रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १६ मशीनद्वारे दर्जेदार उपचार; हजारो रुग्णांना लाभ
रत्नागिरी, ता. 0१ : रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डायलिसिस विभाग जिल्ह्यातील किडनी विकारग्रस्त रुग्णांसाठी मोठा आधार ठरत आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत येथे रुग्णांना मोफत डायलिसिससह आवश्यक रक्त तपासण्या व महत्त्वाची इंजेक्शनेही विनामूल्य उपलब्ध करून दिली जात असल्याने गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. Free dialysis facility in Ratnagiri
यापूर्वी डायलिसिससाठी रुग्णांना कोल्हापूर, मुंबई किंवा खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन हजारो रुपयांचा खर्च करावा लागत होता. मात्र आता रत्नागिरीतच अत्याधुनिक आणि दर्जेदार उपचार उपलब्ध झाल्याने रुग्णांचा आर्थिक व मानसिक ताण कमी झाला आहे. या विभागातील उपचार अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली केले जातात. वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तमराव कांबळे, मूत्रपिंड तज्ज्ञ डॉ. अमेय बेडेकर, प्रशिक्षित तंत्रज्ञ व परिचारिका यांच्या देखरेखीखाली रुग्णांना उपचार दिले जात आहेत. Free dialysis facility in Ratnagiri
सन २०१३ मध्ये सुरू झालेल्या या डायलिसिस विभागात सध्या १६ बेड व १६ मशीन कार्यरत असून त्यापैकी दोन बेड व मशीन पॉझिटिव्ह रुग्णांसाठी स्वतंत्र आयसोलेशन कक्षात राखीव ठेवण्यात आली आहेत. रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने भविष्यात बेड व मशीनची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली. Free dialysis facility in Ratnagiri
रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्यसेवेत मोठा बदल झाला असून दरमहा हजारो रुग्ण ओपीडी व आयपीडी सेवांचा लाभ घेत आहेत. डायलिसिस विभागामुळे ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांचा उपचारावरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. Free dialysis facility in Ratnagiri
सध्या दरमहा ७० ते ८० रुग्ण नियमित डायलिसिस सुविधा घेत असून महिन्याला सुमारे ६५० ते ७०० डायलिसिस सायकल पूर्ण केल्या जातात. जून २०२५ ते जून २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील १,०२४ नियमित रुग्णांवर उपचार करण्यात आले असून एकूण ९,०७६ डायलिसिस सायकल यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा विभाग जिल्ह्यातील किडनी रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी सेवा ठरत आहे. Free dialysis facility in Ratnagiri
