प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते, जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी
Guhagar News : कोणताही कायदा कागदावर कितीही कडक असला, तरी तो खऱ्या अर्थाने तेव्हाच यशस्वी होतो, जेव्हा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्याची माहिती पोहोचते आणि लोकांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडतो. याच ठिकाणी जिल्हा माहिती कार्यालयाची आणि पर्यायाने प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. PC-PNDT Act
‘पीसी-पीएनडीटी’ (गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व निदान तंत्र) कायद्याची काटेकोर अंमलबजावणीत ‘जिल्हा माहिती कार्यालयाची’ अत्यंत महत्वाची भूमिका आहे. कायद्याच्या तरतुदी, त्यातील कडक शिक्षा आणि गर्भलिंग निदान हा किती गंभीर गुन्हा आहे, याची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम जिल्हा माहिती कार्यालय करते. वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी, रेडिओ आणि आजच्या काळातील सर्वात प्रभावी माध्यम असलेल्या ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून सातत्याने जनजागृती मोहिमा विशेष लेख, वृत्त, कार्यक्रम, बैठक यांची बातमी देवून समाजाचा दृष्टिकोन बदलणे, हे पहिले उद्दिष्ट असते. PC-PNDT Act
प्रशासनाने, आरोग्य विभागाने किंवा पोलिसांनी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर टाकलेले छापे, सील केलेली सोनोग्राफी केंद्रे आणि दोषींना झालेली शिक्षा यांच्या बातम्या जाणीवपूर्वक आणि प्राधान्याने प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवतो. या पारदर्शक माहिती प्रसारणामुळे समाजात आणि विशेषतः वैद्यकीय वर्तुळात एक स्पष्ट संदेश जातो. यातून कायद्याचा वचक आणि योग्य तो धाक निर्माण करण्यास मदत होते. PC-PNDT Act
अनेकदा कारवाईच्या वेळी किंवा त्यानंतर अफवा पसरण्याची शक्यता असते. अशा वेळी आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन आणि मीडिया यांच्यात योग्य समन्वय साधून, अधिकृत आणि सत्य माहिती जनतेसमोर ठेवण्याचे काम जिल्हा माहिती कार्यालय करते. यामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर जनतेचा विश्वास वाढतो. म्हणजेच प्रशासन आणि प्रसारमाध्यमे यांच्यातील दुवा म्हणून काम करते. केवळ गुन्हे आणि कारवाईच्या बातम्या न देता, ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ या दृष्टिकोनातून सकारात्मक बातम्यांनाही मोठे प्रोत्साहन दिली जाते. PC-PNDT Act
जिल्ह्यातील मुलींनी शिक्षण, क्रीडा, प्रशासन आणि इतर क्षेत्रांत मिळवलेल्या यशाच्या यशोगाथा समाजासमोर मांडून, ‘मुलगी ही ओझे नसून कुटुंबाचा आणि देशाचा आधार आहे’ हा विचार रुजवण्याचा सातत्याने प्रयत्न करतो. हे सर्व सकारात्मक यशोगाथांना प्रसिद्धी देवून करण्यात येते. त्याशिवाय महाराष्ट्र शासनाने मुलींचे शिक्षण, आरोग्य, आर्थिक सक्षमीकरण आणि त्यांचा जन्मदर वाढवा यासाठी लेक लाडकी योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, अहिल्यादेवी होळकर मोफत एसटी प्रवास योजना, केंद्र शासनाची सुकन्या समृध्दी योजना अशा विविध योजना आणल्या आहेत. वेळोवेळी या योजनांची प्रसिध्दी केली जाते. PC-PNDT Act
स्त्री-भ्रूणहत्या हा केवळ एक कायदेशीर गुन्हा नसून, तो मानवतेवरील मोठा कलंक आहे. जिल्हा माहिती कार्यालय हे केवळ ‘बातम्या देणारे कार्यालय’ नसून, ते या सामाजिक बदलाच्या प्रक्रियेतील एक अत्यंत सक्रिय घटक आहे. सर्व प्रसारमाध्यमे आणि वैद्यकीय व्यावसायिक प्रशासनाला उत्तम साथ देत आहेत. या कायद्याचे पालन करून या पवित्र कार्यात प्रशासनाचे हात बळकट करावेत. चला, आपण सर्व मिळून हा कायदा अधिक प्रभावीपणे राबवूया आणि आपल्या जिल्ह्याला स्त्री-भ्रूणहत्या मुक्त बनवण्याचा ठाम संकल्प करूया. PC-PNDT Act