आगार हे त्या परिसरातील सर्वसामान्य जनतेला प्रवासी सेवा देण्यासाठी निर्माण करण्यात आले आहे. एसटीच्या एकूण प्रवाशांपैकी तब्बल ८५ टक्क्यांहून अधिक प्रवासी १०० किलोमीटरच्या आतील अंतरात प्रवास करतात. त्यामुळे प्रत्येक आगाराने आपल्या कार्यक्षेत्रातील प्रवाशांची गरज ओळखून त्यानुसार वाहतूक नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत याकडे अपेक्षित लक्ष न देता लांब पल्ल्याच्या, तुलनेने अनुत्पादक फेऱ्यांवर अधिक भर दिला जात होता. त्यामुळे प्रवासी संख्या आणि उत्पन्नाच्या तुलनेत खर्च अधिक होऊन एसटीच्या तोट्यात भर पडत होती. मागील महिन्यात उत्पन्नवाढीचा आढावा घेताना मंत्री सरनाईक यांनी ही बाब स्पष्टपणे निदर्शनास आणून दिली होती. Increase in ST bus revenue
ऑगस्ट महिन्यापासून प्रत्येक आगाराने प्रवाशांची प्रत्यक्ष उपलब्धता आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन वेळापत्रकात आवश्यक बदल करण्यास सुरुवात केली. ग्रामीण तसेच निमशहरी भागातील दररोज प्रवास करणारे नोकरदार, शेतकरी, महिला, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रवासाच्या वेळा लक्षात घेऊन बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले. त्याचबरोबर आठवडी बाजार, यात्रा-जत्रा तसेच स्थानिक गर्दीचे दिवस लक्षात घेऊन संबंधित मार्गांवर अतिरिक्त फेऱ्याही वाढविण्यात आल्या. Increase in ST bus revenue
विविध उपाययोजनांसह रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट रोजी एसटीला आतापर्यंतचे सर्वाधिक दैनंदिन उत्पन्न मिळाले. एका दिवसात तब्बल ४५ कोटी रुपयांची तिकीट विक्री झाली. विशेष म्हणजे, एसटीच्या इतिहासात प्रथमच एका दिवसात एवढे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. सध्या एसटीला दररोज सरासरी ३४ ते ३५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. त्या तुलनेत ३१ ऑगस्ट रोजी एका दिवसात सुमारे १० कोटी रुपयांची ‘हनुमान उडी’ घेत एसटीने विक्रमी उत्पन्न मिळवले. प्रवाशांची गरज आणि मागणी लक्षात घेऊन बसफेऱ्यांचे करण्यात आलेले नियोजन यामागील प्रमुख कारण ठरले आहे. ऑगस्ट महिन्यात प्रथमच एसटीने एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक मासिक उत्पन्न मिळवले आहे. उत्पन्नवाढीचा हा कल कायम राहिल्यास पुढील दोन ते तीन महिन्यांत एसटीचा चालू तोटा भरून निघण्याची शक्यता आहे. Increase in ST bus revenue
जिथे प्रवासी, तिथे एसटीची फेरी’ या भूमिकेतून करण्यात आलेल्या बदलांचा थेट परिणाम एसटीच्या उत्पन्नावर दिसून आला आहे. अर्थशास्त्रातील ‘मागणी तसा पुरवठा’ या मूलभूत तत्त्वाचा अवलंब करत ज्या मार्गांवर प्रवाशांची संख्या अधिक आहे, त्या मार्गांवर बसफेऱ्या वाढविण्यात आल्या. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान, एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे प्रवाशांच्या गरजेनुसार एसटीची सेवा पोहोचली पाहिजे. अनुत्पादक फेऱ्यांपेक्षा प्रवासी उपलब्ध असलेल्या मार्गांवर अधिक फेऱ्या चालविणे, हेच उत्पन्नवाढीचे प्रभावी सूत्र आहे. ऑगस्ट महिन्यात झालेली ६६ कोटी रुपयांची उत्पन्नवाढ ही योग्य दिशेने सुरू झालेल्या बदलाचे द्योतक आहे. भविष्यातही प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन वाहतूक नियोजन केले, तर एसटीला किमान तोटा होणार नाही, इतके उत्पन्न दर महिन्याला मिळविणे शक्य होईल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. Increase in ST bus revenue
