शृंगारतळीत घोषणाबाजी; राजीनाम्याच्या मागणीसाठी सह्यांची मोहीम
गुहागर, ता. 23 : शिक्षण व्यवस्थेच्या सुधारणेसाठी दिल्लीत उपोषण करणारे शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक आणि अभिजीत दीपके यांना केंद्र सरकारने अटक केल्याच्या निषेधार्थ गुहागर तालुका युवासेनेच्या वतीने गुरुवारी शृंगारतळी येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. Youth Sena march in Guhagar
यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सह्यांची मोहीमही राबविण्यात आली. शृंगारतळी हायस्कूलच्या प्रवेशद्वारासमोर मोठ्या संख्येने युवासैनिक, शिवसैनिक, विद्यार्थी आणि नागरिक एकत्र आले होते. “विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मोर्चादरम्यान शेकडो विद्यार्थी व नागरिकांनी सह्यांच्या मोहिमेत सहभागी होत सोनम वांगचुक यांना पाठिंबा दर्शविला. त्यानंतर युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला. Youth Sena march in Guhagar
“शिक्षण मागणाऱ्यांना तुरुंगात टाकणे ही हुकूमशाही आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी लढणाऱ्या सोनम वांगचुक यांच्या पाठीशी युवासेना खंबीरपणे उभी आहे,” असे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या निषेध मोर्चात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला तालुका संघटिका सिद्धी सुर्वे, युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन जाधव, गुहागर तालुका युवासेना प्रमुख निनाद नार्वेकर, गुहागर शहर युवासेना प्रमुख राज विखारे, शहर महिला संघटिका सारिका कनगुटकर यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे तालुका व शहरातील पदाधिकारी, शाखाप्रमुख, विभागप्रमुख, महिला पदाधिकारी, युवासैनिक, शिवसैनिक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Youth Sena march in Guhagar
