उपसभापती सुर्वे यांच्याकडून कडक शब्दात समज
गुहागर, ता. 07 : तालुक्यातील कोतळूकचे उपसरपंच सचिन ओक यांनी दूरध्वनीवरुन गावातील वीज सारखी खंडीत का होते असा प्रश्र्न विचारला असता महावितरणचे उपअभियंता सोनावणे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यासंदर्भात उपसरपंच ओक यांनी सभापती पोळेकर व उपसभापती सुर्वे यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत उपसभापती सुर्वे यांनी सोनावणे यांना कडक शब्दात समज दिली. Irresponsible answers from Mahavitaran
सध्या गुहागर तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. कोतळूकमध्येही 5 ते 6 दिवस विद्युत पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे पाणी योजना बंद पडली आहे. बीएसएनएल टॉवर बंद होऊन संपर्क तुटूल्याने संपर्क खंडीत झाला आहे. ग्रामपंचायतीमधील ऑनलाइनची कामेही रखडली आहेत. अचानक उच्च दाबाने होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे कोतळूक गावातील काही घरांमधील विजेची उपकरणे जळली. याबाबत चौकशी करण्याकरीता मंगळवारी (ता. 7) सकाळी ८.३० च्या दरम्यान कोतळूक ग्रामपंचायत उपसरपंच व भाजपा गुहागर तालुका सरचिटणीस सचिन ओक यांनी महावितरणचे उपअभियंता सोनावणे यांना अधिकृत असलेल्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. सतत विद्युत पुरवठा खंडित का होत आहे? लाईन फॉल्ट का होत आहे? अशी विचारणा केली. त्यावर सोनावणे यांनी, मी लाईन फॉल्ट काढायला जाऊ काय? तुमच्या लाईनमनला विचारा विद्युत पुरवठा खंडित का झाला आहे. १०० जणांना मी हेच सांगू काय अशी उत्तरे देऊन फोन कट केला. पुन्हा फोन केला तर उचलला नाही.

यासंदर्भात उपसरपंच सचिन ओक यांनी तत्काळ महावितरणचे अभियंता सूद यांना माहिती देऊन संताप व्यक्त केला. सोनावणे यांच्या कामकाजात योग्य ती सुधारणा झाली नाही तर सहनशीलतेचा अंत होऊन त्यांना कोकणी हिसका दाखवण्याचा इशारा ओक यांनी दिला. त्याचप्रमाणे याबाबत गुहागर पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे यांना माहिती दिली. याची दखल घेत उपसभापती निलेश सुर्वे यांनी सोनावणे यांना कडक भाषेत समज देऊन कामकाजात सुधारणा करण्याची सूचना केली आहे. Irresponsible answers from Mahavitaran
सोमवारी (ता. 6) गुहागर तालुकावासीयांनी महावितरणचे अभियंता सुद यांना विजेचा खेळखंडोबा, भूमिगत वीज वाहिन्यांच्या खोदकामातील त्रुटी आदींबाबत जाब विचारला होता. याला 24 तास उलट नाहीत तोच महावितरणचे उपअभियंता सोनावणे यांनी लोकप्रतिनिधींना उडवाउडवीची उत्तरे दिल्याची घटना घडली आहे. त्याबद्दल तालुक्यातून संताप व्यक्त होत आहे. Irresponsible answers from Mahavitaran
