गुहागर, ता. 19 : गुहागर शहरातील सहदुय्यम निबंधक कार्यालय नियमितपणे आठवडाभर सुरू ठेवावे, अशी मागणी तालुक्यातील ग्रामस्थांकडून होत आहे. कोरोना काळानंतर हे कार्यालय सध्या आठवड्यातील केवळ गुरुवार आणि शुक्रवार असे दोनच दिवस सुरू असते. त्यामुळे खरेदीखत, बक्षिसपत्र, मुखत्यारपत्र, बँकेचा बोजा चढविणे, गहाणखत आदी दस्तऐवजांच्या नोंदणीच्या कामांना विलंब होत आहे. Guhagar Sub-Registrar Office
आठवड्यातून दोनच दिवस कार्यालय सुरू असल्याने या दोन्ही दिवशी मोठी गर्दी होते. त्यातच इंटरनेट सेवा आणि वीजपुरवठ्यातील व्यत्ययामुळे तालुक्यातील नागरिकांसह बाहेरून येणाऱ्या खरेदीदारांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गुहागर हे महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून तालुक्यातील नागरिकांसाठी सहदुय्यम निबंधक कार्यालय अत्यावश्यक सेवा देणारे कार्यालय आहे. मूल्यांकन मिळणे, दस्तऐवजांच्या नक्कला मिळणे, सर्चसाठी पावती घेणे यासह विविध सेवा या कार्यालयातून दिल्या जातात. मात्र कार्यालय केवळ दोन दिवस सुरू असल्याने या सेवाही वेळेत मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. Guhagar Sub-Registrar Office
कार्यालय नियमित सुरू नसल्यामुळे दस्तनोंदणीचे प्रमाणही कमी होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कार्यालय आठवडाभर सुरू केल्यास दस्तनोंदणीची संख्या वाढण्याबरोबरच नागरिकांना आवश्यक सेवा वेळेत मिळू शकतील. या समस्येची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन गुहागरचे सहदुय्यम निबंधक कार्यालय नियमितपणे आठवडाभर सुरू ठेवावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. Guhagar Sub-Registrar Office
